Friday, 27 May 2022

संत तुकारामांचा विद्रोह आणि आजचं शिक्षण

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

महाराष्ट्राला फार मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेतलं संत तुकाराम हे उठून दिसणारं नाव. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असं म्हटलं जातं ते फार अर्थपूर्ण आहे. ज्ञानदेवांनी जीवनाचा अर्थ उलगडणारं तत्त्वज्ञान जनसामान्यांना समजावून सांगितलं. तर तुकारामांनी आपल्या अभंगांतून आणि गाथेतून त्यातल्या खाचाखोचा सडेतोडपणे दाखवल्या. तुकाराम म्हटलं की विद्रोह डोळ्यांसमोर उभा राहतो. विद्रोह म्हणजे केवळ निषेध नव्हे. तर, विद्रोह म्हणजे बंडखोरी अधिक निषेधात्मक कृती.

तुकाराम खरोखरच बंडखोर होते. एकीकडे ‘वृक्षवल्लींना’ सोयरे मानण्याइतकी संवेदनशीलता त्यांच्यापाशी होती; आणि दुसरीकडे तारतम्य राखत समाजातल्या अंधश्रद्धेवर आसूड ओढण्याचा सडेतोडपणाही त्यांच्याकडे होता. अंधश्रद्धेवर आणि चुकीच्या रूढीपरंपरांबाबत प्रश्न उभे करणारे ते पहिले संत होते. मुलांना प्रश्न विचारायला शिकवणं याला शिक्षणक्षेत्रात ‘शिक्षण’ म्हटलं जातं. तुकारामांनी त्या काळात लोकांना प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं; हे समाजशिक्षणच होय.

'नवसाने होई पुत्र तर का करावा पती?' असं ते स्पष्टपणे, रोखठोकपणे विचारतात. नवसाने जर मुलं होणार असतील तर लग्नच कशाला हवं? पतीची गरजच काय? असे अनेक बाबतींत तत्कालीन समाजाच्या विरोधात जाणारे प्रश्न त्यांनी उभे केले. त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. कारण ते प्रश्न आणि त्यांची खरी उत्तरं पुरोहितवर्गाच्या विरोधात जाणारी होती.

तुकारामाच्या गाथा पाण्यात बुडाल्या नि मग त्या आपोआप वर आल्या हे मानणं ही अंधश्रद्धा आहे. जो माणूस अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात होता, त्यांच्याच नावाने अंधश्रद्धा पसरवली जाते; त्याला कारण असं आहे, तुकाराम महाराजांचे अभंग अशिक्षितांपर्यंतही पोहोचले होते. पुरोहितवर्ग, जो तुकोबांच्या विरोधात होता त्यांच्यासाठी ही गोष्ट हानिकारक होती. म्हणून त्यांनी त्या नदीत बुडवल्या. पण काही फायदा झाला नाही. त्या तरंगून वरती आल्या याचा अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. लोकांना त्या पाठ झाल्या होत्या; त्यामुळे कोणीही कितीही आणि काहीही प्रयत्न केले तरी जनमानसातून त्या कधीच पुसल्या गेल्या नाहीत आणि जाणार नाहीत. हा सुज्ञपणे केलेला विचारच त्या बाबतीतलीही अंधश्रद्धा दूर राखू शकतो. अशिक्षित समाजापर्यंत चांगले विचार पोहोचवणारे असे संत तुकाराम. हाच प्रयोग शिक्षणक्षेत्रात  झालाय का ते तपासलं तर मला  तुकारामांचा हा प्रयोग गिजुभाई बधेका, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, अशा ज्येष्ठ शिक्षणतदतज्ज्ञांनी वापरलेला दिसतो. यांनी अशिक्षित पालकांकडे दारोदारी जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावलं आणि त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं.

आत्ताचं शैक्षणिक धोरण सांगतं, ‘प्रश्न विचारा, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा; जिज्ञासा, कुतूहल निर्माण करा.’ या सगळ्या पद्धती तुकाराम महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून, अभंगांतून त्या काळामध्ये मांडल्या; म्हणूनच ठामपणे असं म्हणता येतं की आजच्या नव्या शैक्षणिक धोरणांमधील विचारांचा उगम आपल्याला संत तुकारामांच्या वाड.मयात, त्यांच्या विचारांत सापडतो.

ते वारकरी संप्रदायातील होते; पण त्यांनी कधी अंधानुकरण केलं नाही. भक्तीचा खरा अर्थ त्यांनी बंधुभावाने सर्वांना उलगडून सांगितला. वैदिकांचा ईश्वर सोवळ्या-ओवळ्यात अडकलेला होता. पण तुकारामांचा ईश्वर तसा नाही. ‘तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मूर्तिपूजा महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची’ असं ते म्हणतात.

‘जे का रंजले गांजले |
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा |
देव तेथेचि जाणावा ||’

हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. रंजल्यागांजल्या लोकांना जो जवळ करतो तोच खरा साधू. देवाची पूजा करत असताना असा एखादा खरा साधू दारात आला तर देवाची पूजा बाजूला सारून त्या साधूची पूजा करावी असं ते सांगतात. हे खऱ्या अर्थाने समाजशिक्षणच नव्हे का?
तुकारामांनी माणुसकीच्या मूल्यांमध्ये ईश्वर पाहिला.

आपल्या मनातच देव असतो म्हणणारे तुकाराम अनेकदा त्यांच्या पांडुरंगाशी युद्धही पुकारतात. सोवळ्या ओवळ्यातल्या ईश्वराला त्यांनी केलेला विरोध हा विद्रोहाच्या स्वरूपाचा आहे. अर्थात, या संदर्भात बरीच मतमतांतरं असली तरी मुद्दा असा आहे की मूर्तीत न शोधता देव अंतरी शोधावा हा शहाणपणाचा धडा तुकोबांनी तत्कालीन समाजाला शिकवला; आणि या शिक्षणाची परंपरा आजवर राखली जात आहे आणि भविष्यकाळातही हे मूल्य तितकंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे ही बाब त्या मूल्याची कालातीतता सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे.

