Wednesday 29 June 2022

भारतातल्या पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक

बालवाडीतली छोटी छोटी मुलं आणि ताराबाई मोडक यांचं नातं फार घनिष्ट होतं. त्यांची बालगोपालांबद्दलची आस्था अगदी आतून उमलून आलेली असे. शिक्षिकेपेक्षाही आई-आजीची भूमिका त्या बजावत असत. अगदी सहजपणे त्या त्यांच्यात मिसळून जात.


एकदा काय झालं, शाळा सुटल्यावर त्या आपलं काम करत शाळेच्या कार्यालयात बसल्या होत्या. शाळा सोडून थोडा वेळ झाला नाही तोच समोरून एका छोट्या मुलाला एक बाई मारत मारत शाळेकडे घेऊन येत होती. तो पोरगा बिचारा रडत ओरडत होता. ताराबाईंना कळेना हा काय प्रकार आहे. त्या बाईने त्यांच्यासमोरच त्या मुलाला आणून उभं केलं. ती त्या छोट्या मुलाची आई होती. त्यांच्याच बालवाडीतला तो मुलगा होता.

ताराबाईंनी त्या मुलाला विचारलं, "ताई, अहो काय झालं एवढं? का त्याला मारताय, ओरडताय?" "काय सांगू बाई, चोरी केली याने. या बघा शाळेतल्या छोट्या छोट्या लाकडी वस्तू घेऊन आला घरी." ती बाई सांगू लागली.
तिने त्या वस्तू टेबलावर ठेवल्या. खेळण्यातलं छोटं लाकडी जातं, छोटे लाकडी चमचे..अशा काही लहानसहान वस्तू होत्या. वस्तू छोट्या होत्या पण त्या आईचा संताप मोठा होता. तिला भविष्यात चोर झालेला आपला मुलगा नजरेसमोर दिसत होता, ती हवालदिल झाली होती. त्याच्यावर खूप चिडली होती.
ताराबाईंना सगळा प्रकार लक्षात आला; त्या मंदशा हसल्या. म्हणाल्या, "ताई, तुम्ही बसा बरं आधी इथे. शांत व्हा, पाणी प्या. ह्यालाही शांत करू, मग बोलूया आपण."

त्या बाईला कळेना, 'या इतक्या शांत कशा? मुलाने चोरी केलीय, तरी चिडत कशा नाहीत?'

ताराबाई खूप शांतपणे म्हणाल्या, "पहिली गोष्ट म्हणजे याने चोरी केलीय हे वाक्य डोक्यातून काढून टाका. ही चोरी नव्हे." "म्हणजे?"
"अहो बालवाडी म्हणजे त्याचं दुसरं घर आहे. त्याने फक्त त्याला आवडलेल्या वस्तू एक घरातून दुसऱ्या घरात नेल्यात. याला चोरी नाही म्हणत." "अहो बाई, असं कसं म्हणता? यातूनच त्याला चोरी करायची सवय लागेल ना? बिघडेल की तो. पुढ़े मलाच दोष देईल आणि मी संस्कार केले नाहीत म्हणून." तिला बहुतेक ती आईचा कान चावणाऱ्या गुन्हेगाराची गोष्ट आठवत असावी.

"असं काहीही होणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त असा. असं करायचं नाही इतकंच त्याला समजावा. बाकीचं मी बघते. मारूबिरू तर अजिबातच नका बरं!" त्यांनी त्या लेकराला जवळ घेतलं आणि त्या मायलेकराला घरी धाडून दिलं.

दुसऱ्या दिवशी मुलं बालवाडीत आली. नेहमीप्रमाणे हसत-खेळत-गाणी म्हणत शाळा पार पडली. शाळा सुटायची वेळ जवळ आली. ताराबाईंनी काय केलं, एक मोठी टोपली घेतली आणि त्या प्रत्येक मुलामुलीसमोर गेल्या; म्हणाल्या, "कोणाकोणाच्या खिशात बघू बरं काय काय वस्तू लपल्या आहेत? काढा बरं बाहेर, या टोपलीत टाका."

