Tuesday 19 July 2022

श्रीमॉंचे शिक्षणविचार: व्हाया श्री अरबिंदो

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

"मुलांमध्ये मूलतः असलेल्या गोष्टींना घासून पुसून उजळवणं, विकसित करणं म्हणजे खरं शिक्षण देणं होय. ज्याप्रमाणे फूल सूर्यप्रकाशात फुलतं, त्याप्रमाणे मुलं आनंदात उमलतात, फुलतात!"

हे उद्गार आहेत श्रीमॉंचे.

पॉन्डेचरी आणि श्री अरबिंदो यांच्याबद्दल जगभर सगळ्यांना माहिती आहे. अरबिंदो हे फार मोठे तत्त्वज्ञानी होते. त्यांच्यावर या श्रीमॉंची कमालीची छाप होती.

श्रीमॉंचं मूळ नाव मीरा अल्फासा. फ्रान्समध्ये पॅरिस इथे 21 फ्रेबुवारी 1878 रोजी श्रीमती मॅथिल्ड इस्मलालून आणि बँकर मॉरिस अल्फासा या आईवडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव 'मीरा' असं ठेवण्यात आलं. मीरेच्या जन्माच्या वर्षभर आधी मॉरिस आणि कुटुंबीय इजिप्तमधून फ्रान्सला आले होते. मीरेचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांना आपल्या कार्याची जाणीव होती. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय त्यांना ईश्वरी अस्तित्वाशी एकत्व पावणं शक्य झालं होतं. पुढे श्रीमद्भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचं ‘राजयोग’ या पुस्तकांमधून त्यांना मार्गदर्शन मिळालं. इ.स.1893 मध्ये त्यांनी आर्ट स्टुडिओमध्ये जायला सुरुवात केली. तिथे त्यांनी चित्रकलेचं प्रगत अध्ययन केलं. त्या एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून गणल्या जात होत्याच; त्या उत्तम पिआनोवादकही होत्या. पुढे पॉल यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

पॉल आणि श्री अरबिंदो यांच्या भेटीच्या शेवटी निघताना पॉल म्हणाले, “माझी पत्नी माझ्यापेक्षाही अध्यात्मात अधिक प्रगत आहे. पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा तिला बरोबर घेऊन येईन.”

वयाच्या छत्तीसाव्या वर्षी श्रीमॉं त्यांचे पती पॉल रिचर्डस यांच्यासमवेत पॉन्डेचेरीला आल्या.

खरं तर त्या अरबिंदोंच्या शिष्या. त्यांचा कार्यकाळ 1878 ते 1973. 29 मार्च 1914 रोजी श्रीमॉं आणि श्री अरबिंदो घोष यांची प्रथम भेट झाली. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. अरबिंदो त्यांना माता म्हणून संबोधत त्यामुळे दुसरे अनुयायीही त्यांना 'श्रीमॉं' म्हणू लागले.

श्रीमॉंचे शिक्षणविषयक विचार कालातीत ठरणारे आहेत. वैश्विक पातळीवर अखंड उपयोगी पडणारे आहेत. अरबिंदोंनी पर्यावरणावर खूप काम केलं आहे. श्रीमाताजी, त्यांचे पती पॉल रिचर्डस आणि श्री अरबिंदो हे तिघं मिळून त्या काळात ‘आर्य मासिक’ चालवत असत. फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित होणाऱ्या या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारी मीरा अल्फासा सांभाळत असत. भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स इथे ते प्रसृत होत असे.

