‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात. कर्मवीरांच्या बाबतीत तर हे अगदीच खरं ठरलं. अगदी बालवयापासूनच ते अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे राहत असत. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी म्हणजेच कोल्हापूरमधल्या कुंभोज इथे झालं. वडिलांची कामानिमित्त कायम बदली होत असे, त्यामुळे भाऊरावांना एका ठिकाणी राहून शिक्षण घेता आलं नाही. त्यातही अनेक अडचणी येत गेल्या. दहिवडी, विटा या ठिकाणी शाळेत त्यांचं पटावर नाव होतं पण वर्गाशी काही त्यांचा फारसा संबंध आला नाही. विटा इथे एका ठिकाणी अस्पृश्य आणि दलित समाजातल्या लोकांना पाणी भरण्यास मज्जाव केला गेला. हा अन्याय सहन न होऊन भाऊरावांनी तिथला विहिरीवरचा रहाट मोडून टाकला होता.अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची सवय त्यांच्या पुढच्या कार्याचा पाया ठरली.
निडर आणि निर्भीड अशा भाऊराव पाटलांचा जन्म कोल्हापुरातल्या कुंभोज गावी ऐतवडे बुद्रुक येथे पाटील घराण्यात 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. पाटील घराणं सुसंस्कृत आणि धार्मिक प्रवृत्तीचं होतं. त्यांच्या दोन पूर्वजांनी दिगंबर जैन मुनी बनण्याचा निर्णय घेतला होता. भाऊराव पाटील यांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचा साधा सदरा आणि नेहरु शर्ट असा त्यांचा पोशाख असे. खांद्यावर घोंगडी घेत पण नंतर घोंगडी जाऊन हातात काठी आली.
1902 ते 1909 या कालावधीत भाऊराव शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. जैन बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण घेत होते. त्यांचा चळवळ्या स्वभाव काही त्यांना स्वस्थ बसू देत नसे. जोडीला त्यांची स्वतंत्र बुद्धी होतीच. सामाजिक क्षेत्रातला त्यांचा वावर वाढत होता. एकदा अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क हॉस्टेलच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले. तेव्हा परत आल्यावर पुन्हा आंघोळ करण्याचा आदेश जैन बोर्डिंगच्या अधीक्षकांनी दिला. मात्र भाऊरावांनी स्पष्टपणे नकार दिला. अर्थातच जैन बोर्डिंगमधून त्यांना काढून टाकण्यात आलं.
नंतर ते कोल्हापूरमध्ये राजवाड्यात राहू लागले. राजवाड्यातलं त्यांचं राहणं त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारं ठरलं. राजवाड्यात राहायला गेल्यावर भाऊरावांना शाहू महाराजांचा खूप सहवास लाभला. त्यांच्यावर महाराजांचा खूप मोठा प्रभाव पडला. शाहू महाराजांच्या उपेक्षितांसाठी चालू असलेल्या कार्याने ते प्रभावित झाले. त्यांच्याही मनात उपेक्षितांबद्दल करुणा निर्माण झाली आणि त्यांनी जणू त्यांच्यासाठी संघर्ष करण्याचा पण केला.
भाऊराव स्वतः सहावीच्या पुढे शिकू शकले नव्हते पण मोठं होताना शिक्षणाचं महत्त्व त्यांना चांगलं लक्षात येत गेलं होतं. शिक्षण पूर्ण न झाल्याने त्यांनी स्वतः आयुष्यात उभं राहण्यासाठी अनेक ठिकाणी हातपाय मारण्याचा प्रयत्न केला होता. काही काळासाठी त्यांनी मुंबईही गाठली होती. तिथे मोती पारखण्याची कला शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते काम काही त्यांना फारसं जमलं नाही, रुचलं नाही, आवडलं नाही.
दरम्यान त्यांचा विवाह झाला होता. कौटुंबिक जबाबदारी वाढली होती. त्यांनी नीट कामधंदा करावा अशी त्यांच्या वडिलांचीही इच्छा होती. मग ते साताऱ्याला खाजगी शिकवण्या घेऊ लागले आणि तिथे पाटील मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले. 1909 मध्ये भाऊरावांनी दूधगाव इथे ग्रामस्थांच्या मदतीने ‘दूधगाव विद्यार्थी आश्रम’ सुरू केला. हा एक चांगलाच यशस्वी प्रयोग तर ठरलाच पण भाऊरावांना त्यांच्या आयुष्याची जणू नस सापडली आणि पुढची दिशा अधिकच स्पष्ट झाली. तरी अडचणी येतच होत्या. त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. खरंतर त्यात तथ्य काही नव्हतं पण भाऊरावांचा मात्र काही प्रमाणात छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. ते खूप निराश झाले होते. आयुष्याची दिशा सापडली असं वाटत असतानाच ते संपवण्यासाठी प्रयत्न करण्याचे टोकाचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. मात्र त्या खोट्या आरोपातून ते सहीसलामत सुटले. मग काही काळ त्यांनी नोकरीही केली.मग मात्र ते पुन्हा त्यांच्या मूळ कार्याकडे ओढले गेले.
