Thursday, 7 July 2022

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे

साने गुरुजी म्हटल्यावर डोळ्यांसमोर त्यांचं संवेदनशील व्यक्तिमत्त्व उभं राहतं. शिक्षकाने कसं आणि किती संवेदनशील असलं पाहिजे याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. इतकी संवेदनशीलता आली कुठून? ती आली त्यांच्या आईने कळत-नकळत केलेल्या संस्कारातून; तिने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्याशी सातत्याने साधलेल्या संवादातून.


साने गुरुजींच्या लहानपणची एक छोटी; पण फार मोठा आशय घेऊन येणारी घटना इथे आठवते.

साने गुरुजी बाहेरगावी शिकायला असताना ते वार लावून जेवायचे. वार लावून जेवणं म्हणजे गरीब परिस्थितीमुळे जेवणाची मेस न लावता आठवड्यातील प्रत्येक दिवशी दानशूर लोकांकडे जेवायला जाणं; जसं सोमवारी एका व्यक्तीकडे तर मंगळवारी दुसऱ्या व्यक्तीकडे. हे वार लावून जेवणाचे दिवस ठरलेले असायचे. पूर्वीच्या काळी खूप सारे विद्यार्थी या व्यवस्थेचा फायदा घेत असत. त्यामुळे त्यांना परगावी किंवा शहरात राहून शिक्षण घेणं शक्य होत असे.

एक दिवस काय झालं, गुरुजींचं ज्यांच्याकडे जेवण ठरलं होतं ते कुटुंब अचानक बाहेरगावी गेलं आणि त्यादिवशी त्यांना उपाशी राहायची पाळी आली. ते जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा घराला कुलूप होतं. बाहेर जेवणासाठी पैसे नव्हते. त्यांनी मनात विचार केला की, रस्त्यामध्ये विठ्ठलाचं मंदिर लागतं. रात्री पुजारी नसतो. मंदिरातील ताम्हनात कोणी ना कोणी पैसे टाकत असतं. ते मंदिरातील पैसे घेऊ आणि त्यामधून काही खायला विकत घेऊ. त्या विचाराने मंदिरात जाऊन त्यांनी ताम्हनातले पैसे काढण्यासाठी त्यांनी हात पुढे केला. तेवढ्यात आवाज ऐकू आला. हा आवाज आईचा होता. ते दचकले, हात आपोआप पाठी आला. नक्कीच हा भास होता. पण आई म्हणाली,  "थांब, तू चोरी करतो आहेस!" गुरुजी तिथेच थांबले आणि पैसे न घेता घराच्या दिशेने चालू लागला. आई मनातून त्यांना सांगत होती,

"तू चुकत होतास बाळा, अरे कितीतरी लोक आयुष्यभर उपाशी राहतात. एक वेळचं जेवतात. तुझ्यावर तर फक्त एक रात्र उपाशी राहण्याची वेळ आली. सहन कर ना रे."

म्हणजे जिथे जिथे मुलगा चुकत होता तिथे तिथे त्याला पाठीशी न घालता साने गुरुजींची आई अतिशय कणखरपणे त्यांना योग्य मार्गदर्शन करत आली. म्हणूनच साने गुरुजींची भावनिक बुद्धिमत्ता अफाट होती. त्याचआधारे पुढे त्यांचा सर्वांगीण विकास योग्य मार्गाने झालेला दिसतो. मुलांच्या याच भावनिक बुद्धिमत्तेची आज आपण चर्चा करत असतो.

भावनिक बुद्धिमत्तेच्या मुळाशी असलेल्या या संवेदनशीलतेतूनच साने गुरुजी जगाकडे प्रेमाच्या नजरेने पाहायला शिकले. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ साने गुरुजी म्हटलं की त्यांच्या या ओळी निश्‍चितपणे आठवतात. भारतीय संस्कृतीचे नव्हे खरं तर मानवतेचं द्योतक असणारे हे शब्द.

प्रेमाचा खरा अर्थ उमगल्यामुळेच साने गुरुजींमध्ये एक हळुवारपणा निर्माण झाला होता; पण तो कणखरपणाच्या आड येणारा दुबळेपणा नव्हता. शांततेचा मार्ग होता, जगण्याचा खरा अर्थ उमगल्याने जगानेही त्याच मार्गावरून चालावं अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड इथे झाला, तिथे त्यांचे वडील ‘खोत’ होते. खोत म्हणजे श्रीमंत घराणं. साने गुरुजींच्या आजोबांपर्यंत अशी श्रीमंती होतीही. मात्र, त्यांच्या वडिलांच्या काळात त्या श्रीमंतीला आणि वैभवाला उतरती कळा लागली. साने गुरुजींचा म्हणजे पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म झाला तेव्हा कुटुंबाची परिस्थिती अगदीच बेताची होती.

