Monday 11 July 2022

ज्ञानदेवे रचिला शिक्षणाचा पाया

“ज्ञानदेवे रचिला पाया 

तुका झालासे कळस” 

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे. अनेक बाबतींत ते सत्य आहे. एक तर त्या दोघांचा काळ वेगळा त्यामुळे ज्ञानदेवांनी ज्या ज्या गोष्टींची भक्कम सुरुवात केली त्या सगळ्यांवर तुकारामांनी कळस चढवला असं म्हणता येतं; अगदी वाड.मयापासून ते समाजपरिवर्तनापर्यंत. पैकी या लेखात आपल्याला ज्ञानदेवांच्या कार्याचा आढावा घ्यायचा आहे. आणि आजच्या शिक्षणातलं त्याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. का हे करायचं? संत ज्ञानेश्वरांचा आजच्या शिक्षणाशी काय संबंध? तेराव्या शतकातल्या गोष्टी आज का विचारात घ्यायच्या? गरज आहे का त्या विचारात घेण्याची? 

तर या प्रश्नाचं उत्तर आहे, अर्थात आहे. नितांत गरज आहे. अगदी खरं तर एकच फार मोठी गोष्ट हे समजायला पुरेशी आहे, ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी ही 'गीताटीका' प्राकृतात लिहिली तेव्हा त्यांचे गुरू श्री निवृत्तीनाथ हे मार्गदर्शक म्हणून तिथे हजर होते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या नऊ हजार ओव्या श्री सच्चिदानंदबाबांनी लिहून घेतल्या म्हणजे ते त्यांचे लेखनिक झाले. या प्रक्रियेतला एकूण एक घटक फार महत्त्वाचा आहे; अगदी आजच्या आधुनिक काळाच्या दृष्टीनेही! 

शिक्षणाच्या विशिष्ट टप्प्यावर विद्यार्थ्याला नेमकं कुठे, काय आणि कसं मार्गदर्शन करायचं याचं भान शिक्षकांना असावं लागतं; आणि हेच तीव्र भान असल्याने ज्ञानेश्वरांच्या बाबतीत निवृत्तीनाथांनी मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावली. यालाच आजच्या काळात टीचर्सनी फॅसिलेटर होणं म्हणतात. सगळ्या प्रक्रियेत निवृत्तीनाथ साक्षीभावाने असल्याचे दिसतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत ढवळाढवळ न करता दिशादर्शन करणं नीटपणे जमावं लागतं. ते कसं जमवायचं याचं हे उत्तम उदाहरण.

निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या समाजाने वाळीत टाकलेल्या भावंडांच्या अतुलनीय कर्तृत्वाची  गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी विशद केलेले विविध योग मग ते भक्तियोग-कर्मयोग-ज्ञानयोग-विभूतीयोग... हे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. 

ज्ञान अगदी माणसाच्या आत दडलेलं असतं. आपल्या आतलं ज्ञान हुडकून तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे अध्ययन आणि ते बरोबर घेत उपयोगात आणणं म्हणजे जीवन. आपल्या सगळ्या ज्ञानप्रक्रियेतून, साहित्यनिर्मितीतून ज्ञानेश्वरांनी हेच मांडलं आणि या मांडणीलाच आजच्या शिक्षणाची व्याख्या म्हटलं जातं. 

ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव इथे तेराव्या शतकात, १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. त्यांचे वडील विरक्त संन्यासी होते पण गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याने या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकलं होतं. इतकंच नाही तर त्या दोघांना देहान्त प्रायश्चित घ्यावं लागलं. नंतर सर्व भावंडं पैठणला गेली आणि तिथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. 'ज्ञानेश्वरी', 'अमृतानुभव', 'चांगदेव पासष्टी' हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथे इंद्रायणी नदीच्या काठी इ.स. १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली. 

आपल्या जीवनकाळात त्यांनी स्वतःच्या अलौकिक प्रतिभेच्या सहाय्याने जे लेखन केलं ते समाजाला मूलतत्त्वांकडे घेऊन जाणारं ठरलं. 

विवेकावर माझं फार प्रेम आहे असं ते म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे. बुद्धिप्रामाण्यवादही नेमकं हेच सांगतो. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे तर्कबुद्धीला प्रमाण मानणं; बुद्धीच्या कसोटीवर तत्त्व पारखून घेणं. हा कोणता इझम किंवा वाद किंवा भांडण नाही. ती एक अभ्यासप्रक्रिया आहे. बुद्धिप्रामाण्यवादाला विवेकवाद, वास्तववाद, भौतिकवाद असंही म्हटलं जातं. सगळ्या वादांमधलं सार लक्षात घेत जीवन कसं जगायचं हे ज्ञानेश्वरी या गीताटीकेमध्ये ज्ञानेश्वरांनी पदोपदी सांगितलेलं आहे आणि अशा या मार्गदर्शनपर ग्रंथाला आजच्या आधुनिक युगात शिक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा योग्य ते स्थान मिळण्याची गरज आहे. 