शाहू महाराजांच्या आणि महात्मा फुले यांच्या प्रभावाखाली असलेल्या भाऊराव पाटलांनी कराड तालुक्यातल्या काले या ठिकाणी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला आणि चार ऑगस्ट 1919 रोजी 'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना झाली. काले इथेच संस्थेमार्फत एक वसतिगृह, एक प्राथमिक शाळा आणि एक रात्रशाळा सुरू करून शैक्षणिक कार्याला प्रारंभ करण्यात आला. 1924 मध्ये संस्थेचं सातारा इथे स्थलांतर करण्यात आलं. तिथे सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू करण्यात आलं. इथे सगळ्या जाती-धर्मांची मुलं एकत्र राहतात, जेवतात, एकत्र शिक्षण घेतात हे पाहून गांधीजींनी या गोष्टीचं खूप कौतुक केलं होतं. आजच्या काळात ही गोष्ट काही नवलाची राहिली नसली, सवयीची झाली असली तरी तो काळ लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा समाजाचा फार मोठा विरोध पत्करून या गोष्टी धाडसाने घडवून आणाव्या लागत होत्या.
गांधीजी त्यावेळी भाऊराव पाटलांना म्हणाले होते, "बाबुराव साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही इथे यशस्वीरित्या करून दाखवलंय. तुमच्या कार्याला माझे आशीर्वाद." पुढे भाऊरावांनी संस्थेचा विस्तार केला. तूर्त संस्थेमार्फत शंभरएक वसतिगृह चालवण्यात येतात. अनाथ आणि बालगुन्हेगार म्हणून गणल्या गेलेल्या मुलांसाठी वेगळी व्यवस्था नसावी असं त्यांना वाटत असे. वेळप्रसंगी राज्य शासनालाही त्यांनी आपलं म्हणणं पटवून दिलेलं आहे. म्हणजे एखाद्याच्या प्रखर विचारात आणि परखडपणे ते मांडण्यात तथ्य असेल तर ती बाब फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. शिवाय त्याला कृतीची जोड हवी. ती इथे होतीच. मनात आलेली चांगली आणि स्तुत्य अशी हितकारक गोष्ट कृतीत उतरवायला भाऊरावांसारखी माणसं मागेपुढे पाहत नाहीत.
शाळेशिवाय एकही खेडं असू नये आणि प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये हा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. त्यासाठी भाऊरावांनी शिक्षण अध्यापक विद्यालयं सुरू केली. इथे शिक्षक घडवले जाऊ लागले. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याची आणि ते सोडवायला घेण्याची कर्मवीरांची सवय इथे कामी आली. पुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण देणारी अनेक महाविद्यालयं निर्माण झाली. आज राज्यातल्या खेड्यापाड्यांत अजूनही शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत; पण आता ग्रामीण भागातल्या बहुसंख्य घरातून मुलांच्या शिक्षणाचा विचार केला जातो. भाऊराव पाटील यांच्यासारख्या प्रयोगशील व्यक्तींनी या कार्यासाठी अथक यशस्वी प्रयत्न केले नसते तर ही प्रगती झालीच नसती. त्यासाठी त्यांचे ऋण मानावे तेवढे थोडेच आहेत. आज ग्रामीण भागात शिक्षण पोचले याचं श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील यांना जाते.
भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनीही त्यांना समाजकार्यात मोलाची साथ दिली. त्यांनी कधी कुटुंबाचा उदारनिर्वाह ही बाब अडचण म्हणून मध्ये आणली नाही. त्यामुळे भाऊरावांना सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला स्वतःला वाहून घेणं शक्य झालं. भाऊराव पाटील यांना जनतेने ‘कर्मवीर’ ही उपाधी दिलीच पण इतरही अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
1959 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणे विद्यापीठानेही डि.लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. आयुष्यभर अथक परिश्रम आणि प्रवास यामुळे प्रकृतीचं तानमान ढासळत गेलं आणि अखेर 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्राणज्योत मालवली.