हळूहळू एकेक एकेक करत अनेक वस्तू टोपलीत जमा झाल्या. ती  टोपली चक्क भरली की! ताराबाईंना बरोबर अंदाज आला होता, हा मोह काही कालच्या त्या एकाच मुलाला फक्त झालेला नसणार, अनेक मुलं आवडलेल्या वस्तू अशा घरी नेट असणार. मग ताराबाईंनी मुलांना समजावलं की 'घरच्या वस्तू घरी नि शाळेतल्या शाळेत.'

पटलं ते मुलांना आणि मग हळूहळू ती टोपली भरणं बंद झालं. 'चोरी' म्हणजे काय ते काळण्याचंही ते वय नव्हतं, हे ताराबाई जाणत होत्या. बालमानसशास्त्र लक्षात घेऊन मुलांशी वागावं लागतं हे त्यांना माहीत होतं.


ताराबाई मोडक प्रसिद्ध बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. 19 एप्रिल 1892 ते 31 ऑगस्ट 1973 हा त्यांचा जीवनकाळ. इंदोरला केळकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. उमाबाई नि सदाशिवराव त्यांचे आईवडील. दोघेही समाजकार्य करत. त्यांच्याकडून ताराबाईना बुद्धिमत्तेचा वारसा लाभला. त्या ग्रॅज्युएट झाल्यावर कृष्णा मोडक यांच्याशी त्यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. त्यांना मुलगी झाली, तिचं नाव प्रभा.

1922 मध्ये राजकोट इथे 'बार्टल फिमेल ट्रेनिंग कॉलेज'मध्ये लेडी सुपरिटेंडन्ट म्हणून त्या रुजू झाल्या. या कॉलेजात या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत.

त्यानंतर त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या साहाय्याने भावनगर इथे मोंन्टेसरीच्या तत्त्वांवर आधारित 'गीता शिक्षण पद्धती' निश्चित केली. हा त्यांचा बालशिक्षण कार्याचा प्रारंभ. शिक्षण आणि संस्कारांचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला पाहिजे या मतावर त्या ठाम होत्या. म्हणूनच त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणासंदर्भात नवं पाऊल उचललं. शिक्षणक्षेत्र हे कार्यक्षेत्र म्हणून त्यांना खुणावत राहिलं. 1923 ते 1932 ही नऊ वर्षं त्यांनी दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केलं.

त्यांनी भारतात शास्त्रीय बालशिक्षणाचा पाया घातला. 1933 पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. गिजुभाई आणि ताराबाईंची ही शिक्षणपत्रिका म्हणजे एक क्रांती ठरली. या प्रयत्नांमुळे बालशिक्षणाचं लोण भारतभर पसरलं. या पत्रिकेत ताराबाईंनी पाचशेहून जास्त लेख लिहिले. त्यातून नव्या पिढीला बालशिक्षणासंदर्भात बौद्धिक विकासाची दिशा मिळाली. त्यांनी मुलांसाठीही खूप लेखन केलं. चारशेहून अधिक गोष्टी, गाणी, नाटुकली ही त्यांची लेखनसंपदा. गिजुभाईंबरोबर 105 पुस्तकं त्यांनी संपादित केलेली आहेत.

ताराबाईंचा प्राचार्या ते बालशिक्षणतज्ज्ञ हा प्रवास लक्षणीय आहे. त्यांनी 1936 साली 'नूतन बालशिक्षण संघाची' स्थापना केली.

ज्या काळात स्त्री शिक्षणापासून वंचित होती, त्या काळात ताराबाई नि गिजुभाईंनी बालशिक्षणाचा प्रयोग राबवला. त्यांनी त्यासाठी मोंन्टेसरी पद्धतीचा बारकाईने अभ्यास केला. भारतीय संदर्भांनुसार त्या तत्त्वांमध्ये बदल घडवून आणले. ताराबाईना म्हणूनच 'भारतातल्या मॉन्टेसरी' म्हटलं जातं.

त्या पुरोगामी होत्या म्हणून त्या प्रार्थना समाजाच्या सदस्य होत्या. कर्मकांडाला त्यांचा कायम विरोध राहिला. प्रारंभी त्या अमरावतीला शाळेत रुजू झाल्या होत्या, त्यांनी एक इंग्रजी माध्यमाची शाळाही काढली होती. शिक्षणक्षेत्रात अनेक प्रयोग करत असताना त्यांनी एक फार महत्त्वपूर्ण नि मोठं पाऊल उचललं ते म्हणजे मुंबईत दादर हिंदू कॉलनी इथे 'बाल अध्यापक मंदिर' सुरू केलं. तसंच 'शिशुविहार'ची स्थापना केली.

आजवर अनेक बालवाडी शिक्षिका या अध्यापन केंद्रातून तयार झाल्या आहेत.

ताराबाईंच्या मनात आणि डोक्यात अखंडपणे बालशिक्षण आणि बालकांचा विकास हा विचार चालू असे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि 1945 मध्ये त्या बोर्डीला आल्या. बोर्डी आणि कोसबाड या ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांमध्ये त्यांचे बालशिक्षणविषयक नवीन प्रयोग सुरू झाले. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा पूर्ण होण्याची वानवा असणारी इथली छोटी मुलं शाळा आणि शिक्षण यांपासून कोसो दूर होती. त्या मुलांसाठी काही अनुकूल असं करायला सिद्ध होताना ताराबाईना अनुताई वाघ यांच्यासारख्या समविचारी आणि उत्तम सहकारी लाभल्या आणि दोघींच्या मेहनतीने त्या परिसरात एक वेगळं असं शिक्षणविश्व निर्माण झालं. दोघींनी अमाप कष्ट घेतले. मुलं शाळेत येत नाहीत तर तिथल्या स्थानिक अडचणी समजून घेत तिथल्या दुर्गमतेला छेद देत शाळा मुलांपर्यंत नेली. कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असे विविध प्रकल्प राबवले. ही सोपी गोष्ट नव्हती. स्थानिक पातळीवरच्या विरोधापासून अनेक व्यावहारिक, अगदी प्राथमिक पातळीवर अडीअडचणींना तोंड देत त्या मुलांच्या, अंगणवाडी शिक्षकांच्या ताई होऊन राहिल्या.

बालशिक्षणाची मेख त्यांनी समाजाला उलगडून दाखवली, पटवून दिली. 'लहान पोर ते, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचंय, खेळेल, बागडेल, वाढेल.' हा पालकांचा दुर्लक्षित दृष्टिकोन बदलण्याचा त्यांनी जीवापाड प्रयत्न केला. हेच बालवय आयुष्यभराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं, तेव्हाच मुलांच्या मेंदूची जडणघडण होत असते हे त्यांनी लोकांना पटवलं.

देशभरात ताराबाईच्या कार्याची कीर्ती पसरली, सरकारलाही दखल घ्यावी लागली; 1962 साली ताराबाई मोडक यांना 'पदमभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

ताराबाई आणि अनुताई यांच्या कार्याचं परिणामस्वरूप म्हणजे आजमितीला सर्वदूर वाढत चाललेली पूर्वप्राथमिक शिक्षणाची गरज, त्याला मिळणारी मान्यता आणि होत असलेला विस्तार! जगात शास्त्रीय बालशिक्षण मॉन्टेसरींनी सुरू केलं. ते भारतात आणलं गिजुभाईंनी. त्याला भारतीय संदर्भ देत ते ग्रामीण भागात पोहोचवलं ताराबाईंनी. अनुताई वाघांनी ते उचलून धरलं आणि शास्त्रीय पद्धतीने ते सिद्ध होत असताना सर्वात मोठं शास्त्रीय पाऊल उचललं प्रा. रमेश पानसे यांनी. त्यांनी मेंदू आधारित शिक्षणपद्धती जगाला पटवून दिली. अशा या बालशिक्षणाच्या शास्त्रीय मार्गावरून होत असलेल्या प्रवासात ताराबाई मोडक या 'मैलाचा दगड' ठरतात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...