पांडुरंगावर लहानपणापासून त्याच्या आईचे उत्तम संस्कार झाले. त्या संस्कारांचा त्या अनुभवांच्या
ठसा साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वावर उमटत होता. ते स्वतः अतिशय प्रेमळ होते. वात्सल्याची मूर्ती जणू! ते मातृहृदयी होते; त्यामुळे जगाकडे ते वात्सल्याच्या नजरेने बघू शकत. त्यांच्या संस्कारांचा, त्यांच्या संवेदनशीलतेचा, अनुभवांचा ठसा पुढे साने गुरुजींनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ पुस्तकातून उमटलेला पाहायला मिळतो. त्या पुस्तकातला बालनायक श्याम आणि स्वतः पांडुरंग यांच्यात फार मोठं साम्य आढळतं. स्वतः बालपणात अनुभवलेली आई त्यांनी तंतोतंत त्यात उभी केली आहे.

श्यामची आई कधी त्याच्यावर कसलीच सक्ती करत नाही. ती त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते; हे आजच्या पालकांनी लक्षात घ्यायला हवं. प्रेम आणि तटस्थता यांचं एक मिश्रण श्यामच्या आईच्या ठायी आहे. ती फारशी शिकलेली नाही पण ती त्याला नवनवीन अनुभव देण्याचा सतत प्रयत्न करते आणि हे तिचं वागणं अगदी सहज आहे. त्यात कुठलीही कृत्रिमता नाही. ती त्याला रामायण, महाभारतापासून कथा सांगते. ती त्याला वेळ देते ही खूप महत्त्वाची गोष्ट. जी आजही लागू पडते आणि उद्याही पडेल. पालकांनी मुलांना पुरेसा वेळ द्यायला हवा. सतत संवाद साधायला हवा.

मुलं अनुकरणप्रिय असतात हे आपल्याला ठाऊक आहे. श्यामच्या आईची संवेदनशीलता आणि समर्पित वृत्ती त्याच्या कृतीतून श्याममध्ये उतरत गेली. भाऊबीजेला भावाने साडीसाठी दिलेल्या पैशातून आमच्या वडिलांना धोतर आणते. स्वतःला साडी आणत नाही. नंतर पैसे साठवून श्याम भावाला कोट घेतो. पालकांचं वागणं हा मुलांच्या वागण्याचा मूळ स्रोत असतो.

गुरुजींचं नाव घेताच महाराष्ट्राला आठवते ती ‘श्यामची आई’. हे पुस्तक महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेलं आहे. त्यावर पुढे चित्रपटही निघाला.

‘श्यामची आई’ हे पालकत्वाचं ‘रोल मॉडेल’ आहे. सर्व पालकांसाठीही ‘श्यामची आई’ एक प्रेरक शक्ती ठरते. मुलाशी संवाद साधते. श्यामने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला तिच्या कुवतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. श्यामची आई एकदा समुद्राला नमस्कार करून पाच पैशाचं नाणं वाहते. तो विचारतो, “समुद्राच्या पोटात इतकी रत्नं असताना तू पाच पैसे का दिलेस?”

तेव्हा ती म्हणते, “सूर्याला आपण काडवातीने ओवाळतोच ना. प्रश्न भावनेचा असतो.”

एकीकडे अशा संस्कारांनी परिपूर्ण असणारे साने गुरुजी उच्चशिक्षित होते. ते एम.ए. ‘गोल्ड मेडलिस्ट’ होते. मुंबई विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यांना मुंबईच्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळत होती; पण ती न स्वीकारता अमळनेरला तत्त्वज्ञान मंदिरात एक वर्ष फेलो म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर तिथे जी शाळा निघाली त्या शाळेत त्यांनी 1924 ते 1930 अशी सहा वर्षं नोकरी केली. 1930 साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचं ठरवलं. एकूण या ना त्या कारणाने 80 दिवस त्यांनी तुरुंगात काढले आहेत. त्या काळात त्यांनी झपाट्याने लेखन केलं.