बोल्होबा आणि कनकाई या दांपत्याचा हा पुत्र. पुणे जिल्ह्यातल्या देहू इथला त्यांचा जन्म; 1608 ते 1650 हा त्यांचा कालखंड. अवघं बेचाळीस वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यांचं कुलनाम मोरे. त्यांचा परंपरागत व्यवसाय वाण्याचा होता. शिवाय त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापार महाजनकीची वृत्ती होती. महाजन म्हणजे बाजारपेठेच्या व्यापारव्यवहारातील वजनं-मापं, मालाची देवघेव इत्यादींवर देखरेख करणारा आणि व्यापारी कर वसूल करणारा अधिकारी. त्यांच्या मालकीची इनामाची शेती आणि सावकारीही होती. म्हणजे एकूण, तुकोबांचं घराणं सुखवस्तू आणि प्रतिष्ठित होतं. वाडवडिलांपासून घराण्यात विट्ठलभक्ती आणि वारीची प्रथा पाळली जात होती. तत्कालीन सुसंस्कृत घराण्यातील व्यक्तींप्रमाणेच त्यांचं संस्कृत-प्राकृत ग्रंथांच्या अध्ययनातून शिक्षण झालं होतं.

घरचा व्यवसाय सांभाळण्याच्या दृष्टीने लेखन-वाचन-जमाखर्च यांविषयीची माहितीही त्यांना अवगत होती. ते बहुश्रुत तर होतेच. ‘आपण यातिहीन असल्यामुळे वेदाध्ययनाला आचवलो’, याची खंत त्यांना सुरुवातीला वाटे; मात्र पुढे ज्ञान-भक्ती-वैराग्याने परिपक्व झाल्यावर वेदरहस्यच आपल्या वाणीवर कवित्वरूपाने प्रकट झाल्याची प्रचीती त्यांना झाली; ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसी च ठावा’ असं ते आत्मविश्वासाने म्हणू लागले.

मुलांनी लहानपणी घेतलेले अनुभव त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार उपयुक्त ठरतात असं आता बालमेंदूमानशास्त्रातील संशोधनाने सिद्ध केलं आहे; हे आपण वारंवार मान्य करत आहोत.
तुकाराम लहानपणी चेंडूफळी, हुंबरी, हुतूतू, विटीदांडू असे अनेक खेळ खेळले असावेत. टिपऱ्या, हमामा, फुगड्या इ.खेळही त्यांनी मनापासून पाहिले असावेत असं म्हणता येतं. कारण क्रीडाविषयक अनेक सुंदर अभंग त्यांनी रचले. त्यांच्या गाथांमध्ये खेळासंदर्भातलं वैविध्य लक्षणीय रीतीने येतं; जे अन्य संतांच्या गाथांत विशेष आढळत नाही.


चौदाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला. खेडमधल्या आप्पाजी गुळवे यांची मुलगी अवलाई त्यांची पत्नी. 1630/31 मध्ये महाराष्ट्रात जो भीषण दुष्काळ पडला त्यात ती निवर्तली. त्यांचा मुलगाही गेला; आणि दुष्काळ जणू तुकोबांच्या आयुष्यातला ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. त्यांनी दुसरं लग्न केलं. पण त्यांना दारिद्र्याने ग्रासलं. ते अधिक अंतर्मुख होऊन अध्यात्माकडे वळले.

जीवनातल्या दु:खं-संकटांमुळे आयुष्याचा खरा अर्थ गवसू लागला. आता ते अनुभव आणि ज्ञान यांची सांगड घालू लागले. माहितीच्या पलीकडे जात, अनुभवाधिष्ठित ज्ञानाकडे आपोआपच त्यांचं लक्ष केंद्रित झालं; ते एकांतवासात रमू लागले. त्यातूनच उदयाला आलं त्यांचं असामान्य असं संतरूप. निर्माण झालं अप्रतिम अभंगवाड.मय. निर्माण झाली त्यांची गाथा. अर्थात त्यामागे त्यांचा फार मोठा व्यासंग होता. बाबाजी चैतन्य हे गुरू त्यांना लाभले असं म्हटलं जातं. तुकोबांनी केलेली अभंगरचना ही जनमानसाला भिडणारी आणि विचारप्रवृत्त करणारी ठरली.

अभंगांतून स्वत:चा उल्लेख ते ‘तुका’ असा करतात. त्यांच्या वाड.मयातून प्रकर्षाने उमटणाऱ्या विद्रोहामुळे त्यांना फार त्रास आणि विरोध सहन करावा लागला आणि त्यातूनच ते अधिकाधिक घडत गेले.

धर्मरक्षण हे त्यांनी आपलं जीवितकार्य मानलं. जातपात, उच्च-नीच भेद नाकारले. सामान्य लोकांना उचित साधनमार्ग दिला पाहिजे; भुताखेतांची साधना, जटाभार वाढवणारे ढोंगी, शकुन सांगणारे भविष्यवादी, क्षुद्र देवतांच्या उपासना यांपासून लोकांना दूर केलं पाहिजे; त्या दृष्टीने त्यांनी अखंड प्रयत्न केले. समाजातील सोंगाढोंगांवर नित्य प्रहार करणं हे जणू त्यांनी आपलं कर्तव्य मानलेलं होतं. त्यातूनच त्यांचा विद्रोह जन्माला आलेला होता. भारतीय राज्यघटनेतही वैज्ञानिक दृष्टिकोनाला, तसेच समानतेला महत्त्व द्यायला सांगितलेलं आहे. याचा उगम तुकाराम यांसारख्या संतांकडून येतो.

कृतीतून आणि लेखनातून समाजशिक्षणाचा त्या काळात पाया रचणारे तुकाराम म्हणूनच सातत्याने समाजमंदिराच्या कळसाकडे लक्ष वेधून शिक्षणातून समाजहित साधताना दिसतात.

मूर्तीत देव न मानणारे आणि वेदाचा भाग गाळून घ्या म्हणणारे संत तुकाराम खऱ्या अर्थाने विद्रोही ठरतात. अंधानुकरण त्यांना कधीच मानवणारं नव्हतं; प्रत्येक गोष्ट डोळसपणे पारखून घेण्याची जणू त्यांनी स्वत:ला सवय लावून घेतलेली होती. त्यातून अत्यंत विचारपूर्वक आणि नि:संदिग्ध रीतीने जे अभूतपूर्व वाड.मय निर्माण झालं त्याचा अभ्यास आजच्या आधुनिक काळातल्या विद्यार्थ्यांना करायला मिळाला, त्याचा अर्थ जर आपण त्यांना समजावू शकलो तर एका अर्थी नवीन शैक्षणिक धोरणाला पाठबळच मिळेल यात शंका नाही. डोळसपणे आणि विवेकी विचार करायला शिकवणं ही काळाची गरज आहे. शाळेमध्ये याची सुरुवात होते आणि ते नक्की कसं करायचं हे आपल्याला तुकारामाच्या अभंगांतून समजतं.