मुख्यत: शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीच्या शेवटी मागितलेल्या पसायदानाचा अर्थ उलगडून सांगण्याची नितांत गरज आहे. तो शालेय उपक्रमातल्या परिपाठाचा भाग व्हायला हवा. ज्ञानेश्वरी आणि त्यातलं पसायदान समजून घेणं या बाबी प्रौढपणात किंवा जीवनाच्या उत्तरार्धात समजून घेण्याच्या आहेत असा एक गैरसमज समाजात रुजलेला आहे. तो पहिला दूर करण्याची गरज आहे. जीवनसूत्र शिकण्याच्या प्रारंभीच्या काळातच जर या गोष्टी समजल्या तरच त्यांचा खरा उपयोग आयुष्यभर होणार आहे. 

मात्र, ही गोष्ट अंमलात आणण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी पसायदानाचा अर्थ लक्षात घेणं, तो आपल्या जगण्यात मुरवणं खूप महत्त्वाचं आहे. हे पसायदान अनेक कार्यक्रमांच्या शेवटी म्हटलं जातं; पण नेमका अर्थ काय या पसायदानाचा? जो समजून घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी पालकांनी प्रथम पाऊल उचलणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना याचा अर्थ सांगायला हवा.

पसायदान
ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर त्यांनी हे पसायदान मागितलं. 

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||

‘पसाय’ म्हणजे प्रसाद. ज्याला नमन करून त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ केला त्या विश्वात्मक ईश्वराकडे त्यांनी पसायदान मागितलं. आपल्या वाग् यज्ञाने म्हणजे वाणीरूपी कथनाने प्रसन्न होऊन हा प्रसाद द्यावा असं ते म्हणतात.  कोणता हा प्रसाद? हा चांगल्या विचारांचा प्रसाद आहे.

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||

ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाच्या सत्प्रवृत्तींचं म्हणजे चांगल्या वागण्याचं पोषण केलं. त्यामुळे ‘खळांचि व्यंकटी सांडो’ म्हणजे दुष्ट माणसांचा दुष्टपणा नाहीसा होवो; अशी मागणी ते करतात. त्यांचा माणसाच्या माणूसपणावर दृढ विश्वास आहे. वाईटातल्या वाईट माणसांमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात. ज्ञानेश्वर त्या चांगल्या गोष्टींकडे आपलं सर्वांचं लक्ष वेधतात. मुळात माणूस दुष्ट म्हणून जन्माला येत नाही. त्याची वाढत गेलेली दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हायला हवी. हे कसं होईल? सतत सत्कार्य म्हणजे चांगलं काम करत राहणं त्याच्या सवयीचं होईल तेव्हा. तेव्हा आपोआप त्याची नजर वाईट गोष्टींवरून हटेल असा त्यांचा विश्वास आहे. आजकाल बरेच मॅनेजमेंट गुरू म्हणतात की कुठलीही गोष्ट 21 दिवस सतत करा म्हणजे तिची सवय होऊन तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो. हेच ज्ञानेश्वर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. ते म्हणतात, ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ दुष्टही चांगुलपणाकडे वळले की जगातले सगळे जीवमात्र एकमेकांवर प्रेम करायला लागतील. 

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||

दुरितांचा म्हणजे पापांचा अंधार नाहीसा होवो. म्हणजेच एका अर्थी पुण्याचा प्रकाश पसरो. समाजामधील नकारात्मकता निघून विधायकता वाढो. चुकीच्या गोष्टी समाजातून निघून जावो. ज्ञानेश्वरांच्या पाप-पुण्याच्या संकल्पना या कृतीशी निगडित आहेत. सत्कर्माकडे ते सतत सगळ्यांचं लक्ष वेधतात. पाप म्हणजे वाईट. हे कसं आणि कधी नाहीसं होईल? ‘विश्व स्वधर्माचा सूर्य पाहील तेव्हा’. म्हणजे जगभरात माणसं स्वत:चं कर्तव्य चोख बजावतील तेव्हा. 
इथे विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगू शकतो की प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य बजावणं म्हणजे वेळेवर अभ्यास करणं, खेळणं, सायकल चालवताना ट्रॅफिकचे नियम पाळणं, चांगलं बोलणे, घरात सर्वांना मदत करणं, वेळेवर अभ्यास करणं, गृहपाठ करण्यापासून तर मोबाईल न पाहणं.. टीव्ही कमी पाहणं इत्यादी. 
प्रत्येकाला आपापल्या धर्माचं ज्ञान झालं, भान आलं की तो स्वत:चं कर्तव्य बजावत राहील. इथे धर्माचा अर्थ स्वभाव असा होतो.  पापाचरणातून म्हणजे वाईट करण्यापासून त्याचं ध्यान स्वकर्माकडे वळेल; म्हणजे तो स्वत:ला नेमून दिलेल्या चांगल्या कामाकडे लक्ष देईल. वाईट काम हे कोणाचं नियतकर्म म्हणजे कोणाला नेमून दिलेलं काम असूच शकत नाही. म्हणूनच स्वकर्माची, स्वधर्माची ओळख होणं महत्त्वाचं. तो कसा ओळखायचा? प्रसंगानुरूप चांगलं आचरण करत गेलं म्हणजे चांगलं वागत गेलं की तो आपोआप कळत जातो. आता वाईट इच्छा मनी उरतच नाही. 