पॉन्डेचरीत श्री अरबिंदोंचा आश्रम आहे. शाळासुद्धा आहे. तिथल्या सगळ्या कार्यामागे श्रीमॉंचा दृष्टिकोन आहे ही महत्त्वाची बाब आहे. माताजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित मिराम्बीका ही शाळा अरबिंदोंनी नवी दिल्ली इथे सुरू केली. या शाळेला मी प्रत्यक्ष भेट दिली आहे. या शाळेचं तत्त्वज्ञान आणि अभ्यासक्रम यावर त्यावेळेस लेखसुद्धा लिहिला होता. मिराम्बीका शाळा कुठलीही बोर्ड परीक्षा घेत नसून विद्यार्थी स्वत:च स्वत:चं परीक्षण करतात. या शाळेच्या धर्तीवर टीचर्स ट्रेनिंगसुद्धा होत असतं. नुकताच श्री अरबिंदो सोसायटीतर्फे वर्षभराचा शिक्षक अभ्यासक्रम कोर्स सुरू झाला. आधी हा फक्त दिल्लीला उपलब्ध होता. तो आता सर्व राज्यांत सुरू झाला आहे.

भौतिक ऐषोरामाच्या पलीकडे जाऊन आत्म्याचा विचार मांडणारं तत्त्वज्ञान हा श्रीमॉंच्या वैचारिकतेचा गाभा राहिला. सगळी भौतिक सुखं, पैसाअडका पायाशी लोळण घेत असताना पाश्चिमात्य देशांमध्ये माणसं सुखी, समाधानी, आनंदी का नाहीत? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या आत्म्यापर्यंत पोहोचतात. विवेकानंद, टागोर अशा विचारवंतांनी मांडलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा अत्यंत डोळसपणे अभ्यास आणि विचार करतात.

आत्मा म्हणजे तरी काय? 'माईंड'. हे माईंड मानवी जगण्याच्या मुळाशी आहे. या साऱ्या अभ्यासातूनच त्या विवेकापाशी पोहोचतात. आणि विवेकवादाचं महत्त्व जाणून ते अनुयायांना विशद करतात.  

मूलगामी पद्धतीने श्रीमॉं शिक्षणाचा विचार करतात. शिक्षण हे विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ यांपुरतं बिलकुल मर्यादित नाही. तो एक अखंड असा प्रवाह आहे; ज्या आधारे मनुष्याचा जीवनप्रवास बहरतो. त्याची सुरुवात अगदी माणसाच्या जन्माच्या आधीपासून होते आणि हा प्रवास जीवनभर सुरू राहतो. व्यक्तीच्या वाढ आणि विकासातून तो सिद्ध होतो.

ज्ञान आपल्या आतच असतं. ते हुडकून काढण्याची आणि अंमलात आणण्याची आस तेवढी हवी.

श्रीमॉं म्हणतात, "सर्वांगीण शिक्षणाचे पाच पैलू असतात; भौतिक, प्राणिक, मानसिक, आंतरात्मिक  आणि आध्यात्मिक. आणि ते क्रमाने येत नाहीत तर, हातात हात घालून असतात. असं सर्वांगीण शिक्षण घेणारा माणूस उच्चतम श्रेणीचं जीवनशिक्षण प्राप्त करत असतो आणि ते ठायी ठायी अंमलात आणत असतो.

"मात्र ही सगळी प्रक्रिया घडायला सुरुवात होण्यापूर्वी मुलांच्या आईवडिलांनी म्हणजेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी फार सखोल विचार करण्याची गरज आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांची देखभाल करणं, भोजनप्रबंध करणं, त्यांच्या वेगवेगळ्या भौतिक गरजा पूर्ण करणं म्हणजे त्यांना वाढवणं नव्हे. मुलांना शाळेत घातलं, शिक्षकांच्या हाती सोपवलं म्हणजे आपलं काम संपलं असं समजून मोकळं होणं ही तर फार मोठी चूक आहे. या टप्प्यावर कर्तव्य संपत नाही तर, ते एक नवं वळण घेऊन सज्ज होतं. मुलांना शिक्षण देण्याची योग्यता स्वतः प्राप्त करणं हे इथे प्रथम कर्तव्य ठरतं. आपल्या विवेकी वर्तणुकीवर इथे भर द्यावा लागतो.

