प्रत्येकाने वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रातील लेख
'सुचणं' ही एक जन्मजात असणारी कला आहे का? की ती ठरवून विकसित करता येते?
आजचं शास्त्र छातीठोकपणे सांगतं की सुचणं ही कला आहे जी विकसित केली जाते.
मग प्रश्न निर्माण होतो ती केव्हा विकसित करता येते?
तर, ती वयाच्या कुठल्याही टप्प्यावर विकसित करता येते पण जर लहानपणी पालकांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेकडे लक्ष पुरवलं असेल, त्यांना त्यासाठी वाव दिला असेल तर मोठेपणी सुचण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने होते. सर्वांत महत्त्वाचं त्या सुचण्यामध्ये नावीन्य असतं.
कोणतीही समस्या विविध पद्धतींनी सोडवण्यासाठी विविध उत्तरं शोधण्याचं सामर्थ्य या नावीन्यामुळे मिळतं.
त्यासाठी लहानपणापासूनच शोधक वृत्ती निर्माण करायला आणि व्हायला हवी. तर सुचण्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी करता येऊ शकतो.
सुचणं म्हणजे जगताना विविध समस्या सोडवण्यासाठी लागणाऱ्या कल्पना..आयडिया.. सृजनात्मक विचार आणि बरंच काही..
आता एखादा विचार जेव्हा सुचतो तो तुमच्या बुद्धीची किंवा मेंदूची जडणघडण कशी झाली त्यानुसार. त्या जडणघडणीमधून तुमच्या विचारांची व्याप्ती..खोली कळते. तुम्ही लहानपणापासून किती अनुभव घेता.. त्या अनुभवात किती समृद्धी आहे.. तुम्ही किती पुस्तकं वाचता.. कोणत्या प्रकारची वाचता.. तुम्ही किती मनमोकळं व्यक्त होता.. चर्चा करता.. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमचा जीवनाकडे, लोकांकडे, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे..त्यानुसार तुम्हाला 'सुचतं'.
सुचतं सगळ्यांनाच. पण त्या सुचण्यामध्ये विचारांची खोली किती.. समस्या सोडवण्याची ताकद किती.. आणि वास्तवाला धरून किती.. याची मोजपट्टी महत्त्वाची असते.
जे पालक लहानपणी त्यांच्या पाल्यावर जाणीवपूर्वक मेहनत घेतात, त्यांच्या विचारांवर काम करतात.. त्यासाठी त्याला/तिला विविध गोष्टी वाचून सांगतात, अभिव्यक्ती होण्यासाठी चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देतात, भावना व्यक्त होतील असं घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवतात, पाच इंद्रियांचे विविध अनुभव देतात, त्यासाठी निसर्गाशी नातं जुळवतात, घरात वाचनसंस्कृती रुजवतात अशा घरातील मुलं अधिक समृद्ध पद्धतीने वाढतात. मोठेपणी ही समृद्धी 'सुचण्या'तून व्यक्त होते.
या सुचण्याचा शत्रू जर कोणी असेल तर अतिरिक्त स्क्रीन टाईम.
या स्क्रीन टाईममधून येणारी जास्तीची बिनकामाची माहिती आणि जगण्यातला ताणतणाव. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला लवकर सुचत नाही.
कम्प्युटरच्या भाषेत बोलायचं झालं तर आपला मेंदू हँग होतो.
जसे मोबाईलवर खूप सारे अँपलिकेशन बँकेण्डला चालू राहिले की मोबाईल स्लो होतो.. तसं आपल्या मेंदूवर सातत्याने माहिती आदळत राहिली, मग ती फिल्म असो, युट्यूब व्हिडिओ असो, फेसबुक.. व्हाट्सअँप.. व्हिडिओ गेम..नेटफ्लिक्सपासून तर सातत्याने झूम वेबिनार असो..या सर्व माहितीमधून आपल्या उपयोगाची माहिती कोणती आणि बिनकामाची कोणती हे मेंदूला ठरवावं लागतं. या सर्व क्रियांमध्ये मेंदू थकतो. थकल्यावर त्याला झोपेची आवश्यकता असते.
पण झोपेची सवत जर कोणी असेल ती म्हणजे स्क्रीन.
म्हणजे एकीकडे आपली, मुलांची सर्वांचीच झोप कमी होते. त्यात अतिरिक्त माहितीच्या जाळ्यांमध्ये आपला मेंदू अडकतो म्हणून तो हँग होतो. याचे दूरगामी परिणाम म्हणजे नैराश्य, उत्साहाची कमी, चिडचिडेपणा, मुलांबाबत एडीएचडी.. असं सर्वकाही चालू होतं.
असं व्हायला नको असेल तर मुलांचा, आपला, सगळ्यांचाच स्क्रीन टाईम कमी व्हायला हवा. मुलांचा शाळेपुरता स्क्रीन टाईम ठेवावा. त्यानंतरचा अतिरिक्त स्क्रीन टाईम कमी करावा. मोठ्यांनी सोशल मीडियावर केव्हा जायचं.. त्याचा वेळ.. त्याचं टाईमटेबल करावे. अतिरिक्त स्क्रीन टाईम होत नाही ना याचं भान पालकांनी स्वतः बाळगणं अत्यंत गरजेचं आहे कारण याचा संबंध प्रत्यक्ष आपल्या विचारप्रक्रियेशी आहे.. सुचण्याशी आहे.. सुचणं अधिक जलद आणि नावीन्यपूर्ण असण्याशी आहे.
ही क्रिया अधिक उत्तम व्हावी असं तुमच्याबाबत आणि आपल्या पाल्याबाबत वाटत असेल तर मुलांना विविध अनुभव द्या, निसर्गाशी नातं जुळवा, विविध कला सोबतीला द्या, विविध पुस्तकं वाचायला द्या, गोष्टी स्वतः वाचा, त्यांना वाचायला द्या. त्याकरता स्वतःसाठी आणि मुलांसाठी वेळ काढा. या सगळ्यातून मुलांची विचारप्रक्रिया अधिक चांगली होईल आणि भविष्यात त्यांना जलद, नावीन्यपूर्ण आणि सृजनात्मक सुचेल.
टीप: कोविडमुळे तुम्ही मुलांना भरपूर वेळ दिला आहे पण स्वतःला प्रश्न विचारा या वेळेमध्ये 'क्वालिटी टाईम' किती होता? आणि त्यात आपण स्क्रीनच्या किती आहारी गेलो?
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
1 comment:
अतिशय मार्मिक विवेचन, अत्यंत सोप्या भाषेत मांडणी 👌👌👌
Post a Comment