मग ते पुढे म्हणतात, ‘जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात’ म्हणजे ज्याला जे हवं ते त्याला मिळो. याचा अर्थ हव्या त्या वस्तू, हवे ते पदार्थ मिळो असा नाही. भौतिक वस्तू मिळो असं ते म्हणत नाहीत. प्रत्येकाच्या मनात चांगलं वागण्याची, इतरांच्या उपयोगी पडण्याची; मैत्रीची इच्छा निर्माण होवो आणि ती पूर्ण होवो. सगळं शत्रुत्व मिटून मैत्र वाढ़णं महत्त्वाचं. वृत्ती निकोप आणि दृष्टी विशाल झाली पाहिजे. नजरेतून सर्वांसाठी मैत्रच पाझरलं पाहिजे. हे तर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये अतिशय व्यवस्थित समजावून सांगू शकतो की वर्गातील मित्रांना कशी मदत करायची. नाश्त्याचा डबा शेअर करण्यापासून ते मैदानावर खेळण्यापर्यंत सगळ्यांशी मैत्रीपूर्ण कसं वागायचं.

वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||

म्हणजे काय? तर संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ लोक दाटीवाटीने उत्पन्न होवोत. (म्हणजे जशी संत मंडळी) त्यांची अगदी विश्वात गर्दी झाली पाहिजे. ‘अनवरत’ म्हणजे अखंड, अविरत ओघ राहिला पाहिजे त्यांचा. त्यांचे अगदी मेळावे भरले पाहिजेत. हे दुर्मीळ असतात पण त्यांची ‘मांदियाळी’ ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. हा ज्ञानेश्वरांचा ईश्वर आहे. हे ठायीठायी लक्षात घेणं गरजेचं. तो एखाद्या मूर्तीत सामावलेला नाही; तो चराचरांत सामावलेला आहे. 

पुढ़े ते म्हणतात,

चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||

‘कल्पतरूंचे बगिचे’ त्यांना अपेक्षित आहेत आणि ‘चिंतामणीरत्न’ त्यांचं जणू गावच असावं. मागेल ते देणारं झाड म्हणजे ‘कल्पतरू’ आणि ‘चिंतामणी’ म्हणजे चिंता हरणारं रत्न. खरं म्हणजे हे सारं आपल्यापाशी असतं त्याच्या शोध घ्यावा लागतो. चिंतामणीने भारलेलं आणि भरलेलं सारं गाव म्हणजे सारा आनंदी-आनंद. अमृताचे संजीवक समुद्र…ज्ञानेश्वरांच्या अलौकिक कल्पनाशक्तीची सावली जणू संपूर्ण विश्वावर शांततेची शाल पांघरते आहे. 

चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||

कोणताही डाग नसलेल्या चंद्राची शीतलता आणि सूर्याची तापहीन तेजस्वीता ते अपेक्षितात. खरं तर हे अशक्य आहे. चंद्रावर डाग आहे आणि सूर्याची तेजस्वीता ही तापहीन असूच शकत नाही; पण असं व्हावं अशी ज्ञानेश्वर अपेक्षा करतात. याला प्रचंड आशावादी असणं म्हणतात. म्हणजे काय तर, अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया साधली पाहिजे. सदा सज्जन असलेल्याला ते जमतं. ते सर्वांचे ‘सोयरे’ असतात; म्हणजे आप्त असतात, जवळचे असतात, नातेवाईक असतात. सगळ्यांना आपलं म्हणतात. असं वागणं कठीण आहे पण ते माणसाला जमलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. माणसाचं जगणं कसं असलं पाहिजे हे कळकळीने सांगणाऱ्या ज्ञानदेवांच्या या सगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचं सामर्थ्य माणसाला मिळावं अशी ते ईश्वराकडे प्रार्थना करतात. आजच्या काळात सदा सज्जन राहणं हे दुर्मिळ झालं आहे. काहीजण तर आजकाल याला चांगला गुण समजत नाहीत, पण या पृथ्वीवर शांतता, प्रेम आणि आनंद हवा असेल तर प्रत्येकाने सज्जन राहणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठीच ज्ञानेश्वर पसायदानातून ईश्वराकडे प्रार्थना करतात. फार मोठं सामाजिक भान जर प्रत्येकाने आपल्या मनात जागवलं तर आणि तरच त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं. 

किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||

तिन्ही लोकांत परिपूर्णतेचे अनुभव घेत जे आदिपुरुषाची अखंड उपासना करतात, अशांचं चित्र ज्ञानेश्वर उभं करतात. अखंड उपासना म्हणजे आंधळेपणाने केलेलं कर्मकांड नव्हे तर, विचारपूर्वक केलेलं डोळस आचरण. म्हणजे आपल्या चांगल्या वागण्यातूनच देवाची पूजा करणं. अर्थशास्त्रामध्ये कार्ल मार्क्सपासून बऱ्याचजणांनी आदर्श समाजाचं स्वरूप कसं असलं पाहिजे हे त्यांच्या ग्रंथात मांडलं आहे. तोच मुद्दा ज्ञानेश्वर तेराव्या शतकात आदर्श समाजाचं चित्र रंगवताना मांडतात. आदर्श समाजरचनेचा जणू हा पाया आहे. एक भव्य स्वप्न त्यांनी पाहिलं आणि आपल्या प्रतिभेने ते शब्दांत मांडलं. 

आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥

हा ग्रंथ ज्यांचं जीवन होईल, विशेषत: या भूलोकावर; त्यांनी विश्वातील दृश्य आणि अदृश्य भोगांवर म्हणजे दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या परंतु असणाऱ्या आकर्षणांवर विजय मिळवावा. कोणत्याही आकर्षणांमध्ये गुंतून राहू नये. हे ज्ञानेश्वरांनी मांडलं ते भारतीय तत्त्वज्ञान आहे. यामुळेच कितीही वाईट प्रसंगात माणसं समाधानी आणि आनंदाने जगू शकतात.

येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||

घडेल का हे? असं त्यांनी विचारल्यावर निवृत्तीनाथांनी आशीर्वाद दिला, ‘हो घडेल..’  ‘हा होईल दानपसावो’ हे ऐकताच ज्ञानेदव मनोमन सुखावले. अतिशय निर्मळ मनाने ज्ञानेश्वर विचारतात आणि जेव्हा निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने ते आनंदी होतात कारण की त्यांच्या संकल्पनेतला 'आदर्श समाज' चांगल्या विचाराने प्रेरित होऊन तो आदर्शवाद प्रत्यक्षात उतरेल असा त्यांचा आशावाद असतो.

जगाने वाळीत टाकूनही त्यांनी विश्वाला आपलं म्हटलं आणि सगळ्या विश्वासाठी त्यांनी ‘विश्वात्मक देवा’कडे म्हणजे जगाला व्यापून असलेल्या देवाकडे हे ‘पसायदान’ मागितलं. यामागे खूप मोठं सामाजिक भान आहे. ज्यावर आधुनिक काळात आपण मुलांचा एस.क्यू. ठरवत असतो. सामाजिक बुद्धिमत्ता ठरत असते. ही गोष्ट कधींची? तर सातशे वर्षांपूर्वीची. म्हणजे अनेक वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर कायम उपयोगी पडणारं तत्त्वज्ञान सांगून गेले आहेत. जे आजच्याही नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया ठरतं किंबहुना उद्याही आपल्याला पुढच्या पिढ्यांनाही हेच शिकवायचं आहे. 

ज्ञानदेवांनी रचलेल्या अपेक्षांच्या आणि शिकवणुकीच्या पायावरच मानवी जगण्याचा सगळा डोलारा अवलंबून आहे आणि हे आपल्याला मुलांना समजेल अशा पध्दतीने सोप्या भाषेत वारंवार समजावून सांगायचं आहे.
हे सांगणं थोडं कठीण वाटेल पण अशक्य मुळीच नाही. कारण हा लेख लिहायला मलाच खूप दिवस लागले, खूप तज्ज्ञांशी बोलावं लागलं
खूप संदर्भ घेत लिहिले. शाळेत किंवा कुठलाही कार्यक्रम झाला की पसायदान म्हणतात पण त्याचा अर्थ हा बऱ्याच जणांना माहितीच नसतो. तो ज्या क्षणी समजेल त्यावेळेस शिक्षणातील भावनिक बुद्धिमत्ता.. सामाजिक बुद्धिमत्ता यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास होईल. म्हणून म्हटलं ज्ञानदेवे रचिला शिक्षणाचा पाया.

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...