"मुलांसमोर आपल्या वागणुकीतून कोणतंही वाईट उदाहरण जाणार नाही याची कायम दक्षता घ्यावी लागते. सच्चाई, इमानदारी, स्पष्टवक्तेपणा, साहस, निष्काम-भाव, निस्वार्थता, धैर्य, सहनशीलता, शांती, स्थिरता, आत्मसंयम हे गुण मुलांच्यात असावेत अशी जी आपली अपेक्षा असते, ते गुण प्रथम स्वतःत बाणवावे लागतात; कारण मुलं अनुकरणातून शिकत असतात. पालकांमध्ये दोष, दुर्बलता, आत्मसंयमाचा अभाव या गोष्टी असतील तर त्यांचा फार मोठा वाईट प्रभाव मुलांवर पडतो. तसं होऊ न देण्याचं भान पालकांनी बाळगलंच पाहिजे."

त्या म्हणतात, "एखादं आख्यान, एखादी गोष्ट मुलांवर नकळत संस्कार करून जाते. त्यातून खूप चांगलं शिक्षण त्यांना मिळत असतं. मुलांना ओरडू मारू नका; पुन: पुन्हा एखादी चूक मुलं करणार नाही, त्यासाठी योग्य शब्दात त्यांना समजावा; चूक कबूल करायला लावा. मग त्यांना क्षमा करा. भीती दाखवू नका; तो मार्ग खूप खतरनाक ठरू शकतो. तो छलकपट आणि असत्य यांच्या जवळ असतो, जणू त्यांचा तो जनकच असतो. चांगलं शिक्षण प्राप्त होण्यासाठी पाल्याचा तुमच्याप्रति विश्वास निर्माण व्हायला हवा."

श्रीमॉंचे अनुयायी त्यांना सातत्याने विविध प्रश्न विचारत असत. त्यातला एक प्रश्न असा, "माताजी, छोट्या मुलांसाठी आम्हाला काय करायला पाहिजे?"
उत्तरादाखल माताजी हसून म्हणतात, "अगदी छोट्या मुलांकडे शब्द नसतात; पण बाकी खूप काही असतं. ती फार चैतन्यपूर्ण असतात. त्यांच्यासाठी काही करायचं तर हे पुरेसं आहे. त्यांच्याभोवती खूप सार्‍या वस्तू ठेवा आणि त्यांना एकटं सोडून द्या; आणि अत्यावश्यक नसेल तर अजिबात मध्ये पडू नका, व्यत्यय आणू नका; रागावू नका. स्वयंशिक्षण त्यांना मिळू देण्याचा हा सगळ्यात सुंदर मार्ग आहे. प्रेम आणि मृदू वातावरणातच मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे."

हे झालं छोट्या मुलांच्या संदर्भात. थोडी मोठी जी मुलं त्यांच्या प्रश्नांनाही श्रीमॉं समर्पक उत्तर देतात.

-काही गोष्टी माझ्या प्रगतीसाठी गरजेच्या असल्या तरी मला त्या नीरस वाटतात. उदाहरणार्थ, गणित मला अजिबात आवडत नाही. मला त्यात रुची कशी निर्माण होईल?

श्रीमॉं सांगतात, "खूप साऱ्या आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी अनिवार्य असतात. त्या आपण करतो; त्यातलाच एक गणित विषय. त्याविषयी प्राथमिक माहिती असणं क्रमप्राप्त आहे. जीवनाचा सफलतापूर्वक सामना करण्यासाठी असे अनिवार्य विषय समजून घेणं हेच या प्रश्नाचं उत्तर."

भारतीय शिक्षणाचा विषय निघाल्यावर माताजी फार परखडपणे आपली मतं मांडतात. त्यांच्या मते पाश्चिमात्यांना भौतिक तत्त्वांचं ज्ञान आहे; पण त्यांनी आत्म्याला नाकारलं आणि त्यांची अस्वस्थता वाढली. शांती ढळली. थोड्याफार फरकाने सगळ्या देशात शिकवता येईल ते सर्वांगीण शिक्षण होय. भौतिक तत्त्वांना अनुसरताना आत्मा लक्षात घ्यावाच लागेल. अंतरंगाचा विकास, अंतरंगाची प्रगल्भता हा या सगळ्याचा अर्थ. शुद्धता आणि शांतता यांचा वास मनात खोलवर असावाच लागतो. तरच आपलं जीवन अर्थपूर्ण बनू शकतं.

“भारताच्या वर्तमान आणि भावी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जीवनाचा विचार करता भारताने शिक्षणासंदर्भाने कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?”

असं एका अनुयायाने विचारल्यावर श्रीमॉं उत्तर देतात, “मुलांना मिथ्यत्वाचा त्याग करून सत्याचा सहर्ष स्वीकार करायला आणि ते सत्य अभिव्यक्त करायला तयार करायला हवं.”

“भारताची खरी प्रतिभा कोणती आणि तिची नियती काय?"

आत्म्याची अभिव्यक्ती झाल्याशिवाय सर्व भौतिक हे मिथ्या आहे.”

एकाने विचारलं, "शिक्षण हे साक्षरता आणि सामाजिक स्तरात गुरफटलं आहे. शिक्षणाला आंतरिक मूल्यं कशी प्रदान करायची आणि त्यातून मूळ आनंद कसा मिळवायचा?"

श्रीमॉं म्हणतात, "परस्परातून त्यांना बाहेर काढून अंतरात्म्याच्या विकासावर भर द्यायचा."

श्रीमॉंना 15 ते 20 भाषा येत असत. त्यामुळे त्यांचं कार्य जागतिक स्तरावर जायला खूप मदत झाली. पॉन्डेचरी इथे फ्रेंच इन्स्टिट्यूटचा उद्घाटन समारंभ होता. त्याप्रसंगी त्यांनी एक संदेश दिला; तो आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मुद्द्यांशी मिळताजुळता आहे.

"शाळेमध्ये म्हणजे सर्व शाळांमध्ये आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली जावी. त्यामुळे शिक्षण अस्सलतेशी जोडलं जाईल."

ही गोष्ट आहे 1955 सालातली. भारतात नवशैक्षणिक धोरण लागू होतंय आज 2022 च्या दरम्यान. या धोरणानुसार आता पुढे भारतविषयक ज्ञान हा शंभर मार्कांचा पेपर शालेय स्तरावर अनिवार्य असणार आहे. श्रीमॉंनी अनेक वर्षांपूर्वी हा मुद्दा मांडला; हा काही केवळ योगायोग नाही. त्यांचा अभ्यास पूर्ण व्यासंग त्यांना या विचारापर्यंत घेऊन आलेला आहे.


श्री अरबिंदो आश्रमातल्या शारीरिक शिक्षण विभागाच्या निर्मितीसाठी माताजींनी सक्रिय भाग घेतला होता. शारीरिक शिक्षणाचं महत्त्व त्या जाणत होत्या. तिथल्या सगळ्या उपक्रमांची आखणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या स्वतः तंदुरुस्ती आणि व्यायाम या संदर्भात फार सजग असायच्या.

‘शिक्षा’ या हिंदी भाषेतल्या ग्रंथामध्ये श्रीमॉंचे विचार समाविष्ट आहेत. अनेक अनुयायांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. तीही या पुस्तकात सविस्तरपणे वाचायला मिळतात. या साऱ्या त्यांच्या विचारांतूनच श्रीमॉंच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर सर्वांगीण विकास म्हणजे काय सर्वांगीण शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला उलगडत जातं.

मुख्य म्हणजे, त्यांचे विचार आजच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जेव्हा समाविष्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात तेव्हा श्रीमांच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय येतो.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...