Friday, 6 May 2022

महात्मा गांधींची ‘नई तालीम’ हेच खरं उत्तर!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये नोबेल विनर कमी, ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारे कमी, शास्त्रज्ञांची संख्या बोटावर मोजण्याइतकी..म्हणजे इतके कमी की जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत नाही. कारण या यादीत यायला किमान त्या देशाचे 100 शास्त्रज्ञ तरी लागतात. भारताच्या फक्त दहा शास्त्रज्ञांची नावं या यादीत आहेत. याचं कारण ब्रिटिशांनी लादलेली शिक्षणपद्धती. ‘शिक्षणपद्धती’ या शब्दांमध्ये 'पद्धती' हा शब्द फार महत्त्वाचा आहे. याला इंग्रजीमध्ये सिस्टिम म्हणतात. ब्रिटिश अधिकारी सिस्टिम लावण्यात माहिर होते. एकदा सिस्टिम लागली की ती तोडणं मुश्कील.


म्हणून तर त्यांनी जगातल्या बहुतांश देशांवर राज्य केलं. ही सिस्टिम कशी तोडायची याचं सखोल ज्ञान महात्मा गांधी यांना होतं. हिंसा करून स्वातंत्र्य मिळू शकत नाही. ब्रिटिशांची सिस्टिम तोडता येणार नाही.. म्हणून अहिंसा हे सूत्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी वापरलं. तसंच शिक्षणाबाबत होतं. ब्रिटिशांना मेंदू न वापरणारं.. सांगू ते काम करणारं.. असं मनुष्यबळ हवं होतं. म्हणून मेकॉलेने तशी शिक्षणपद्धती आणली. ज्यामुळे माणूस शिकेल पण विचार करू शकणार नाही. हे गांधीजींना माहिती होतं म्हणून त्यांनी ‘नई तालीम’ ही भारतीय शिक्षण प्रणालीची वैचारिक बैठक ठरवली.

त्याचे काही प्राथमिक प्रयोग केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना ही ‘नई तालीम’ची शिक्षणपद्धती आणायची होती. जी शंभर टक्के भारतीय शिक्षणव्यवस्थेला धरून होती; पण आपलं दुर्दैव की स्वातंत्र्यानंतर गांधी दंगली विझवण्यात अडकले आणि पुढे त्यांचा खून करण्यात आला. गांधी किमान पुढील दहा वर्षं जरी जिवंत राहिले असते तर आज भारताचे किमान शंभर शास्त्रज्ञ तरी यादीत असते. अशी नक्की काय होती नई तालीम शिक्षण प्रणाली?

खरं तर महात्मा गांधी यांची १५१ वी जन्मशताब्दी आपण साजरी करतोय. महात्मा गांधी म्हटलं की मनामध्ये प्रथम अहिंसा, शांती हे विचार येतात. तर डोळ्यांसमोर गांधीजींची तीन माकडं येतात. आपण सर्वजण समजतो की महात्मा गांधी यांची सर्वात उत्तम भेट ही ‘सत्याग्रह’ आहे. हे खरं आहे की सत्याग्रहातूनच लोकतंत्राचा पाया मजबूत झाला पण सत्याग्रह ही सर्वोत्तम भेट नाही. मग महात्मा गांधी यांची सर्वोत्तम भेट कुठली?

टाईम मॅगझिनने विसाव्या शतकातलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून गांधींचं नाव जाहीर केलं. गांधी म्हणजे सत्याग्रहाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य देणारी महान व्यक्ती; पण या व्यक्तीचं शिक्षणातलं योगदान काय? आणि ते सत्याग्रहापेक्षा सर्वश्रेष्ठ कसं? १९३८ साली महात्मा गांधी यांनी स्वतः काँग्रेस अधिवेशनात शिक्षणाचे विचार मांडले. हे मांडतांना स्वतः गांधीजी म्हणाले, "मी आज या देशात संपूर्ण विश्वासावर काही नवे विचार मांडत आहे. आत्तापर्यंत ज्या ज्या विचारांची देणगी जगाच्या चरणी अर्पण केली आहे त्यांपैकी सर्वाधिक क्रांतिकारी आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा विचार आहे. याहून अधिक मूल्यवान आणि महत्त्वाची अशी दुसरी कोणती देणगी मी जगासमोर ठेवू शकेन असं मला वाटत नाही. या विचारांमध्ये माझ्या सार्‍या रचनात्मक कार्यक्रमांना व्यावहारिक मूर्तरूप देण्याची क्षमता सामावलेली आहे. ज्या प्रकारच्या नव्या जगासाठी माझी सारी धडपड चाललेली आहे ते नवं जग यामधून निर्माण होऊ शकेल. हा माझा अखेरचा वारसा आहे."

म्हणजे स्वतः महात्मा गांधींनी म्हटलं आहे की ही माझी जगाला अखेरची सर्वोत्तम भेट आहे. या सर्वोत्तम भेटीचं नाव आहे ‘नई तालीम’. म्हणजे नवं शिक्षण. खरं तर सर्वात प्रथम फिनिक्स आणि टेलस्टॉय आश्रमात गांधीजींनी शिक्षणाचा विचार केला. आश्रमात राहणारे त्यांचे कार्यकर्ते, सत्याग्रही, अनुयायी त्यांच्या मुला-मुलींची, कळतनकळत शिक्षणाची जबाबदारी गांधीजींवर आली आणि आश्रमातच शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले. तिथे त्यांनी शाळा चालवल्या. भारतामध्ये गांधीजी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, “स्वतंत्र भारतासाठी शिक्षण सुद्धा स्वतंत्र हवं.” त्याचं स्वरूप कसं असावं हे ठरवण्यासाठी वर्ध्यामध्ये शिक्षण परिषद बोलवली गेली.

जमनालाल बजाज यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या शिक्षण परिषदेमध्ये जाकीर हुसेन, आचार्य विनोबा भावे, आचार्य काकासाहेब कालेलकर, जगतराम देवीप्रसाद आणि शिक्षणातली अतिशय महत्त्वाची व्यक्ती ई. डब्ल्यू. आर्यनायकम आणि आशादेवी यांनी भाग घेतला. त्यांनी त्याकाळी लंडनमध्ये शिक्षणशास्त्रामध्ये पीएच.डी केली होती. ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हापासून रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत शांतिनिकेतनचं संपूर्ण काम पाहत होते. या शिक्षण परिषदेचं मुख्य नेतृत्व करत होते महात्मा गांधी. 1938 मध्ये त्यांनी ‘नई तालीम’चा विचार मांडला.

महात्मा गांधी यांचा ‘नई तालीम’ हा शिक्षणविचार काय होता? नक्की महात्मा गांधी यांनी शिक्षणाची काय व्यवस्था जगाला दिली? आजच्या एकविसाव्या युगातील सर्व प्रश्नांची उत्तरं गांधीजींच्या शिक्षण प्रणालीमध्ये आहेत का? याचं उत्तर शोधण्याआधी किंवा ‘नई तालीम’ समजून घेण्याआधी आजच्या शिक्षणाची काय अवस्था आहे ते समजून घेतलं पाहिजे. नॅशनल एम्पलोयाबिलिटी रिपोर्ट ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सर्व्हे रिपोर्ट सांगतो की, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल शाखेतील फक्त ७% विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होण्यासाठी लागणारं स्किल-कौशल्य-कला अवगत आहे. 93% विद्यार्थी इंजिनिअर होतात पण इंजिनिअरिंग केल्यानंतर जे कौशल्य यायला हवं ते येतच नाही.

भारतामध्ये पंधराशेहून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. दरवर्षी चार लाखांहून अधिक इंजिनिअर्स बाहेर पडतात पण वर्ल्ड क्लास टॅलेंट म्हणून ज्यांची निवड व्हायला हवी त्यांची संख्या वीस ते पंचवीस हजार एवढ़ी आहे. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये भारताचे तरुण आहेत. इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरला जॉब नाही असं नाही पण विद्यार्थ्यांना अपेक्षित गुणवत्ता प्राप्त झालेली नसते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती नाही, विधायक विचार नाहीत,. नवं असं काही करण्याची हिम्मत नाही.. कारण आपली शिक्षणपद्धती नवा असा कुठलाच विचार मांडत नाही. कारण ‘घोका आणि ओका’ ही आपली शिक्षणपद्धती झाली आहे.

२१ अपेक्षित, गाईड यांमधून रेडीमेड उत्तरं परीक्षेच्या आधी पाठ करायची आणि परीक्षेच्या दिवशी ती उतरवायची आणि परीक्षा झाली की विसरायचं. ते रोजच्या व्यवहारात कुठे वापरण्याची कसलीही तसदी कुणीही घेत नाही. या सगळ्यातून स्मृतीकेंद्रित शिक्षणपद्धती निर्माण झाली. महात्मा गांधी यांच्या ‘नई तालीम’मध्ये स्मृतीकेंद्रित शिक्षण मुळीच नव्हतं. ‘नई तालीम’चा संपूर्ण पाया हा अनुभवातून शिक्षण यावर आधारित होता.

‘एज्युकेशन फॉर लाईफ, एज्युकेशन थ्रू लाईफ’ ही नवी व्याख्या महात्मा गांधी यांनी शिक्षणाला दिली. गांधी यांचा दोन गोष्टींवर खूप भर होता. एक, राष्ट्राच्या मूलभूत गरजा भागवेल असं शिक्षण आणि शिक्षणात विद्यार्थ्यांना स्वावलंबन हे शिकवलंच पाहिजे. समाजाला उपयोगी पडेल असं कुठलंही काम हे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हाती असलं पाहिजे असे त्यांचे विचार होते.

शिक्षणात शारीरिक श्रमाला प्रचंड महत्त्व त्यांनी दिलं. मुलांनी रोज शारीरिक श्रमाची कामं करावी. मग त्यामध्ये बागकाम, फळझाडांची देखभाल, स्वयंपाकाच्या कामात मदत, लाकूड तोडणं, खड्डे करणं, सुतारकाम, डोक्यावरून ओझी वाहणं अशी बरीच कामं शिक्षणात असावी. आता तुम्ही म्हणाल की शेतीकाम बांधकामसारखी कामं मुलांनी का करावी? किंवा स्वाबलंबनाला गांधीजींनी एवढं महत्त्व का दिलं? तर आजचं बालमानसशास्त्र सांगतं की मुलांचा मेंदू घडतो कसा…मुलं शिकतात कशी

एकविसाव्या शतकातली शिक्षणक्षेत्रामधली सर्वांत मोठी बाब ही आहे की, लहान मुलांच्या मेंदूचा विकास कसा होत असतो याविषयी संशोधन या काळात झालं. पहिल्या बारा वर्षांमध्ये त्यातही पहिल्या आठ वर्षांमध्ये लहान मुलांच्या मेंदूची जडणघडण होत असते. बारा वर्षानंतर किमान पाचशे मिलियन मज्जापेशी या नष्ट पावतात. जितक्या जास्त मज्जापेशी जिवंत राहतील, सर्व मज्जापेशी यांची एकमेकांशी जेवढी घट्ट जुळणी होईल, त्यांच्यात सिनॅप्स निर्मिती होईल.. तेवढ्या बाळाच्या विविध क्षमता विकसित होतील. तेवढं बाळ अधिक बुद्धिमान बनेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जुळणी बालवयातच होत असते.

ही जोडणी होते कशी? लहानपणी त्याला किती विविध अनुभव मिळतात आणि त्याहूनही महत्त्वाचं, हे सर्व अनुभव पाच इंद्रियांद्वारे तो किंवा ती कसे घेते; म्हणजे लहान मुलं लहानपणी जेवढी विविध कामं करतील अर्थातच अनुभव घेतील तेवढं त्याच्या मेंदूला स्टिम्युलेशन मिळेल आणि त्यातून विविध मज्जापेशींची घट्ट जुळणी होईल. महात्मा गांधी आपल्याला ऐंशी वर्षांपूर्वी म्हणाले की, “मुलांना स्वावलंबन शिकवा. बागकाम, शेतीकाम शिक्षणाचा भाग असूद्या.” थोडक्यात, मुलांच्या मेंदूचा विकास यातून होतो. बागकाम, शेतीकाम ही त्यांनी दिलेली उदाहरणं आहेत. स्वावलंबन या शब्दात सर्व अनुभव येतात.

गांधीजी म्हणतात, “पहिल्या आठ वर्षांत मुलांना स्नायूविषयक शिक्षण द्यावं आणि ते शिक्षणातील तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली व्हावं. याचा अर्थ बालवाडीला ज्या शिक्षिका हव्या त्या ट्रेन्ड उच्चशिक्षित हव्यात. कारण पहिली आठ वर्षं बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडण्याची असतात. भारतामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवायला उच्चशिक्षित असतात आणि बालवाडीला बारावी पास शिक्षक. जपान, फिनलँड या सर्व देशात प्री-प्रायमरीच्या शिक्षकांना सर्वात जास्त पगार-सन्मान असतो.” ते उच्चशिक्षित, बालमानसशास्त्रातले तज्ज्ञ असतात. गांधीजींना असे शिक्षक अपेक्षित होते.

गांधीजीं पुढे म्हणतात की, “शिक्षणाचा निसर्गाशी आणि जीवनाशी सुसंवादी आणि घनिष्ट संबंध असला पाहिजे. शेतीशी जोडलं न गेलेलं जीवन अपूर्ण होय. या शिक्षणतत्त्वाची सध्या तर खूपच आवश्यकता आहे. जीवनाच्या प्रश्नांना जे भिडतं ते शिक्षण. आता सी.बी.एस.ई बोर्डाने लाईफ स्किल नावाचा सब्जेक्ट काढला आहे. गांधीजींनी हे सर्व ८० वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी रुद्र स्वरूप धारण केलं. कारण शेती हा विषय शिक्षणात नाही; त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल आपुलकी, संवेदना नाही. शेती विषयाने मुलांच्या मेंदू मज्जापेशी सर्वात जास्त विकासित होतात.

आज आपण इमोशनल कोशन (EQ), सोशल कोशन (SQ) या संकल्पनांवर चर्चा करतो. ते ‘नई तालीम’मध्ये आधीच सर्व समाविष्ट केलेलं आहे. ‘नई तालीम’ हे नवं शिक्षण आहे म्हणून गांधी म्हणतात, “काळ जसा बदलेल तसा त्याचा ढाचा बदलणं आवश्यक असेल.” म्हणजे गांधी कधीच म्हणत नाहीत की ‘नई तालीम’चं शिक्षण हे कायमस्वरूपी ठेवा. ते त्या त्या शतकांच्या गरजांनुसार बदलत गेलं पाहिजे. विज्ञान आणि अध्यात्म याची त्याला जोड असणं आवश्यक आहे. आज गांधी अवतरले असते तर कदाचित त्यांनी हातात चरखा दिला नसता. वेगळं काही साधन हातात दिलं असतं जे आजच्या काळाला अनुरूप असेल.

शिक्षणात सतत प्रयोग होत राहिले पाहिजेत यावर त्यांची श्रद्धा होती. गांधीजी म्हणतात, “नई तालीम’ हे शिक्षण, अहिंसेचं शिक्षण आहे. स्वातंत्र्य आणि सहकार हा त्याचा पाया आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे की त्या स्पर्धेमधून विद्यार्थी नैराश्यामध्ये जात आहेत. एकमेकांचा द्वेष करत आहेत. कारण स्पर्धेमधून कधीच प्रेम निर्माण होत नाही. निर्माण होते ती फक्त द्वेषभावना. सहकार ही भावना एकविसाव्या शतकातील पहिल्या पाच कौशल्यांमधली आहे. ज्यांच्यामध्ये हे भावनाकौशल्य असेल त्यांना सर्वांत जास्त पगाराची नोकरी मिळेल असे विविध रिपोर्ट सांगतात. ‘नई तालीम’मध्ये अशी बरीच तत्त्व आहेत की जी एकविसाव्या शतकातील प्रत्येक प्रश्नांवर उत्तर ठरतात.

गांधींचा आग्रह होता तो म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एका ग्रामीण हस्त उद्योगाची जोड दिली पाहिजे. ते कौशल्य शिकवलं पाहिजे. आज आपण सर्वजण प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे म्हणतो किंवा विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी जे शिक्षण लागतं ते शाळेपासूनच असलं पाहिजे असा त्याचा अर्थ होतो.

महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं यावर वैचारिक मतभेद होते. रवींद्रनाथ टागोर यांचा आग्रह असायचा की मातृभाषेतून शिक्षणाचं माध्यम असावं; तर महात्मा गांधी याला पूर्णतः सहमत नव्हते. महात्मा गांधी स्वतःलाच प्रश्न विचारतात की ज्ञान मिळवण्याचं माध्यम कुठलं असतं? त्यांनी माहिती आणि ज्ञान यात फरक केला आणि त्यांनी या प्रश्नाचं उत्तर स्वतः दिलं, ‘ज्ञान हे अनुभवातूनच मिळतं.’ त्यामुळे शिक्षणाचं माध्यम हे ‘अनुभव’ असलं पाहिजे. मग भाषा तुम्ही कुठलीही वापरा. ते म्हणायचे की इंग्रजी ही इतर भाषांसारखीच एक भाषा म्हणून शिकवावी.

थोडक्यात काय, महात्मा गांधी यांनी पुस्तकाचा संबंध रोजच्या व्यवहाराशी जोडला. श्रमनिष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी शिक्षणात आणला. ‘नई तालीम’ची महत्त्वाची तीन-चार तत्त्वं आणि मुद्दे मी या लेखात मांडले आहेत; पण या सर्व तत्त्वांचं सार हे आहे की विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण द्यावं. जीवनातल्या सर्व प्रश्नांना ते भिडणारं हवं. श्रमनिष्ठा, अहिंसा, सहकार ही मूल्यं मुलांमध्ये रुजावी.

आता प्रश्न असा की हे सर्व त्यांनी सांगितलं, मग ते शिक्षण धोरणांमध्ये का नाही आलं? २००५ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सर्व समाविष्ट आहे. त्या आधीच्याही शैक्षणिक धोरणांमध्ये आहे. तसंच या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये सुद्धा अनुभवाधारित शिक्षणपद्धती असावी याच्यावर लक्ष केंद्रित केलं. पण तरी हे सर्व व्यवहारात का येत नाही? कारण आपण एक गोष्ट विसरतो की, ती म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्षं राज्य केलं. त्याचं महत्त्वाचं कारण ब्रिटिश सिस्टिम बनवण्यात अतिशय कुशल होते. त्यांनी शिक्षणाची अशी पद्धती बनवली की ती आपण तोडू शकत नाही.

त्यांना डोकं वापरणारे, डोकं चालवणारे नको असल्याने त्या पद्धतीची शिक्षणपद्धती त्यांनी आपल्यामध्ये रुजवली. ती इतकी घट्ट रुजली आहे की स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली तरीही ती आपण मोडीत काढू शकत नाही. ‘घोका आणि ओका’ हे आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये मुळीच नाही तरीही शाळा- शाळांमध्ये, कॉलेजमध्ये असं शिकवलं जातं कारण ब्रिटिशांनी लावून दिलेली सिस्टिम. तोडण्यामध्ये आपण असमर्थ ठरलो आहोत. ती तोडून आज खऱ्या अर्थाने अंमलात आणू शकण्याचं सामर्थ्य महात्मा गांधींच्यात होतं.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ते म्हणाले होते, “स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र शिक्षण हवं.” ते त्यावर काम सुरूच करणार होते; पण गांधीजींच्या हत्येने भारताच्या असंख्य पिढ्यांचं नुकसान झालं, शिक्षणात आपण मागे पडलो. जगातील सर्वात उत्तम शिक्षणपद्धती ही फिनलँड देशाची मानली जाते. त्या देशाची शिक्षणतत्त्व जर तुम्ही अभ्यासली तर ती सर्व तत्त्वं ‘नई तालीम’ या महात्मा गांधीजींच्या शिक्षणतत्त्वांशी मिळतीजुळती दिसतील. यावर आपल्याला अंदाज येऊ शकतो की महात्मा गांधी यांची ‘नई तालीम’ शिक्षणप्रणाली किती परिणामकारक होती. अजूनही वेळ गेली नसून ‘नई तालीम’चे प्रयोग शाळाशाळांमध्ये व्हायला हवेत.

ज्यांना कोणाला ‘नई तालीम’ या महात्मा गांधीजींच्या शिक्षणप्रणालीबद्दल अधिक समजून घ्यायचं असेल त्यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे सरांचे यावरील ग्रंथ जरुर वाचावेत. आता नवं शैक्षणिक धोरण आलेले आहे. या नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये नई तालीम चे बरशे मुद्दे आणि संकल्पना पुन्हा आलेले आहेत. अपेक्षा आहे की यावेळेस हे धोरण आपण काटेकोर अंमलबजावणी करू आणि नई तालीम हे प्रत्यक्षात उतरवू. कारण एकविसाव्या शतकातील शिक्षणाचं सूत्र ‘नई तालीम’ मध्येच आहे असं मला वाटतं.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक




No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...