Saturday, 28 August 2021

या 'कोव्हिड ' मध्ये सर्वांत जास्त नुकसान कोणाचं झालं?

सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिनच्या विलास जोशी यांचा लेख

कोव्हिड-19 ही जागतिक महामारी आली आणि त्याचा परिणाम सर्व मानवजातीवर, सर्व क्षेत्रावर, जगातील प्रत्येक देशावर झाला. जेव्हा आपण याचा परिणामाची चर्चा करतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की, माझ्या व्यवसायावर.. माझ्या कुटुंबावर.. माझ्या जॉबवर.. माझ्या उत्पन्नावर जास्त परिणाम झाला आहे. दुकानदार म्हणतो , दुकान बंद होतं म्हणून तोटा, कंपनीवाले म्हणतात , सर्व स्टाफला कामावर बोलवता येत नाही म्हणून तोटा, शाळा संस्थाचालक म्हणतात, शाळा बंद म्हणून तोटा, पर्यटन बंद म्हणून टूर्स कंपनीवाले तोट्यात. प्रत्येक जण पैशाचं नुकसान सांगतोय. ते अगदी खरं आहे.. पण कोणी मानसिक नुकसानीबाबत चर्चा करत नाही. काही जण म्हणतील की कुटुंबामध्ये ताण तणाव वाढलेला दिसतोय.. एंग्जाइटीचं प्रमाण वाढलं, एकूणच सामाजिक स्वास्थ सुद्धा बिघडलं आहे.. पण तरीही सर्वात जास्त नुकसान मला हे वाटत नाही.
आर्थिक तोटा कसाही भरून काढता येतो, गेलेली नोकरी परत मिळू शकते, तोट्यामधील व्यवसाय पुढील पाच वर्षात फायद्यामध्ये आणता येऊ शकतात, सामाजिक स्वास्थ्याबाबतीत सुद्धा लोकांची वाढलेली एंग्जाइटी, ताण-तणाव याला समुपदेशनाने आणि योग्य ट्रीटमेंटने सुरळीत करता येऊ शकतं. "हॅपिनेस इंडेक्स" वाढवता येऊ शकतो.. पण एक क्षेत्र असं आहे , त्याचं नुकसान ना मोजता येतं ना आपण भरून काढू शकतो. या कोव्हिड-19 मुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर ते म्हणजे 0 ते 8 वर्षाखालील मुलांचं.
शून्य ते आठ हे वय बाल मेंदू जडणघडणीचं वय असतं. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया पहिल्या आठ वर्षातच घातला जातो. जशी बिल्डिंग उंच आणि भक्कम दिसते कारण तिचा पाया तेवढाच भक्कम आणि खोल असतो..तसाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया हा पहिल्या सहा ते सात वर्षातच घातला जातो. म्हणूनच जगातील सर्व मानसशास्त्रज्ञ सांगतात की या वयात मुलं जे काही ऐकतात, पाहतात, अनुभवतात त्यातून त्यांचं भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य ठरत असतं.

आता या दोन वर्षात या वयोगटातील मुलं घराच्या बाहेर पडली नाही. त्यांनी विविध अनुभव घेतले नाही. खेळ खेळले नाही.. त्यामुळे त्यांच्या बाल मेंदूच जडणघडणीवर कायमचा परिणाम झाला आहे. वर वर हे मूल आनंदी आणि स्वस्थ दिसत असलं तरी मेंदूच्या पातळीवर पेशींचा विकास कमी पडला आहे. खेळण्यातून, उड्या मारण्यातून, मित्रमैत्रिणींशी सोबत मैदानी खेळातून पेशींना जी चालना मिळते त्यातून सिनॅप्सची निर्मिती होत असते. मेंदूमध्ये जितके जास्त सिनॅप्स बनतील तेवढे भविष्यात ते मूल भावनिक, मानसिक आणि शारीरिक पातळींवर सुदृढ होतं.. सोप्या भाषेत हुशार होतं. 

छोटं उदाहरण देतो, आपल्या मेंदूचे तीन भाग असतात. लेफ्ट हेमिस्फिअर, राइट हेमिस्फिअर आणि मध्ये असतो कॉर्पस कॅलोसम. पहिल्या आठ वर्षात हा कॉर्पस कॅलोसम विकसित होतो. मुलं जेवढं मुक्त खेळतील, उड्या मारतील, पळतील, धावतील मैदानावर मनसोक्त खेळतील तेवढा हा कॉर्पस कॅलोसम ताकदवान बनतो, त्याचा विकास होतो. या कॉर्पस कॅलोसम काम तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण वयाची "साठी" गाठतो. म्हातारपणी चालताना तोल सांभाळायचं कार्य कॉर्पस कॅलोसम करतो. जो विकसित पहिल्या आठ वर्षाच्या आत होतो. याचा अर्थ या वयोगटातील मुलांवर किती दूरगामी परिणाम झाला आहे याचा हा नमुना. 

या वयात मुलं ग्रुपमध्ये खेळतात, विविध अनुभव घेतात.. त्यांच्यातून त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा पाया घातला जातो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता (E.Q) वाढलेली हवी. पण मुलं या सगळ्यांपासून वंचित आहेत. प्राथमिक शाळेतील मुलं म्हणजे इयत्ता तिसरी- चौथीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस होतोय, जो पुढे भरून काढता येऊ शकतो. त्यांच्या सामाजिक भावनिक बुद्धिमत्तेचं एवढं नुकसान नाही. पण शून्य ते आठ वर्षाच्या मुलांचा लर्निंग लॉस तर आहेच ,सोबत पायाच तकलादू बनतो आहे. मेंदूची जडणघडण याचा हा काळ निघून जात आहे. त्यामुळे या कोव्हिड-19 मुळे सर्वात जास्त नुकसान या वयोगटातील बालकांचं झालं. पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं झालं. या मुलांना ऑनलाइन शिक्षणसुद्धा आपण परिणामकारक नाही देऊ शकत. हे मर्यादित स्वरूपाचं द्यावं लागतं. अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे या वयातील मुलांची कल्पनाशक्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. 

मग प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो? आपल्या हातात हे नुकसान कमीत कमी कसं करता येईल हे पाहणं एवढंच आहे. त्यासाठी पालकांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. पालक म्हणजे आई आणि वडील दोघांनी मुलांना ठरवून किमान दोन तास क्वालिटी टाइम द्यावा. ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवून एक तास विविध गोष्टींचे अनुभव देणं. यामध्ये हाताने करायचे उपक्रम हे जास्तीत जास्त असतील आणि किमान एक तास मुलांना मनसोक्त खेळू देणं, उड्या मारण्यापासून ते धावणं लपाछपी खेळण्यापासून ते सायकल चालवणं असे अनेक शारीरिक खेळ मुलांसोबत खेळणं खूप महत्त्वाचं आहे. या बिकट काळातही पुढच्या पिढीचं भविष्य आपणच घडवायचं आहे, ती आपलीच जबाबदारी आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

The Empty Classroom: India's Silent Education Emergency

Article by Sachin Usha Vilas Joshi India has made remarkable strides in expanding access to education—almost every village has a primary sch...