शिक्षण आपला सचिन विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख
समर्थ रामदासांचे मनाचे शिक्षण
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥
निर्गुणाचं साकार रूप असणाऱ्या गणाधीशाला नमन करून समर्थांनी मनाच्या श्लोकांना प्रारंभ केला आहे.
समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधला हा पहिला श्लोक. त्यांनी एकूण २०५ 'मनाचे श्लोक' रचले. सर्व श्लोकांमध्ये मनाचं सामर्थ्य वाढवण्याचे उपाय सांगितलेले आहेत. हे मनाचे श्लोक म्हणजे मनाशी साधलेला संवाद आहे. आपणच आपल्याला बजावायच्या आणि तसं वागायचा प्रयत्न करण्याच्या या गोष्टी; जगाला मनाचे श्लोक देणारे रामदास स्वामी मला एक अद्वितीय मानसशास्त्रज्ञ वाटतात. या मानसशास्त्रज्ञांची खरे नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर. आपण मनाशी ज्या गप्पा मारतो त्या गप्पा काय असल्या पाहिजेत ते नारायण सूर्याजीपंत ठोसर अर्थात समर्थ रामदास सांगतात. सगळ्या शास्त्रज्ञांनी हे सांगितलं आहे की आपण जो मनात विचार करतो आणि मनाशी बोलतो तसे आपण घडतो. आपले विचार आपलं भविष्य घडवतात. याचं ज्ञान समर्थ रामदासांना होतं. मानसशास्त्रीय भाषेत याला ‘सेल्फ टॉक’ म्हणतात. म्हणून सर्व शाळेत ‘मनाचे श्लोक’ मुलांच्या कानांवर पडणं आवश्यक आहे. तर ते कानातून मनात झिरपतील आणि त्या झिरपलेल्या श्लोकांचा मोठेपणी त्यांना अर्थ गवसेल. रॅशनल इमोटिव्ह थेरी चे जनक डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी एकोणिसाव्या शतकात सांगितले की सेल्फ टॉक जसा तसा तुमचा स्वभाव. पण रामदास स्वामींनी पंधराव्या शतकातच या सेल्फ टॉक वर दोनशेहून अधिक श्लोक लिहिले. या मन संवादातूनच व्यक्तित्व घडते असे रामदास स्वामी सांगत.
रामदासस्वामींना हा विचार शके १५३० मध्येच कळला आणि त्यांनी तो मन:संवाद विस्ताराने सांगून ठेवला.
ते म्हणतात,
जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करून सोडावे।
सकल जन ।
असं म्हणताना ते माहितीकडे लक्ष वेधत नसून ज्ञानाकडे वेधतात. आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असतं ते आपण इतरांना दिलं पाहिजे. हा मुद्दा शिक्षकांना अगदी चपखल लागू होतो. शिक्षकांकडे भरपूर ज्ञान असतं पण असा विचार केला जातो की 'मी फक्त चौथीचीच टीचर आहे; मी फक्त एवढंच शिकवीन. मी पगाराच्या प्रमाणातच शिकवीन.' इथे रामदासस्वामी म्हणतात, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. खरा शिक्षक कोण असतो? त्याच्याकडे जे काही ज्ञान आहे ते जो सर्वांना वाटतो तोच. म्हणूनच रामदास म्हणतात 'जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन'
आपलं वर्तन कसं असलं पाहिजे? आचार-विचार, बोलणं कसं असलं पाहिजे या संदर्भात बरेच श्लोक रामदासांनी लिहिले आहे. रामदास सांगतात,
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥
रामदास समजावतात लोक निंदा करतील असं वागू नका. चांगलं काम करा. वंदनीय कार्य करा. प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे. पण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग हा चांगल्या वागणुकीचा आहे. आपल्या वागणुकीवरून आपली प्रगती ठरते आणि वागणूक ठरते तुमच्या संस्कार आणि विचारांनी. जेव्हा हे श्लोक विद्यार्थी म्हणतात तेव्हा त्यांच्या अंतर्मनात ते रुजतात.
जेव्हा त्यांच्या कानावर हे 'मनाचे श्लोक' पडतात त्यावेळेस कदाचित नाही पण भविष्यात त्यांना त्याचा उपयोग होतो. श्लोकांचा अर्थ आवश्यक तेव्हा मनातून उमलून वर येतो. ही मुलं मोठी होतील, ऑफिसर होतील तेव्हा हे श्लोक त्यांना वाईट मार्गापासून, भ्रष्टाचारापासून दूर राखू शकतात.
शाळेच्या रोजच्या परिपाठात 'मनाचे श्लोक' समाविष्ट असणं फार गरजेचं आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये या गोष्टी होत असतात पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जिथे मराठी भाषा ओळखीची आहे तिथे निवडक 'मनाचे श्लोक' मुलांना शिकवले पाहिजेत.
शाळेचे स्नेहसंमेलन असतात त्याच्यामध्ये याचे सादरीकरण होऊ शकतात. पण पालकांनी जर ही जबाबदारी स्वीकारली तर अधिक उत्तम. पालक आठवड्यातून दोनदा संध्याकाळी मुलांकडून हे म्हणून घेऊ शकतात. त्यासाठी महिनाभर जरी रेकॉर्डेड मनाचे श्लोक टेपरेकॉर्ड्स वर, मोबाईल्स वर, अलेक्सा वर लावले तरी मुलांचे उत्तम पाठ होऊ शकतात.
माझ्यासाठी मनाचे श्लोक आणि समर्थ रामदास खूप जवळचे आहेत कारण त्याच्याशी माझा बालवयातला एक अनुभव जोडलेला आहे. मी बालवाडीत किंवा पाहिलीत असेन नक्की आठवत नाही पण बाईंनी मला त्यांच्या मांडीवर बसवून माझं आयुष्यातलं पाहिलं बक्षीस दिलं होतं आणि ते म्हणजे 'मनाचे श्लोक' हे पुस्तक. तेव्हा त्या पुस्तकाची किंमत होती अवघी पंचवीस पैसे. म्हणून शाळाशाळांमधून त्याचा अर्थ जर मुलांना समजवला तर ते उचित ठरणार आहे. कारण प्रत्येक श्लोकागणिक ते आपल्याला मनाच्या परिपक्वतेकडे घेऊन जात असतात.
समर्थ म्हणतात,
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना धर्मता नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥
निव्वळ पापबुद्धी मनात नसावी. जेव्हा आपण सातत्याने मनात निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपली वर्तणूकही निगेटिव्ह होते आणि त्यामुळे नीतिमत्ता बाजूला सारतो. त्यावेळेस आपला ऱ्हास होत असतो. समर्थ रामदास स्वामी सेल्फ टॉकमध्ये स्वतःशीच बोलायला काय सांगतात? सारासार विचार मनात नेहमी असायला हवा; म्हणजे चांगलं काय, वाईट काय याचा विचार करता यायला हवा. त्यासाठी मूल्यांची ओळख हवी. मूल्यशिक्षण ते हेच. विवेक आणि अविवेक यांमधली अस्फुट सीमारेषा ओळखता यायला हवी. सद्सद्विवेक म्हणजे सारासार विचार आणि केवळ तो असून उपयोगाचं नाही. तुमचं शरीर, मन, बुद्धी यांनी तारतम्य भावाने नीटपणे हातात हात घालून काम करणं गरजेचं असतं. येणाऱ्या आव्हानांना विवेकी विचारसरणीने उत्तर शोधणे म्हणजे हा श्लोक आहे. पुन्हा याला मॅनेजमेंट भाषेत ‘क्रिटिकल थिंकिंग’ म्हणतात.
शके 1570 मध्ये त्यांनी ‘चाफळ’ इथे ‘राम मंदिरा’ची स्थापना केली. वेगवेगळ्या गावांमध्ये सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली. नंतर त्यांनी देशभरात एकूण अकराशे मठ स्थापन केले. हे सगळं कशासाठी? ‘देवपूजा’ हा त्यांचा उद्देश नव्हता. राम हे पराक्रमाचं आणि मारुती हे शक्ती सामर्थ्याचं प्रतीक मानून ते गुण तरुणांनी अंगी बाणवावेत, संघटित व्हावं हा यामागचा हेतू होता.
ते म्हणतात,
अभ्यास करावा आधी |
ताळबंध पाठांतरे |
अत्यंत साक्षेपी व्हावे |
न व्हावे आळसी कदा |
अचूक शुद्ध लिहावे |
वाचावे नीटनेटके |
साकल्य अर्थ सांगावा |
यथातथ्य प्रचितीने |
सध्याच्या विस्कटलेल्या सामाजिक परिस्थितीत मूल्य हरवल्यासारखी अवस्था झालेली आहे अशा परिस्थितीतही शिक्षणक्षेत्रात रामदासांचे विचार दिशा आणि स्फूर्ती पुरवतात का हे बघणं उद्बोधक ठरतं.
जीवनमूल्य अंमलात आणली नाहीत की प्रगती खुंटते. रामदासांच्या काळात तर समाजाने आत्मविश्वाच गमावला होता. तो परत मिळवून देण्याचे प्रयत्न रामदासांनी केले. आज आधुनिक काळातही शिक्षण आणि नैतिक मूल्यं यांची फारकत झाल्याने चांगल्या विचारांचा अभाव सर्व क्षेत्रांत जाणवतो. ज्ञान, व्यासंग आणि चारित्र्य ही त्रिसूत्री आधुनिक शिक्षणात लोप पावलेली दिसते. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण समर्थ वाड.मयाचा विचार करतो तेव्हा त्यांनी शिक्षणासंदर्भात आणि मानवी जीवनासंदर्भात केलेला सूक्ष्म विचार ध्यानात येतो. शिक्षण म्हणजे काय? तर चांगल्या जीवनाची मूलतत्त्व समजून घेणं! मग आलं तसं वागणं, तसं आचरण! समाजाला हे समजावायचं ठरवल्यावर त्यांनी ठरवलं ‘वन्ही तो चेतवावा रे’ त्यासाठी शक्य त्या सार्या युक्त्या समर्थांनी वापरलेल्या दिसतात.
समर्थांनी मांडलेले सगळेच मुद्दे आजच्या आधुनिक युगातही जसेच्या तसे लागू होतात. आजकालची मुलं ग्राऊंडवर खेळत नाहीत ती मोबाईल नाही तर कम्प्युटरमध्येच अडकलेली असतात. न खेळल्यामुळे व्यायाम नाही; व्यायाम नाही तर चैतन्य नाही. चैतन्य नाही तर ऊर्जा नाही. मनुष्याला आळस येणार आणि शरीर बलवान बनणारच नाही. त्यामुळे मनाने जरी स्ट्रॉंग असलं तरी शरीरानेही तेवढंच स्ट्रॉंग असलं पाहिजे हा विचार समर्थ रामदासांनी त्या काळी मांडून ठेवला हे आपण लक्षात घ्यायला हवं. तत्कालीन वातावरणात जनतेचा आत्मविश्वास जागृत करणाऱ्या रामदासांचं द्रष्टेपण ते हेच!
No comments:
Post a Comment