गुरुजींनी ‘श्यामची आई’ व्यतिरिक्त इतरही अनेक पुस्तकं लिहिली आहेत. जवळजवळ शंभरच्यावर पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील काही अनुवादित आहेत. एक फ्रेंच, एका तमिळ संतांचं पुस्तक त्यांनी अनुवादित केलं. तुरुंगात त्यांनी लेखन केलं त्याचं कारण असं होतं तुरुंगातल्या आजूबाजूच्या कैद्यांची परिस्थिती पाहून, त्यांच्या घरच्यांची परिस्थिती पाहून गुरुजींचा हृदय हेलावलं. भेटायला आलेल्या भावाला त्यांनी एक वही आणायला सांगितली. त्याला कळेना ही कशासाठी मागवली आहे? त्या वहीत गुरुजींनी ‘बापूजींच्या गोड गोष्टी’ लिहिल्या. पुन्हा भावाला सांगितलं, “ढवळे प्रकाशनाकडे
जा. हे छापायला दे आणि मानधनातून आलेल्या पैशांतून या कैद्यांच्या घरच्यांच्या खाण्या-जेवणाची थोडीफार व्यवस्था कर.”

गुरुजींच्या बाबतीत एक गोष्ट फार लक्षणीय वाटते ती म्हणजे ते घरी असो, शाळेत असो, वस्तीगृहात अधीक्षक म्हणून वावरत असोत; कवीचा पिंड असलेले साने गुरुजी कायम एक माणूस आणि कार्यकर्ता म्हणून जगले. शिक्षक म्हणून तर ते अद्वितीय होते. अमळनेरच्या शाळेत मराठी, इतिहास आणि संस्कृत असे तीन विषय ते शिकवत. एकदा वर्ग चालू झाला की तास संपल्याच्या बेलचं त्यांना भान राहत नसे; आणि मुलांनाही इतर वर्गातली मुलं खिडकीपाशी येऊन त्यांचं शिकवणं ऐकत. ‘आई’वरची कविता शिकवताना त्यांच्या डोळ्यांत पाणी येई. एकदा बाहेर पाऊस पडत असताना अख्खा वर्ग त्यांनी पावसात भिजायला नेला होता. वसतीगृहातील अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी एक दिवस विद्यार्थ्यांबरोबर कळीचा वाढदिवस साजरा केला होता; फुगेबिगे लावून. आज आपण अनुभवाधिष्ठित शिक्षणाची आणि ज्ञानरचनावादाची चर्चा करतो. साने गुरुजींनी त्या काळात तो अंमलात आणला होता. ते ‘छात्रालय’ नावाचं भीत्तिपत्रक चालवत. सकाळी रोज मुलं उठण्यापूर्वी भिंतीवर आठ पानं लावलेली असत. ते स्वतः पहाटे चार वाजता उठून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, वेगवेगळी माहिती लिहून काढत आणि भिंतीवर चिकटवत. हा उपक्रम दोन वर्षं चालू होता.

तेव्हा गुगलची माहिती उपलब्ध नव्हती; जुना काळ होता तो. कोणत्याही गोष्टीसाठी, प्रयोगासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत. अनेकविध क्षेत्रांतली, अनेकविध देशांतली माहिती त्यात असे. स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती असे, विनोद असायचे; नाटुकली असायची. त्यासाठी गुरुजींना आधी खूप वाचन करावं लागे. एक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काय काय आणि किती अभिनव असं काही करू शकतो; किती वेगवेगळे उपक्रम राबवू शकतो; वेळ देऊ शकतो याचं साने गुरुजी म्हणजे उत्तम उदाहरण होते. अत्यंत समर्पित वृत्ती होती त्यांची. पगार कधी स्वतःसाठी वापरत नसत; मुलांमध्ये वाटायचे. वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून त्यांनी पाच वर्षं काम केलं. त्या काळात वसतिगृहाचे नियम कडक असत. त्यात शिस्त लावण्यासाठी मुलांना मारणंही समाविष्ट होतं; पण गुरुजींनी कधीच कोणत्याही मुलाला मारलं वगैरे नाही. त्यांची प्रेमावर भिस्त होती. आजारी विद्यार्थ्यांची ते शुश्रूषा करत असत. छोट्या-छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असे. कोणी मुलांच्या घरून काही पदार्थ आले तर सर्वांनी वाटून घेण्यावर त्यांचा भर असे. संस्कारातून सहकार्याची भावना वाढीस लागत असे. महाराष्ट्रातल्या सर्व अधीक्षकांनी त्यांचं उदाहरण समोर ठेवलं पाहिजे! अधीक्षकाचं कामच असतं शिस्त लावणे आणि शिस्त लावण्यासाठी मुलांना रागवणे मारणे हे आलंच अशा धारणेमध्ये आपला समाज होता. आशा वेळेस साने गुरुजींनी प्रेम देऊन विद्यार्थ्यांना जिंकलं. कदाचित शिक्षण क्षेत्रात आत्तापर्यंत एवढा प्रेमळ अधीक्षक लाभला नसेल.

आज प्रश्न वेगळे, आव्हानं वेगळी; पण प्रेम, करुणा आणि समर्पण वृत्ती नेटवरून प्राप्त करता येत नाही. म्हणूनच साने गुरुजींची मूल्यं खूप महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांच्यासारखंच शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेम पाझरलं पाहिजे. दोन मुलांची मारामारी झाली तर साने गुरुजी दोघांनाही एक एक ठेवून देत नसत. तर ते दोघांच्याही पाठीवर हात ठेवून दोघांनाही सांगायचे,
“असं नसतं करायचं. अरे, असं नसतं करायचं.”
स्वतःच्या संतापाला पूर्णपणे आवर घालणं हे शिक्षकांचं परमकर्तव्य आहे. मुलांना समजून घेणं हे गुरुजी फक्त कर्तव्य समजत नसत आपोआप ती गोष्ट त्यांच्याकडून घडत असे.

एकविसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचं कौशल्य ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही भावनिक बुद्धिमत्ता इंटरनेट च्या माध्यमातून विकसित होत नसते. इथे आवश्यक असतो शिक्षकाचा प्रेमळ हात. हा प्रेमळ हात ज्या विद्यार्थ्यावर पडतो त्या विद्यार्थ्यांमध्ये आयुष्यात पुढे जाण्याचा एक स्पार्क
निर्माण होतो. भावनिक विचार करण्याची मेंदूत जडणघडण सुरू होते. म्हणून आज साने गुरुजी यांचे विचार जास्त गरजेचे आहे.

ते गोष्टी सांगण्यात पारंगत होते त्यामुळे मुलांना त्यांचं अनोखं आकर्षण वाटत असे.

सामाजिक भान मुलांच्यात रुजलं पाहिजे असं आपण म्हणतो. गुरुजींनी कृतीतून ते घडवून दाखवलं. त्यांच्या रोजच्या तासिकेतली शेवटची पाच मिनिटं ते विद्यार्थ्यांशी सामाजिक, राजकीय घडामोडींविषयी चर्चा करत. यातून वैचारिक गोष्टी ऐकायची सवय विद्यार्थ्यांना लागत असे. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते; म्हणूनच त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडल्यावर मुलं आणि शिक्षकसुद्धा अक्षरश: रडले होते. नंतर त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला तेव्हा त्यांचे माजी विद्यार्थी त्यांच्याबरोबरीने चळवळीत सहभागी झाले होते कारण ते त्यांच्या या शिक्षकाला ‘ओळखत’ होते.

महात्मा गांधींच्या विचारांचा विलक्षण प्रभाव साने गुरुजींवर होता. त्यांना तमिळ आणि बंगाली भाषा येत असे. कारागृहात ते त्या भाषा शिकले होते. भाषांचं महत्त्व ते जाणत असत. भाषांविषयी त्यांना आस्था होती. भाषा खूप काही घडवून आणू शकते याविषयी त्यांना विश्वास होता. भाषांच्या आदान-प्रदानासाठी त्यांनी ‘आंतरभारती’ चळवळ सुरू केली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खेडेगावात; मुख्यत्वे खानदेशात रुजवण्यात गुरुजींचा मोठा वाटा आहे. त्यांनी ‘राष्ट्र सेवादला’ची स्थापना केली. ‘साधना साप्ताहिक’ सुरू केलं. समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा, अस्पृश्यता यांना कायम विरोध केला.

15 ऑगस्ट 47 भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाचं कामकाज पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. स्वत:चा संसार न थाटता आयुष्यभर सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेणाऱ्या साने गुरुजींनी पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या हृदयातली जितीजागती प्रेमाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवून 11 जून 1950 रोजी या जगाचा निरोप घेतला. पन्नास वर्षाच्या एवढ्या छोट्या आयुष्यात पहिले वीस वर्षे सोडले तर तीस वर्षांमध्ये ही व्यक्ती एवढे अफाट कार्य करते ही तमाम शिक्षण क्षेत्रातील लोकांनी प्रेरणा घ्यायची गोष्ट आहे. अर्थातच त्यांनी रुजवलेली मूल्यं आज आणि उद्याही माणूस म्हणून जगण्यासाठी जगात सगळ्यांना प्रेरक ठरत आहेत, ठरणार आहेत.

साने गुरुजी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगायचे. गोष्टीचे पुस्तक लिहायचे. आजही त्यांच्या विचारावर चालणारे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात जागोजागी "साने गुरुजी कथामाला" चालवतात. त्याच्यातूनच साने गुरुजींचे मूल्य आजही समाजात रुजत आहे आणि ते अधिक रुजले पाहिजे तेव्हा एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्यात झिरपतील.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...