शिक्षणाचा पाया हा ‘विचार’ असतो. तोच विचार तुकारामांनी अभंगातून मांडला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय संत आणि परंपरा यांची ओळख व्हावी म्हणून संतांचे अभंग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सांगितले आहेत. त्यावर परीक्षा घ्यायची नाही; पण त्याचा अर्थ त्यांना माहिती हवा. म्हणूनच शाळेतील विद्यार्थ्यांना तुकोबाचे अभंग शिकवा.  त्यावर गॅदरिंग ठेवा. तुकोबांच्या अभंगाचे काही नमुने पाठ करून घ्या. यातूनच त्यांना संत साहित्याची ओळख होणार आहे आणि त्यांच्या जीवनतत्त्वज्ञाचा पाया मजबूत होणार आहे.          

अन्याय सहन न करणारा, जीवनतत्त्वांच्या खऱ्या अर्थापर्यंत जाणारा माणूस त्यातून घडेल आणि तुकाराम महाराजांच्या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे |’ या ओळीचा भावार्थ त्या खऱ्या  माणसाला अनुभवायला मिळेल.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Monday, 16 May 2022

शिक्षकांचे शिक्षक: जे.पी.नाईक

सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा जागतिक विचारवंत, शिक्षणतज्ञ जे. पी नाईक यांच्यावरील लेख

भारतीय स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहाच्या चळवळीत अनेकांनी तुरुंगवास सोसला. पहिल्या दर्जाचे विद्यार्थी म्हणून नावलौकिक असलेल्या जे.पी. नाईकांना तत्कालीन इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आय.सी.एस. होण्याचा मार्ग मोकळा होता, ते आय.एस अधिकारी सहज होऊ शकत होते. मात्र तो सुखाचा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी सत्याग्रहाच्या चळवळीत उडी घेतली. त्यांनी तुरुंगवास भोगला. अन्याय सहन करणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या चळवळीचं त्यांना आश्चर्य वाटलं नसतं तरच नवल.


5 सप्टेंबर 1907 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या आडगावी त्यांचा जन्म झाला.

ज्यांच्या नावे शिक्षकदिन साजरा केला जातो त्या माननीय माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मही 5 सप्टेंबर रोजीचाच; हा एक योगायोगच म्हणावा लागतो. राधाकृष्णन यांचा वाढदिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा करण्याची शिफारसही जे.पी. नाईक यांनीच केली होती.

लहानपणी कौटुंबिक दारिद्र्य आणि मागास परिसर यांचा सामना जे.पीं. ना करावा लागला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी शेती, गुरं चारणं, मोलमजुरीची कामं केली आहेत. बालपणातल्या या अनुभवांचा खोल ठसा त्यांच्या मनावर आयुष्यभर उमटलेला राहिला. सातव्या वर्षी बहिरेवाडीच्या चौथीपर्यंतच्या शाळेत त्यांना दाखल करण्यात आलं.

अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांनी चार वर्षांचा अभ्यासक्रम दोन वर्षांतच पूर्ण केला. विलक्षण बुद्धिसामर्थ्य आणि प्रचंड मेहनतीची तयारी ही त्यांची वैशिष्ट्य होती; आणि ती आयुष्यभर चढत्या आलेखानिशी सिद्ध होत आलेली आहेत.

दरम्यान त्यांच्या मेहुण्यांनी या मुलाची असामान्य हुशारी ओळखली आणि त्याला आपल्याकडे नेलं. बेळगावजवळच्या बैलहोंगल गावातल्या शाळेत पाचवीत दाखल केलं. ती कानडी माध्यमाची शाळा होती. ही भाषा तर याच्यासाठी पूर्ण नवीन. मात्र जिद्द नि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर जे.पी. कानडी शिकले, कानडीतून परीक्षा दिली आणि पहिला नंबर पटकावला. इतकंच नाही, तर तो शेवटपर्यंत टिकवला. माध्यमिक शिक्षण त्यांनी बेळगावला पूर्णवेळ नोकरी करून घेतलं. मॅट्रिक परीक्षेत संस्कृतचं 'अखबारनवीस' पारितोषिक मिळवलं. 1927 मध्ये इंटर परीक्षेत फर्स्टक्लास.1929 मध्ये गणित विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) पदवी त्यांनी प्राप्त केली. राजाराम कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केलं. नंतर सरकारी नोकरी सोडून असहकाराच्या चळवळीत झोकून दिलं. तेव्हा भूमिगत असताना त्यांनी जयंत पांडुरंग नाईक हे नाव घेतलं. त्यांचं जन्मनाव होतं-विठ्ठल हरी घोटगे.

1932 ला ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांनी धारवाडला मागासवर्गीयांसाठी प्राथमिक शाळा काढली. जे.पी. यांचे शिक्षणविषयक विचार खूप प्रभावी आणि संशोधनातून सिद्ध झालेले होते. बी.जी. खेर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतात 1937 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या कल्पक विकासासाठी आमंत्रित करण्यात आलं. जे.पीं.नी भारतातल्या प्राथमिक शिक्षणावर मूलभूत संशोधन केलं. शासकीय कमिटीचे अहवाल लिहिले. शैक्षणिक इतिहास लिहिण्याची तयारी केली. त्यांनी ब्रिटिश काळातील भारतीय शिक्षणाचा सहाशे पृष्ठांचा चिकित्सक इतिहास लिहिला. 7 जून 1943 ला तो मॅकमिलन कंपनीने प्रसिद्ध केला. जागतिक  पातळीवर तो अहवाल महत्त्वाचा ठरला.

जे. पी नाईक यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षणाचं धोरण आणि स्वरूप यावर संशोधन करण्यासाठी 1 जानेवारी 1948 रोजी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन या संस्थेची मुंबईत स्थापना केली. शिक्षण मंत्रालयाने त्यांच्या साहाय्याने एन. सी.इ.आर.टी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अडमिनिस्ट्रेशन या संस्था स्थापन केल्या.