मात्र ‘रयत शिक्षण संस्थे’च्या द्वारे त्यांचे शिक्षणासंदर्भातले विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या अध्यक्षपदी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री.शरद पवार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते ही जबाबदारी पार पाडतात. संस्थेच्या 739 शाखा आहेत. 16,172 कर्मचारी तिथे काम करतात. 437 शाळा; त्यातल्या 26 मुलींच्या, 17 शेतकी शाळा, 42 महाविद्यालयं, 80 वसतिगृह, त्यात 29 मुलींची, 8 आश्रम शाळा आहेत. सुमारे 4 लाख 50 हजार विद्यार्थी संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात.
शिक्षणातून पोषण, बुद्धिवादाने रुढीवादाचा पराभव, समतेच्या आचरणाने विषमतेचं निर्दालन, श्रमाला प्रतिष्ठा ही भाऊरावांची तत्त्वप्रणाली होती.
त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याबद्दल गाडगे महाराजांना अतीव प्रेम होतं. विनाशाळेचं एकही गाव महाराष्ट्रात असू नये, प्रत्येक नांगरापाठी एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे असं भाऊरावांचं स्वप्न होतं. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
एकदा कर्मवीर सुट्टीत इस्लामपूरला आले. त्यावेळी कर्मवीरांचे आई-वडील तिथे राहत होते. रिकाम्या वेळेत कर्मवीर शाळेकडे गेले. पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता. सर्व मुलं वर्गात बसलेली होती आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता. गुरुजींना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचं कर्मवीरांना समजलं. ते त्या मुलाला घरी घेऊन आले. घरात स्वतःजवळ बसवून जेवू घातलं. नंतर कोल्हापूरला नेऊन मिस क्लार्क हॉस्टेलला दाखल केलं. तो पुढे विधिमंडळाचा सभासद झाला.
भाऊरावांनी देशात ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारं पहिलं ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा इथे सुरू केलं; आणि त्याला नाव दिलं ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना व्होकेशनल ट्रेनिंग दिलं जातं. तसंच शिक्षण घेता घेता करिअरमध्ये पार्टटाईम अनुभव घेण्यासाठी कंपनीमध्ये पाठवलं जातं. या सगळ्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'कमवा आणि शिका' या संकल्पनेतून केली होती.
‘रयत शिक्षण संस्था’ आता आधुनिक काळाशी जुळवून घेत डिजिटलायझेशन, क्रीडा-कौशल्य, सामाजिक एकोपा या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जात आहे. तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात संस्था कुठेही मागे राहिलेली नाही. ही तर आजच्या आधुनिक काळात अगदीच अपरिहार्य आणि आवश्यक अशी गोष्ट झालेली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आधुनिक काळाशी जुळवून घेत संस्थेने फार मोठं तारतम्य दाखवलेलं आहे.
102 वर्षं अव्याहत एखादी संस्था चालवणं, चालणं इतकंच नाही, तिचा विस्तार होणं, तो डोलारा तकलुपी नसणं या अतिशय लक्षणीय गोष्टी आहेत. स्पर्धेच्या युगात ‘रयत शिक्षण संस्थे’चं 102 वर्षं टिकून राहिलेलं अस्तित्व आणि विस्तार या बाबी कमालीच्या प्रशंसनीय आहेत. याचंही श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील यांना जाईल. त्यांच्या विचारांच्या व्यक्तींची त्यांनी फौजच बनवली. त्यात महत्त्वाचं नाव म्हणे ऍड.रावसाहेब शिंदे.
रावसाहेब शिंदे हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, थोर विचारवंत आणि कृतिशील शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्यावर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी कर्मवीरांना अभिप्रेत असणारी सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जीवनभर ध्यास घेतला.
9 मे 1978 रोजी म्हणजे कर्मवीरांच्या पुण्यतिथी दिवशी 'रयत शिक्षण संस्थे'चे मॅनेजिंग काऊन्सिल सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आणि पुढे ते 'रयत शिक्षण संस्थे'चे उपाध्यक्ष झाले. संस्थेतर्फे ग्रामीण भागात खेड्यापड्यातल्या 2 लाख 37 हजार विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन तो कार्यान्वित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. थोडक्यात काय, व्यक्ती येतात आणि जातात. त्या व्यक्तींचे विचार पुढच्या पिढीत जात असतील तर ती व्यक्ती अजरामर होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार 'रयत शिक्षण संस्थे'द्वारे आजही मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रात तळागाळामध्ये शिक्षण पोहोचवण्यात यशस्वी झालेली संस्था म्हणजे 'रयत शिक्षण संस्था'.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment