Saturday 30 April 2022

आर्य चाणक्य: भारतीय राज्यशास्त्राचा जनक

आर्य चाणक्य म्हटलं की सामान्यपणे आपल्या भुवया उंचावतात आणि हा प्रतिभावंत आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस, त्याचे विचार, त्याचं लेखन हा आपला विषयच नाही असं आपण धरून चालतो. एक तर आर्य चाणक्य यांचा काळ सुमारे अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचा. तत्कालीन विचारप्रणालींचा आजच्या काळाशी काय संबंध? असं सोयीस्कर समर्थनही आपल्या मनात कुठेतरी रेंगाळत असतं. शिवाय, आर्य चाणक्य यांचा 'अर्थशास्त्र' हा मूळ ग्रंथ संस्कृतमधला आहे. आज मराठी भाषेतले ग्रंथ नीट अभ्यासण्याची वानवा आहे त्यात संस्कृतची काय कथा? अशी अनेक कारणं शोधत पाठीमागे जात आर्य चाणक्यांपर्यंत पोहोचायचं आपण धाडस करत नाही; पण ते करायला हवं. 


शिक्षण क्षेत्रात राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी तरी निदान चाणक्यनीती समजून घेण्याची गरज आहे. कारण ती आजच्या आधुनिक काळासही लागू पडेल अशी आहे. तसं पाहता सगळ्यांनीच ती अर्थशास्त्राची तत्त्वं आणि सूत्रं समजून घेणं मोठं उद्बोधक ठरतं.

‘अर्थशास्त्र’ या शब्दाने आजच्या आधुनिक वाचकांचा थोडा गोंधळ उडू शकतो. या शब्दाचा अर्थ 'आर्थिक बाबींशी निगडित' इतका संकुचित नाही. 'अर्थशास्त्र' या चाणक्यच्या अजरामर ग्रंथात राज्यशास्त्रविषयक विचार व्यासंगपूर्ण रीतीने उलगडून सांगितले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खास करून कला शाखेच्या विद्यार्थ्यांना चाणक्याचे ग्रंथ आणि त्याची नीती अभ्यासाला आहेत. यातले अनेक मुद्दे हे जीवनाशी निगडित असून ते एकविसाव्या शतकात लागू होतात.

प्राचीन राज्यशास्त्रज्ञांमध्ये आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त यांचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. कौटिल्याच्या आधी भारतात अनेक राज्यशास्त्रज्ञ होऊन गेले असले तरी कौटिल्याला 'भारतीय राज्यशास्त्राचा जनक' म्हणून संबोधलं जातं. तो एक राजनीतिज्ञ होता. त्याच्या पूर्वी प्रचलित असलेल्या सर्व राजनीतिक ग्रंथांचं त्याने अध्ययन केलं होतं. समाजशास्त्र, नीतिशात्र, युद्धनीति, अध्यात्मशास्त्र या विषयांतील त्याचं ज्ञान अलौकिक होतं.

पराक्रमी चंद्रगुप्त मौर्याला हाताशी धरत; त्याला कुटराजनीतीचं प्रशिक्षण देत चाणक्याने मगधचं साम्राज्य नष्ट करत महानंदाच्या वंशाचं समूळ उच्चाटन केलं. नंतर त्याने मगधचं राज्य स्थिरस्थावरही केलं. पुन्हा त्याने स्वतःस अध्यापनाच्या कार्यास वाहून घेतलं. ऍरिस्टॉटलचा समकालीन असलेल्या कौटिल्याने त्याच्यापूर्वीच आपले राज्यविषयक विचार अर्थशास्त्रातून मांडले होते. हा ग्रंथ राजनीतिवरचा मूलभूत पाठ असून त्यात पंधरा प्रकरणं, एकशे पन्नास अध्याय आणि एकशे ऐंशी पोटविभाग आहेत. शब्दरचना अतिशय मार्मिक आहे.

आर्य चाणक्याचं चरित्र सांगण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत; मात्र चाणक्यने राजकीय क्षेत्रात दाखवलेली चमक ही आधुनिक काळातल्या मुत्सद्यांच्या तोडीची आहे. त्याचा जन्म सध्याच्या बिहार राज्यात झाला. गंगानदीकाठचं ‘चणक’ हे त्याचं जन्मगाव. त्यावरून त्याचं ‘चाणक्य’ हे नाव पडलं. त्याच्या वडिलांचं नाव ‘चणक’ असल्याचंही म्हटलं जातं. त्याचं पाळण्यातलं नाव विष्णुगुप्त होतं. तर गोत्र ‘कुटल’ असल्यामुळे ‘कौटिल्य’ हे नाव पडलं. या तीन नावांवरून हे तीनही पुरुष वेगवेगळे असावेत असाही वाद झाला; पण उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून ही तीनही नावं एकाच महापुरुषाची असल्याचं सिद्ध होतं. तत्कालीन मगध साम्राज्यात जन्माला आलेल्या चाणक्याचं शिक्षण हे त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या तक्षशीला विद्यापीठात झालं.

तिथे वैद्यकशास्त्राप्रमाणेच धनुर्विद्या, वेद आणि उपनिषदं, राजनीतिशास्त्र या सगळ्याचा त्याने अभ्यास केला. त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे विद्यार्थीदशा संपताच त्याची नेमणूक त्याच विद्यापीठात प्राचार्य म्हणून करण्यात आली. तिथे तो विद्याज्ञानाचं काम करू लागला. तेव्हा भारतातली राजकीय स्थिती विपरित होती. भारतात अनेक गणराज्यं होती. ‘मगध’ हे गणराज्य सर्वाधिक प्रबळ होतं. सर्व राजकीय उलथापालथींमधलाही चाणक्याचा प्रवास लक्षणीय आहे. इथे आपण आर्य चाणक्य याच्या आजही लागू पडणाऱ्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथाचा थोडक्यात आढावा घेत त्यावर आधारित 571 चाणक्य सूत्रांपैकी काही निवडक सूत्रांच्या मराठी अर्थांचा वेध घेणार आहोत. त्या काळात शिक्षण केवळ राजाच्या वंशातल्या पुरुषांनाच देत होते.

कौटिल्याचं ‘अर्थशास्त्र’ हे व्यवहारज्ञानाने परिपूर्ण आहे. हे आजच्या काळातही उपयुक्त ठरेल असंच आहे. यात चाणक्याने कुटील राजनीतिची महती तर सांगितली आहे शिवाय राजनीतिला मार्गदर्शक ठरतील अशी काही तत्त्वंही नमूद केलेली आहेत. अर्थशास्त्राच्या पंधरा प्रकरणांना ‘अधिकरण’ म्हटलं आहे. 

ग्रंथाच्या सुरुवातीलाच चाणक्याने विद्या किती आणि त्याचा उपयोग याचा ऊहापोह केलेला आहे. त्यात त्याने तर्कशास्त्र, वेदविद्या, अर्थशास्त्र, साम-दाम-दंड अशा विद्या सांगितल्या आहेत. दुसऱ्या अधिकरणात नवीन गावांची निर्मिती कशी करावी हे सांगितलं आहे. किल्ल्यांच्या रचनेचं वर्णन असून त्यावरून त्या काळात किल्लेबांधणी आणि नगररचनाशास्त्रात कितीतरी प्रगती झाली होती हे दिसून येतं. 

या ग्रंथात व्यवहाराशी संबंधित अनेकविध विषय हाताळले आहेत. अगदी चाणक्याने लाचखोरीची प्रवृत्ती नाहीशी होणं अवघड असल्याचंही सांगितलं आहे. त्याचा हा इशारा आजच्या काळातल्या प्रशासन व्यवस्थेला लागू पडतो. त्याच्या काळापूर्वी सरकारी कागदपत्रं लिखित स्वरूपात ठेवली जात नसत. चाणक्याने ती पद्धत रूढ केली. पत्रावर तारीख लिहिताना राज्याभिषेक शके, वर्ष घालावं असा दंडक त्याने घातला.

रत्नांची पारख, खाणींबद्दल माहिती, सराफांचे व्यवहार, जंगलातल्या वनस्पती, हत्यारांची माहिती; जकातीबद्दल माहिती, सूत काढणं आणि कापड बनवणं याविषयी माहिती, शेतीबाबतच्या प्रश्नांचा ऊहापोह, पाणीपट्टी, मद्य प्राशनाविषयीचे नियम, अश्वशाळेच्या अधिकाऱ्यांची कामं, सरहद्दीवरचे अधिकारी, जनगणना, करारनामे आणि मुकदमे, वैवाहिक संबंध आणि स्त्रीधन, काडीमोड, पुनर्विवाह अशा कितीतरी विषयांवर चाणक्याने विवेचन केलेलं आहे. हे सगळे विषय म्हणजे जगण्याचा भाग आहेत; म्हणूनच ते कालातीत आहेत. पद्धती आणि संदर्भ थोडेफार बदलले तरी सर्व सूत्रांमध्ये थोडे फार काळा नुसार बदल करून आज ही ते उपयोगाचे आहे. भाऊबंदातील संपत्ती वाटपाची चाणक्याने सांगितलेली पद्धत आणि आजचे वाटपाबाबतचे कायदे यांत 
फारसा फरक नाही हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळंच विवेचन म्हणजे एक प्रकारचं जीवनशिक्षणच आहे.

चाणक्याने परराष्ट्र व्यवहाराविषयीही विवेचन केलेलं आहे. राज्यावर येणाऱ्या विविध संकटांचा सामना कसा करावा याविषयीही सांगितलेलं आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या संकटांचा त्याने विचार केला; तसाच व्यक्तीच्या अंगी असलेल्या दुर्गुणांमुळे होणाऱ्या हानीचाही विचार केलेला आहे. 

या सर्व अधिकरणांचा आढावा घेताना लक्षात येतं की कसं जगावं याचा हे लेखन म्हणजे वस्तुपाठ आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातलं पंधरावं अधिकरण संपल्यानंतर  'चाणक्यसूत्रं' नावाचं परिशिष्ट त्याला जोडण्यात आलं आहे. ही सूत्रं चाणक्याने स्वतः रचली की दुसऱ्याने याविषयी वाद असला तरी त्यात व्यक्त करण्यात आलेले विचार हे कौटिल्याच्या विचारांशी जुळणारे आहेत. 

ती मराठीतल्या म्हणींप्रमाणेच वापरण्यात येण्याजोगी आहेत. म्हणजे मराठीतल्या म्हणींची पूर्वपीठिका 'चाणक्यसूत्रां'पर्यंत जाऊन पोहोचते असं अभ्यासकांचं मत आहे. ती सूत्रं मूळ संस्कृतमध्ये असून व्यवहाराचा अर्थ उलगडणारी आहेत हे कळण्यासाठी, त्यातल्या काहींच्या मराठी अर्थांवर इथे आपण नजर टाकूया.

वृद्धसेवाया विज्ञानं ।
ज्ञानी (वृद्ध) माणसाच्या सेवेमुळे अनुभजन्य ज्ञान मिळतं. 

विज्ञानेनात्मानं संपादयेत ।
व्यावहारिक ज्ञानामुळे आत्मज्ञान मिळतं. आपल्या प्रगतीचे मार्ग शोधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवेत.

अलब्धलाभो नालसस्य ।
आळशी माणसाला ऐश्वर्याची प्राप्ती होत नाही. एकंदरीत आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. 

कार्यं पुरुषकारेण लक्ष्यं संपद्यते |
प्रयत्नपूर्वक केलेल्या कामात यश मिळतं.

सर्व जयत्यक्रोध: |
ज्याने रागाला जिंकलं आहे तो जग जिंकू शकतो.

विद्या धनमधनानाम् |
विद्या हीच निर्धनाची प्रमुख संपत्ती आहे.

गुरूवशानुवर्ती शिष्य: |
गुरूच्या आज्ञेनुसार शिष्याने वागावं.

गुरूणां माता गरीयसी |
आई ही सर्व गुरूंमध्ये श्रेष्ठ आहे.

सर्वावस्थासु माता भर्तव्या |
कुठल्याही स्थितीत आईचा सांभाळ केलाच पाहिजे.

भूषणानां भूषणं सविनया विद्या |
विद्या विनयेन शोभते. विनयसंपन्न विद्या ही सर्वश्रेष्ठ आभूषण आहे.

यथा श्रुतं तथा बुद्धि: |
जशी विद्या तशी बुद्धी.

नाचरिताच्छास्त्रं गरीय: |
आचरणाहून श्रेष्ठ असं शास्त्र नाही.

निशान्ते कार्य चिन्तयेत् ।
पहाटेच्या वेळी दिवसभरात काय काय कामं करायची आहेत त्याचं नियोजन करावं.

नास्ति बुद्धिमतां शत्रु: ।
विद्वान माणसाला कोणी शत्रू नसतो.

श्व: कार्यमद्य कुर्वीत ।
उद्या करायचं काम आजच करावं.

शास्त्रप्रयोजनं तत्त्वदर्शनं ।
तत्त्वज्ञान सांगणं हाच शास्त्राचा हेतू आहे.

तत्त्वज्ञानं कार्यमेव प्रकाशयति ।
तत्त्वज्ञान प्राप्त झालं की कर्तव्याची जाणही येते.  

अहिंसालक्षणो धर्म: ।
अहिंसा हेच धर्माचं लक्षण आहे.

विज्ञानदीपेन संसारभयं निवर्तते ।
विज्ञानामुळे संसाराची भीती नष्ट होते.

तस्मात्सर्वेषां कार्यासिद्धिर्भवति ।
तपामुळेच सर्व कार्यं सफल होतात.

आधुनिक शिक्षण तरी दुसरं काय सांगतं? हेच तर मुलांना शिकवणं अपेक्षित आहे. म्हणूनच चाणक्यला पर्याय नाही. परंपरागत या सदरात घालून पूर्वीचं सारं दूर ठेवता येत नाही; त्याचा आधार घेतच आपल्याला पुढे जावं लागतं. फक्त, आधुनिक काळाप्रमाणे त्याला वेगळाले संदर्भ द्यावे लागतात. कारण, विज्ञानाचा अर्थ अतिशय वेगाने पुढे जात असतो; बदलत असतो. काळानुरूप तो बदलावा आणि विचारात घ्यावा लागतो. 

उदाहरणार्थ आता जलदगतीने होत असलेली तांत्रिक प्रगती. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा होत असलेला प्रभावी वापर. आजच्या आधुनिक काळात चाणक्यांनी काय केलं असतं? संगणकालाही केंद्रस्थानी ठेवत त्याच्या अनुकूलतेच्या स्पष्टीकरणार्थ आणखीन दहा सूत्रं जोडली असती.

केवळ वानगीदाखल ही सूत्रं आपण बघितली. चाणक्याची काही महत्त्वपूर्ण वचनंही आहेत. त्यांपैकी शिक्षणाचं महत्त्व सांगणारी वचनं अशी-

विद्वत्वंचं नृपत्वंच | नैव तुल्यं कदाचन |
स्वदेशे पूज्यते राजा | विद्वान् सर्वत्र पूज्यते ||
ज्ञानी माणूस आणि राजा यांची कधीही तुलना करू नये. कारण राजाला केवळ त्याच्या देशातच मानसन्मान असतो; परंतु ज्ञानी माणसाला देशाच्या सीमांचं बंधन नसतं. कारण ज्ञानी माणसाला सर्वत्र मानसन्मान मिळत असतो.

ताराणां भूषणं चंद्रो | नारीणां भूषणं पति: |
पृथिव्यां भूषणं राजा | विद्या सर्वस्य भूषणं ||

ज्याप्रमाणे चंद्र हा ताऱ्यांचं भूषण आहे, पत्नीला पती, पृथ्वीला राजा असणं हे भूषण आहे परंतु एखाद्याजवळ विद्या असणं हे सर्वाधिक भूषणावह आहे. आजच्या काळातही आपल्याला याचा अनुभव येतो. कारण विद्या असणं हेच आजच्या काळाचं प्रमुख भूषण आहे. आपापल्या क्षेत्रात पारंगत असणाऱ्यांना सध्या मोठी किंमत असल्याचं दिसून येतं.

लालने बहवो दोषा । स्ताडने बहवो गुणा : |
तस्मात्पुत्रं च शिष्यं च | ताडयेत् न तु लालयेत् ||

अती लाड केल्यामुळे मुलं बिघडतात. लाड न करता वेळप्रसंगी मुलांना शिक्षा केल्यास त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असतात. अती लाडाने मुलं बिघडत असल्यामुळे मुलांचे फार लाड करू नयेत असं चाणाक्य सांगतात. हा उपदेश आजच्या काळाला तंतोतंत लागू पडतो.

कामधोनुगुणा विद्या | ह्यकाले फलदायिनी |
प्रवासे मातृसदृशी | विद्या गुप्तं धनं स्मृतम् ।।

विद्या ही कामधेनू आहे असं चाणाक्य मानतात. कारण संकटकाळी विद्याच उपयोगी येते, जी मनुष्याला धन मिळवून देते. त्याची कीर्ती सर्वत्र पसरवते. आईप्रमाणे ती आपलं रक्षण करते. अशी ही विद्या कल्पवृक्षाप्रमाणे मनुष्याला सर्व काही देत असते.

चाणक्य विद्येला कामधेनू मानतात. विद्येला कल्पवृक्ष म्हणतात. कामधेनू काय किंवा कल्पवृक्ष काय आपोआप किंवा आपसुक विनामेहनतीचं काही देत नसतात. चांगल्या इच्छा बाळगण्याचं बळही मेहनतीनेच मिळवावं लागतं. ते आपोआप निर्माण होत नाही. सर्व विद्यार्थ्यांनी खासकरून कॉलेजला जाणाऱ्या तरुणांनी चाणक्य चा अभ्यास करावा. 

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...