नाईकसाहेबांचं शिक्षणक्षेत्रातलं वैचारिक योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारतीय शिक्षण आयोगाची गरज त्यांनीच तत्कालीन शिक्षणमंत्री बॅरिस्टर छागला याना पटवून दिली. दोन वर्षांच्या मुदतीसाठी 14 जुलै 1964 रोजी त्याची स्थापना झाली. डॉ.डी.एस. कोठारी त्याचे अध्यक्ष आणि जे.पी. नाईक सचिव झाले. नाईकसाहेबांनी 80 संशोधनात्मक प्रकल्प आयोगासाठी करवून घेतले. आयोगाने सामान्य शिक्षणाबरोबरच शेती, अभियांत्रिकी आणि इतर शैक्षणिक प्रवाहाचं परिशीलन केलं. जे.पी.नी दिवसरात्र परिश्रम करून सुमारे एक हजार पृष्ठांचा 'शिक्षण आणि विकास' हा अहवाल लिहिला. त्यातल्या शिफारशींसह तो अंमलात आणला जावा यासाठी बरेच प्रयत्न झाले. हा इतर विकसनशील देशांसाठी लागू पडला मात्र आपल्याकडे अजून हा आयोग लागू झालेला नाही.

जे पी नाईक यांना अपेक्षित असलेल्या शिक्षणखर्चाएवढा खर्च अजूनही आपण पूर्णपणे देशासाठी करत नाही. आता जेमतेम 4% पर्यंत खर्च करतो आहे. जी पी ने सांगितलं शिक्षणामध्ये बदल आणायचा असेल तर एकूण GDP च्या किमान 6% खर्च अपेक्षित आहे.

जे.पी. नाईक अनेक समित्यांवर, अनेक पदांवर नियुक्त होते. त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली. 32 पुस्तकं लिहिली. त्यांनी मांडलेले शैक्षणिक विचार आणि योजना, उपक्रम हे सारं मोजमाप करण्यापलीकडचं आहे.

जे. पी नी पहिली पदवी मिळवली त्यावेळेस महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय असहकार चळवळीच्या अंतर्गत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्यात तुरुंगवास भोगल्यावर त्यांनी ग्रामीण भागातल्या कार्याला स्वत:ला वाहून घेतलं. साक्षरतेसाठी त्यांनी मोलाचं काम केलं.

युनेस्कोने 1990 साली ‘थिंकर्स ऑफ एज्युकेशन’ या शीर्षकाखाली 2500 वर्षांतील 100 जागतिक शिक्षणतज्ज्ञांवर एक लेखमाला प्रकाशित केली. त्यात कन्फ्युशिअस, ऍरिस्टॉटल, प्लेटो असे विचारवंत आहेत आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे एका भारतीय विचारवंताचा म्हणजे जे.पी. नाईक यांचा युनेस्कोने समावेश केला आहे.

अत्युच्च पातळीवर असं भारताचं वैचारिक प्रातिनिधित्व करणारा हा माणूस वागा-बोलायला एकदम प्रांजळ आणि साधा होता. पु.ल. देशपांडे त्यांना ‘शिक्षकांचे शिक्षक’ म्हणतात. पु.ल. ते त्यांना गुरू मानत असत. पु.ल. म्हणतात,
“डॉ.केतकरांनी ‘ज्ञानकोश’ लिहिला पण ते खिशात भजी घालून रस्त्यातून खात खात जात; ही आख्यायिका अधिक लोकप्रिय होती. तशाच जे.पीं.विषयीही अनेक आख्यायिका आहेत. घर-संसार नसल्याने ते कचेरीतल्या टेबलावरच रात्री शेंगदाणे खाऊन झोपतात आणि उठून परत शेंगदाणे खात रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी घरं पाडण्याच्या ऑर्डरी देत फिरतात…”

मात्र, अशा आख्यायिकांमागे एक प्रकारचं कौतुक आहे. असा हा साधासुधा माणूस भारताच्या शिक्षणक्षेत्रासाठी अखंड कार्यरत राहिला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्या सरकारसमोर समस्यांचा डोंगर उभा होता. शिक्षण ही सर्वांत मोठी समस्या होती. हा समस्यांचा डोंगर उचलण्यात जे.पी. नाईक यांची महत्त्वाची भूमिका होती. राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे सदस्य-सचिव म्हणून जे.पीं.नी जी मेहनत घेतली आणि स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक प्रणालीचं स्वरूप बनवलं ते अद्वितीय कार्य आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिली ते आठवीपर्यंतच्या वयोगटातली मुलं शाळेत येण्याची संख्या वीस ते पंचवीस टक्के होती. जे.पीं.नी पुढील वीस वर्षांत ती 75 टक्क्यांपर्यंत आणली. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झाली. आज 97% विद्यार्थी शाळेत दाखल आहेत; तीन ते पाच टक्के विद्यार्थी शाळेत आलेच नाही आणि शाळाबाह्य असण्याचा प्रमाण 15 ते 20 टक्के आहे पण स्वातंत्र्यानंतर हे आव्हान फार मोठं होतं. हे आव्हान पेलले जे पी नाईक या शिक्षण प्रेमी ने.

1959 मध्ये दिल्लीच्या शिक्षणमंत्रालयात केंद्र सरकारचे शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं. त्या पदावर आणि त्यानंतरच्या अनेक पदांवर त्यांनी कोणतंही वेतन न घेता काम केलं. शिक्षण सल्लागार पदावर असताना त्यांनी ज्या महत्त्वाच्या नवीन संस्था स्थापन केल्या त्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एन.सी.ई.आर.टी.), जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जे.एन.यू.), राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (एन.आय.ई.पी.ए.) या प्रमुख आहेत.

युनेस्को आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संघटनांबरोबर त्यांनी स्वतःला झोकून देऊन गरीब जनतेच्या शिक्षणाला सहाय्य केलं. झोकून देऊन आणि पूर्ण होईपर्यंत काम करत राहणं हा त्यांचा खाक्या होता. अखंड आयुष्य त्यांनी भारताच्या शैक्षणिक विचारासाठी वाहून घेतलं होतं.

शिक्षणसंस्था आणि जनता यांचा सहयोग हा शैक्षणिक व्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी उपाय आहे. असं जे.पीं.ना वाटे. याबबत 1959 साली त्यांनी एक अहवाल सुद्धा बनवला होता. जनता विद्यालय तसंच जनता महाविद्यालय याबाबत त्यांनी बरंच काम केलं. जे.पी. नाईक यांनी प्राथमिक शिक्षणात ग्रामपंचायतीची भूमिका काय असली पाहिजे यावर अमाप संशोधनपर रिपोर्ट बनवले आणि काम केलं. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वाटे की प्रौढ साक्षरता आणि शिक्षण व्हायला हवं. जेव्हा पालक किमान साक्षर असतील तेव्हा ते त्यांच्या मुला-मुलींना शाळेत पाठवतील. म्हणून जे.पीं.नी प्रौढ साक्षरता अभियान सुरू केलं.

शैक्षणिक संस्थेबाबत त्यांचं शेवटचं कार्य म्हणजे 1976 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेचं पुणे इथे पुनरुज्जीवन आणि 1981 पर्यँत तिचा जिवाच्या कराराने सांभाळ.या अखेरच्या प्रकल्पात त्यांचा जीव गुंतला होता.

शैक्षणिक क्रांती हे नाईकसाहेबांनी डोळस दृष्टीने पाहिलेलं स्वप्न होतं. त्यासाठी ते झटले. त्यांना ही क्रांती नेपोलियनसारखी सक्तीने नव्हे तर मनं वळवून घडवून आणायची होती.

जागतिक पातळीवर शिक्षण तज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जे.पी. नाईक यांचं 30 ऑगस्ट 1981 रोजी देहावसान झालं.

भारताच्या शिक्षणक्षेत्रात नाईक चार दशकांपेक्षा जास्त काळ कार्यरत होते आणि 1960 पासून पुढे वीस वर्षं या क्षेत्राच्या केंद्रस्थानी होते. या काळात भारतीय शैक्षणिक संशोधन, शिक्षणक्षेत्रातील अभिनव उपक्रम आणि सुधारणा या सर्वांचा आरंभ आणि प्रगती यांवर त्यांचा एकट्याचाच सर्वांधिक प्रभाव पडला आहे.

त्यांना खूप सारे पुरस्कार मिळाले. कर्नाटक विद्यापीठाची D.Lit पदवी, पद्मभूषण पुरस्कार, पॅरिस इथल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारिणीवर नियुक्ती.

या सर्व पुरस्कार आणि मानस्मानांच्या पलीकडून डोकावत असलेल्या जे.पी. नाईक यांच्या कमालीच्या प्रांजळ व्यक्तिमत्त्वाबाबत भारतीयांना अतिशय आदर असला तरी जोवर त्यांनी मांडलेल्या, सुचवलेल्या शिक्षणविचाराची कास धरून भारतीय शैक्षणिक धोरण पुढ़े जात नाही तोवर सारं काही अपूर्णच म्हणावं लागतंय.

ब्रिटिशांनी दीडशे वर्षं आपल्यावर राज्य केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठोस असं शैक्षणिक धोरण आपल्याकडे नव्हतं. गांधींची हत्या झाली होती. अशा वेळी जे.पी. नाईकांनी गांधींच्या विचारांची ‘नई तालीम’ म्हणजे नवं शिक्षण हे शैक्षणिक धोरणात आणण्याचा प्रयत्न केला. भारतीय इतिहासाचा अभ्यास करून, आर्थिक स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक विकासाच्या योजना देशासमोर मांडल्या. खरं तर देशासमोर संकटं बरीच होती. बराच निरक्षर असलेला देश साक्षर करण्यात पुढाकार घेणारे, शाळा प्रत्येक खेड्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे जे.पी. नाईक हे पहिले भारतीय होते. स्वातंत्र्यानंतर पुढ़ील पंचवीस वर्षं जे.पीं.नी एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतातल्या प्रत्येक राज्याला प्राथमिक शिक्षणात पुढे आणलं. म्हणूनच युनेस्कोने जाहीर केलेल्या जगातल्या टॉप शंभर शिक्षणतज्ज्ञांमध्ये जे.पी. नाईक यांचा समावेश केलेला आहे. अशा जे.पी नाईक सरांना शतशः नमन

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Friday, 6 May 2022

महात्मा गांधींची ‘नई तालीम’ हेच खरं उत्तर!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये नोबेल विनर कमी, ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारे कमी, शास्त्रज्ञांची संख्या बोटावर मोजण्याइतकी..म्हणजे इतके कमी की जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत नाही. कारण या यादीत यायला किमान त्या देशाचे 100 शास्त्रज्ञ तरी लागतात. भारताच्या फक्त दहा शास्त्रज्ञांची नावं या यादीत आहेत. याचं कारण ब्रिटिशांनी लादलेली शिक्षणपद्धती. ‘शिक्षणपद्धती’ या शब्दांमध्ये 'पद्धती' हा शब्द फार महत्त्वाचा आहे. याला इंग्रजीमध्ये सिस्टिम म्हणतात. ब्रिटिश अधिकारी सिस्टिम लावण्यात माहिर होते. एकदा सिस्टिम लागली की ती तोडणं मुश्कील.


म्हणून तर त्यांनी जगातल्या बहुतांश देशांवर राज्य केलं. ही सिस्टिम कशी तोडायची याचं सखोल ज्ञान महात्मा गांधी यांना होतं. हिंसा करून स्वातंत्र्य मिळू शकत नाही. ब्रिटिशांची सिस्टिम तोडता येणार नाही.. म्हणून अहिंसा हे सूत्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी वापरलं. तसंच शिक्षणाबाबत होतं. ब्रिटिशांना मेंदू न वापरणारं.. सांगू ते काम करणारं.. असं मनुष्यबळ हवं होतं. म्हणून मेकॉलेने तशी शिक्षणपद्धती आणली. ज्यामुळे माणूस शिकेल पण विचार करू शकणार नाही. हे गांधीजींना माहिती होतं म्हणून त्यांनी ‘नई तालीम’ ही भारतीय शिक्षण प्रणालीची वैचारिक बैठक ठरवली.

त्याचे काही प्राथमिक प्रयोग केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना ही ‘नई तालीम’ची शिक्षणपद्धती आणायची होती. जी शंभर टक्के भारतीय शिक्षणव्यवस्थेला धरून होती; पण आपलं दुर्दैव की स्वातंत्र्यानंतर गांधी दंगली विझवण्यात अडकले आणि पुढे त्यांचा खून करण्यात आला. गांधी किमान पुढील दहा वर्षं जरी जिवंत राहिले असते तर आज भारताचे किमान शंभर शास्त्रज्ञ तरी यादीत असते. अशी नक्की काय होती नई तालीम शिक्षण प्रणाली?

खरं तर महात्मा गांधी यांची १५१ वी जन्मशताब्दी आपण साजरी करतोय. महात्मा गांधी म्हटलं की मनामध्ये प्रथम अहिंसा, शांती हे विचार येतात. तर डोळ्यांसमोर गांधीजींची तीन माकडं येतात. आपण सर्वजण समजतो की महात्मा गांधी यांची सर्वात उत्तम भेट ही ‘सत्याग्रह’ आहे. हे खरं आहे की सत्याग्रहातूनच लोकतंत्राचा पाया मजबूत झाला पण सत्याग्रह ही सर्वोत्तम भेट नाही. मग महात्मा गांधी यांची सर्वोत्तम भेट कुठली?

टाईम मॅगझिनने विसाव्या शतकातलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून गांधींचं नाव जाहीर केलं. गांधी म्हणजे सत्याग्रहाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य देणारी महान व्यक्ती; पण या व्यक्तीचं शिक्षणातलं योगदान काय? आणि ते सत्याग्रहापेक्षा सर्वश्रेष्ठ कसं? १९३८ साली महात्मा गांधी यांनी स्वतः काँग्रेस अधिवेशनात शिक्षणाचे विचार मांडले. हे मांडतांना स्वतः गांधीजी म्हणाले, "मी आज या देशात संपूर्ण विश्वासावर काही नवे विचार मांडत आहे. आत्तापर्यंत ज्या ज्या विचारांची देणगी जगाच्या चरणी अर्पण केली आहे त्यांपैकी सर्वाधिक क्रांतिकारी आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा विचार आहे. याहून अधिक मूल्यवान आणि महत्त्वाची अशी दुसरी कोणती देणगी मी जगासमोर ठेवू शकेन असं मला वाटत नाही. या विचारांमध्ये माझ्या सार्‍या रचनात्मक कार्यक्रमांना व्यावहारिक मूर्तरूप देण्याची क्षमता सामावलेली आहे. ज्या प्रकारच्या नव्या जगासाठी माझी सारी धडपड चाललेली आहे ते नवं जग यामधून निर्माण होऊ शकेल. हा माझा अखेरचा वारसा आहे."

म्हणजे स्वतः महात्मा गांधींनी म्हटलं आहे की ही माझी जगाला अखेरची सर्वोत्तम भेट आहे. या सर्वोत्तम भेटीचं नाव आहे ‘नई तालीम’. म्हणजे नवं शिक्षण. खरं तर सर्वात प्रथम फिनिक्स आणि टेलस्टॉय आश्रमात गांधीजींनी शिक्षणाचा विचार केला. आश्रमात राहणारे त्यांचे कार्यकर्ते, सत्याग्रही, अनुयायी त्यांच्या मुला-मुलींची, कळतनकळत शिक्षणाची जबाबदारी गांधीजींवर आली आणि आश्रमातच शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले. तिथे त्यांनी शाळा चालवल्या. भारतामध्ये गांधीजी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, “स्वतंत्र भारतासाठी शिक्षण सुद्धा स्वतंत्र हवं.” त्याचं स्वरूप कसं असावं हे ठरवण्यासाठी वर्ध्यामध्ये शिक्षण परिषद बोलवली गेली.

जमनालाल बजाज यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या शिक्षण परिषदेमध्ये जाकीर हुसेन, आचार्य विनोबा भावे, आचार्य काकासाहेब कालेलकर, जगतराम देवीप्रसाद आणि शिक्षणातली अतिशय महत्त्वाची व्यक्ती ई. डब्ल्यू. आर्यनायकम आणि आशादेवी यांनी भाग घेतला. त्यांनी त्याकाळी लंडनमध्ये शिक्षणशास्त्रामध्ये पीएच.डी केली होती. ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हापासून रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत शांतिनिकेतनचं संपूर्ण काम पाहत होते. या शिक्षण परिषदेचं मुख्य नेतृत्व करत होते महात्मा गांधी. 1938 मध्ये त्यांनी ‘नई तालीम’चा विचार मांडला.

महात्मा गांधी यांचा ‘नई तालीम’ हा शिक्षणविचार काय होता? नक्की महात्मा गांधी यांनी शिक्षणाची काय व्यवस्था जगाला दिली? आजच्या एकविसाव्या युगातील सर्व प्रश्नांची उत्तरं गांधीजींच्या शिक्षण प्रणालीमध्ये आहेत का? याचं उत्तर शोधण्याआधी किंवा ‘नई तालीम’ समजून घेण्याआधी आजच्या शिक्षणाची काय अवस्था आहे ते समजून घेतलं पाहिजे. नॅशनल एम्पलोयाबिलिटी रिपोर्ट ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सर्व्हे रिपोर्ट सांगतो की, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल शाखेतील फक्त ७% विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होण्यासाठी लागणारं स्किल-कौशल्य-कला अवगत आहे. 93% विद्यार्थी इंजिनिअर होतात पण इंजिनिअरिंग केल्यानंतर जे कौशल्य यायला हवं ते येतच नाही.

भारतामध्ये पंधराशेहून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. दरवर्षी चार लाखांहून अधिक इंजिनिअर्स बाहेर पडतात पण वर्ल्ड क्लास टॅलेंट म्हणून ज्यांची निवड व्हायला हवी त्यांची संख्या वीस ते पंचवीस हजार एवढ़ी आहे. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये भारताचे तरुण आहेत. इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरला जॉब नाही असं नाही पण विद्यार्थ्यांना अपेक्षित गुणवत्ता प्राप्त झालेली नसते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती नाही, विधायक विचार नाहीत,. नवं असं काही करण्याची हिम्मत नाही.. कारण आपली शिक्षणपद्धती नवा असा कुठलाच विचार मांडत नाही. कारण ‘घोका आणि ओका’ ही आपली शिक्षणपद्धती झाली आहे.

२१ अपेक्षित, गाईड यांमधून रेडीमेड उत्तरं परीक्षेच्या आधी पाठ करायची आणि परीक्षेच्या दिवशी ती उतरवायची आणि परीक्षा झाली की विसरायचं. ते रोजच्या व्यवहारात कुठे वापरण्याची कसलीही तसदी कुणीही घेत नाही. या सगळ्यातून स्मृतीकेंद्रित शिक्षणपद्धती निर्माण झाली. महात्मा गांधी यांच्या ‘नई तालीम’मध्ये स्मृतीकेंद्रित शिक्षण मुळीच नव्हतं. ‘नई तालीम’चा संपूर्ण पाया हा अनुभवातून शिक्षण यावर आधारित होता.

‘एज्युकेशन फॉर लाईफ, एज्युकेशन थ्रू लाईफ’ ही नवी व्याख्या महात्मा गांधी यांनी शिक्षणाला दिली. गांधी यांचा दोन गोष्टींवर खूप भर होता. एक, राष्ट्राच्या मूलभूत गरजा भागवेल असं शिक्षण आणि शिक्षणात विद्यार्थ्यांना स्वावलंबन हे शिकवलंच पाहिजे. समाजाला उपयोगी पडेल असं कुठलंही काम हे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हाती असलं पाहिजे असे त्यांचे विचार होते.

शिक्षणात शारीरिक श्रमाला प्रचंड महत्त्व त्यांनी दिलं. मुलांनी रोज शारीरिक श्रमाची कामं करावी. मग त्यामध्ये बागकाम, फळझाडांची देखभाल, स्वयंपाकाच्या कामात मदत, लाकूड तोडणं, खड्डे करणं, सुतारकाम, डोक्यावरून ओझी वाहणं अशी बरीच कामं शिक्षणात असावी. आता तुम्ही म्हणाल की शेतीकाम बांधकामसारखी कामं मुलांनी का करावी? किंवा स्वाबलंबनाला गांधीजींनी एवढं महत्त्व का दिलं? तर आजचं बालमानसशास्त्र सांगतं की मुलांचा मेंदू घडतो कसा…मुलं शिकतात कशी

एकविसाव्या शतकातली शिक्षणक्षेत्रामधली सर्वांत मोठी बाब ही आहे की, लहान मुलांच्या मेंदूचा विकास कसा होत असतो याविषयी संशोधन या काळात झालं. पहिल्या बारा वर्षांमध्ये त्यातही पहिल्या आठ वर्षांमध्ये लहान मुलांच्या मेंदूची जडणघडण होत असते. बारा वर्षानंतर किमान पाचशे मिलियन मज्जापेशी या नष्ट पावतात. जितक्या जास्त मज्जापेशी जिवंत राहतील, सर्व मज्जापेशी यांची एकमेकांशी जेवढी घट्ट जुळणी होईल, त्यांच्यात सिनॅप्स निर्मिती होईल.. तेवढ्या बाळाच्या विविध क्षमता विकसित होतील. तेवढं बाळ अधिक बुद्धिमान बनेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जुळणी बालवयातच होत असते.

ही जोडणी होते कशी? लहानपणी त्याला किती विविध अनुभव मिळतात आणि त्याहूनही महत्त्वाचं, हे सर्व अनुभव पाच इंद्रियांद्वारे तो किंवा ती कसे घेते; म्हणजे लहान मुलं लहानपणी जेवढी विविध कामं करतील अर्थातच अनुभव घेतील तेवढं त्याच्या मेंदूला स्टिम्युलेशन मिळेल आणि त्यातून विविध मज्जापेशींची घट्ट जुळणी होईल. महात्मा गांधी आपल्याला ऐंशी वर्षांपूर्वी म्हणाले की, “मुलांना स्वावलंबन शिकवा. बागकाम, शेतीकाम शिक्षणाचा भाग असूद्या.” थोडक्यात, मुलांच्या मेंदूचा विकास यातून होतो. बागकाम, शेतीकाम ही त्यांनी दिलेली उदाहरणं आहेत. स्वावलंबन या शब्दात सर्व अनुभव येतात.

गांधीजी म्हणतात, “पहिल्या आठ वर्षांत मुलांना स्नायूविषयक शिक्षण द्यावं आणि ते शिक्षणातील तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली व्हावं. याचा अर्थ बालवाडीला ज्या शिक्षिका हव्या त्या ट्रेन्ड उच्चशिक्षित हव्यात. कारण पहिली आठ वर्षं बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडण्याची असतात. भारतामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवायला उच्चशिक्षित असतात आणि बालवाडीला बारावी पास शिक्षक. जपान, फिनलँड या सर्व देशात प्री-प्रायमरीच्या शिक्षकांना सर्वात जास्त पगार-सन्मान असतो.” ते उच्चशिक्षित, बालमानसशास्त्रातले तज्ज्ञ असतात. गांधीजींना असे शिक्षक अपेक्षित होते.

गांधीजीं पुढे म्हणतात की, “शिक्षणाचा निसर्गाशी आणि जीवनाशी सुसंवादी आणि घनिष्ट संबंध असला पाहिजे. शेतीशी जोडलं न गेलेलं जीवन अपूर्ण होय. या शिक्षणतत्त्वाची सध्या तर खूपच आवश्यकता आहे. जीवनाच्या प्रश्नांना जे भिडतं ते शिक्षण. आता सी.बी.एस.ई बोर्डाने लाईफ स्किल नावाचा सब्जेक्ट काढला आहे. गांधीजींनी हे सर्व ८० वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी रुद्र स्वरूप धारण केलं. कारण शेती हा विषय शिक्षणात नाही; त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल आपुलकी, संवेदना नाही. शेती विषयाने मुलांच्या मेंदू मज्जापेशी सर्वात जास्त विकासित होतात.

आज आपण इमोशनल कोशन (EQ), सोशल कोशन (SQ) या संकल्पनांवर चर्चा करतो. ते ‘नई तालीम’मध्ये आधीच सर्व समाविष्ट केलेलं आहे. ‘नई तालीम’ हे नवं शिक्षण आहे म्हणून गांधी म्हणतात, “काळ जसा बदलेल तसा त्याचा ढाचा बदलणं आवश्यक असेल.” म्हणजे गांधी कधीच म्हणत नाहीत की ‘नई तालीम’चं शिक्षण हे कायमस्वरूपी ठेवा. ते त्या त्या शतकांच्या गरजांनुसार बदलत गेलं पाहिजे. विज्ञान आणि अध्यात्म याची त्याला जोड असणं आवश्यक आहे. आज गांधी अवतरले असते तर कदाचित त्यांनी हातात चरखा दिला नसता. वेगळं काही साधन हातात दिलं असतं जे आजच्या काळाला अनुरूप असेल.

शिक्षणात सतत प्रयोग होत राहिले पाहिजेत यावर त्यांची श्रद्धा होती. गांधीजी म्हणतात, “नई तालीम’ हे शिक्षण, अहिंसेचं शिक्षण आहे. स्वातंत्र्य आणि सहकार हा त्याचा पाया आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे की त्या स्पर्धेमधून विद्यार्थी नैराश्यामध्ये जात आहेत. एकमेकांचा द्वेष करत आहेत. कारण स्पर्धेमधून कधीच प्रेम निर्माण होत नाही. निर्माण होते ती फक्त द्वेषभावना. सहकार ही भावना एकविसाव्या शतकातील पहिल्या पाच कौशल्यांमधली आहे. ज्यांच्यामध्ये हे भावनाकौशल्य असेल त्यांना सर्वांत जास्त पगाराची नोकरी मिळेल असे विविध रिपोर्ट सांगतात. ‘नई तालीम’मध्ये अशी बरीच तत्त्व आहेत की जी एकविसाव्या शतकातील प्रत्येक प्रश्नांवर उत्तर ठरतात.

गांधींचा आग्रह होता तो म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एका ग्रामीण हस्त उद्योगाची जोड दिली पाहिजे. ते कौशल्य शिकवलं पाहिजे. आज आपण सर्वजण प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे म्हणतो किंवा विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी जे शिक्षण लागतं ते शाळेपासूनच असलं पाहिजे असा त्याचा अर्थ होतो.

महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं यावर वैचारिक मतभेद होते. रवींद्रनाथ टागोर यांचा आग्रह असायचा की मातृभाषेतून शिक्षणाचं माध्यम असावं; तर महात्मा गांधी याला पूर्णतः सहमत नव्हते. महात्मा गांधी स्वतःलाच प्रश्न विचारतात की ज्ञान मिळवण्याचं माध्यम कुठलं असतं? त्यांनी माहिती आणि ज्ञान यात फरक केला आणि त्यांनी या प्रश्नाचं उत्तर स्वतः दिलं, ‘ज्ञान हे अनुभवातूनच मिळतं.’ त्यामुळे शिक्षणाचं माध्यम हे ‘अनुभव’ असलं पाहिजे. मग भाषा तुम्ही कुठलीही वापरा. ते म्हणायचे की इंग्रजी ही इतर भाषांसारखीच एक भाषा म्हणून शिकवावी.

थोडक्यात काय, महात्मा गांधी यांनी पुस्तकाचा संबंध रोजच्या व्यवहाराशी जोडला. श्रमनिष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी शिक्षणात आणला. ‘नई तालीम’ची महत्त्वाची तीन-चार तत्त्वं आणि मुद्दे मी या लेखात मांडले आहेत; पण या सर्व तत्त्वांचं सार हे आहे की विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण द्यावं. जीवनातल्या सर्व प्रश्नांना ते भिडणारं हवं. श्रमनिष्ठा, अहिंसा, सहकार ही मूल्यं मुलांमध्ये रुजावी.

आता प्रश्न असा की हे सर्व त्यांनी सांगितलं, मग ते शिक्षण धोरणांमध्ये का नाही आलं? २००५ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सर्व समाविष्ट आहे. त्या आधीच्याही शैक्षणिक धोरणांमध्ये आहे. तसंच या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये सुद्धा अनुभवाधारित शिक्षणपद्धती असावी याच्यावर लक्ष केंद्रित केलं. पण तरी हे सर्व व्यवहारात का येत नाही? कारण आपण एक गोष्ट विसरतो की, ती म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्षं राज्य केलं. त्याचं महत्त्वाचं कारण ब्रिटिश सिस्टिम बनवण्यात अतिशय कुशल होते. त्यांनी शिक्षणाची अशी पद्धती बनवली की ती आपण तोडू शकत नाही.

त्यांना डोकं वापरणारे, डोकं चालवणारे नको असल्याने त्या पद्धतीची शिक्षणपद्धती त्यांनी आपल्यामध्ये रुजवली. ती इतकी घट्ट रुजली आहे की स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली तरीही ती आपण मोडीत काढू शकत नाही. ‘घोका आणि ओका’ हे आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये मुळीच नाही तरीही शाळा- शाळांमध्ये, कॉलेजमध्ये असं शिकवलं जातं कारण ब्रिटिशांनी लावून दिलेली सिस्टिम. तोडण्यामध्ये आपण असमर्थ ठरलो आहोत. ती तोडून आज खऱ्या अर्थाने अंमलात आणू शकण्याचं सामर्थ्य महात्मा गांधींच्यात होतं.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ते म्हणाले होते, “स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र शिक्षण हवं.” ते त्यावर काम सुरूच करणार होते; पण गांधीजींच्या हत्येने भारताच्या असंख्य पिढ्यांचं नुकसान झालं, शिक्षणात आपण मागे पडलो. जगातील सर्वात उत्तम शिक्षणपद्धती ही फिनलँड देशाची मानली जाते. त्या देशाची शिक्षणतत्त्व जर तुम्ही अभ्यासली तर ती सर्व तत्त्वं ‘नई तालीम’ या महात्मा गांधीजींच्या शिक्षणतत्त्वांशी मिळतीजुळती दिसतील. यावर आपल्याला अंदाज येऊ शकतो की महात्मा गांधी यांची ‘नई तालीम’ शिक्षणप्रणाली किती परिणामकारक होती. अजूनही वेळ गेली नसून ‘नई तालीम’चे प्रयोग शाळाशाळांमध्ये व्हायला हवेत.

ज्यांना कोणाला ‘नई तालीम’ या महात्मा गांधीजींच्या शिक्षणप्रणालीबद्दल अधिक समजून घ्यायचं असेल त्यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे सरांचे यावरील ग्रंथ जरुर वाचावेत. आता नवं शैक्षणिक धोरण आलेले आहे. या नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये नई तालीम चे बरशे मुद्दे आणि संकल्पना पुन्हा आलेले आहेत. अपेक्षा आहे की यावेळेस हे धोरण आपण काटेकोर अंमलबजावणी करू आणि नई तालीम हे प्रत्यक्षात उतरवू. कारण एकविसाव्या शतकातील शिक्षणाचं सूत्र ‘नई तालीम’ मध्येच आहे असं मला वाटतं.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक




शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...