Saturday, 17 August 2019

मुलांची भाषा, शुद्ध उच्चार आणि शब्दसंग्रह.

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.

एक व्यक्ती एका लहान मुलाला विचारतो की तू एवढा गोड कसा बोलतो?, तुला कोणी शिकवले?.. तेव्हा तो लहान मुलगा म्हणतो, "कोणी नाही, आमच्या घरात सर्व असेच बोलतात!!" पालकांनो,भाषेवरील संस्कार हे आपल्या घरातून, शाळेतून, आजूबाजूच्या परिसरा मधून होत असतात.
मुलं भाषा कशी शिकतात तर सर्वप्रथम मुलं ऐकतात मग ते बोलायला शिकतात आणि मग लिहायला. भाषाशास्त्र आणि मेंदूमानस शास्त्र सांगतं की, सहा वर्षापर्यंत मुलं चार भाषा शिकू शकतात.
आता आपल्या मुलांची उत्तम भाषा बोलण्यासाठी शिकण्यासाठी आणि जास्तीत जास्त शब्दसंग्रह वाढण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स नमूद करतो.
१) पहिले तर मुलांना भरपूर गोष्टी सांगा. गोष्टीच्या पुस्तकातून दररोज एक ते दोन गोष्टी मुलांना ऐकवा. याच्यातून मुलांची कल्पना शक्ती वाढते, शब्दसंग्रह वाढतो. जेव्हा तुम्ही गोष्ट सांगत असतात त्यावेळेस नवीन शब्दाचा तुम्ही अर्थ, त्याचे स्पष्टीकरण जरूर करा. गोष्ट सांगताना त्याचा/तिच्या रोजचा दैनंदिन जीवनातील गोष्टीशी त्याचा संबंध जोडा.
२) भाषा विकासासाठी गोष्टी ऐकणे महत्त्वाचे आहेत परंतु या गोष्टी आयत्या रेडीमेड कार्टून मधल्या टीव्ही मधल्या यूट्यूब चैनल मधल्या नको. याच्यातून मुलांना गोष्ट समजते पण सर्वात मोठ नुकसान होतं ते म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती दाबली जाते. रेडीमेड गोष्टीतून मुलांना रेडीमेड चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येतात आणि कल्पनाशक्ती चा विकास होत नाही. जेव्हा आई-वडील, शिक्षक गोष्ट सांगतात त्यावेळेस मुलांच्या मनाच्या पटलावर ते स्वतः चित्र व्हिज्युअलाइझ करतात. डोळ्यासमोर तसे प्रतिमा आणतात आणि या प्रक्रियेतून मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते. त्याचबरोबर भाषासुद्धा सुधारते.
३) मुलांना गोष्ट सांगताना आवाजाचा चढ-उतार करून गोष्ट सांगा. याने प्रत्येक शब्द वाक्य कशी बोलायची याचा अंदाज मुलांना येतो.
४) आपण जेव्हा मुलांशी बोलतो त्यावेळेस पूर्ण वाक्यात त्यांच्याशी बोला.
५) मुलांचा टीव्ही युट्युब वरील कार्टून हे कमीत कमी दाखवा. कारण कार्टून मधली भाषा ती अजिबात चांगली नसते. मार दिया, तोड दिया, फोड दिया असे वाक्य सर्रास असतात.
६) कुठली भाषा सुधारण्यासाठी बोलणे बोलणे बोलणे आणि वाचणे वाचणे वाचणे ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे 
७) आपण जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा बोलताना आपल्या मध्ये प्रचंड उत्साह हवा.
८) कुठलीही भाषा मुलांना येण्यासाठी ती प्रथम कानावर पडणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषे बाबतीमध्ये तसंच आहे. इंग्रजी भाषा मुलांना उत्तम येण्यासाठी इंग्रजी भाषेतील गोष्टी मुलांना वाचून दाखवा.
९) त्यासाठी इंग्लिश ऑडिओ बुक स्टोरीज हे माध्यम अत्यंत छान आहे.
१०) ज्यांच्या घरी इंग्रजी कमी बोलले जाते त्यांनी जवळपास नेटिव्ह टीचर शोधा. जी आपले नातेवाईक, ओळखीतली, शेजारचे असू शकते. त्यांच्याकडे आठवड्यातून दोनदा पाठवून मुलांशी इंग्रजी भाषेमध्ये संभाषण करायला सांगा. हे दुसर्‍या भाषेचे बाबतीतही होऊ शकते. जसे तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर गुजराती फॅमिलीकडे मुलांना भाषा ऐकायला पाठवणे.
११) मुलं इंग्रजी शिकताना सुरुवातीला कमीत कमी व्याकरणाचे नियम लावा.
१२) मुलांचा शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर कुठलाही नवीन शब्द किमान चार वेळा तर जास्तीत जास्त बारा वेळा वेगवेगळ्या वाक्यांनमधून त्याच्या कानावर पडले पाहिजे. त्याचं रिपिटेशन व्हायला हवे.
१३) मुलांचा शब्दसंग्रह वाढण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जागी घेऊन जा. जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतो त्या वेळेस त्या जागेबद्दल लाईव्ह कॉमेंट्री सारखे त्यांना माहिती ती द्या. यामध्ये मुलं बरेच नवीन शब्द शिकतात. 
१४) घरातील वस्तुंना लेबल करू शकतात. वेगवेगळ्या भाषेतील लेबल करू शकतात. तसेच मुलांना भाषा शिकवताना फ्लॅश कार्डचा उत्तम वापर होतो. आपण घरी बनवू शकतो.
१५) अधून मधून मुलांचे डोळे, कान, घसा हे तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासा. आजकाल लेझी आईज (आळशी डोळे) यांचे आजार वाढत चालला आहे.
आता आपल्या पाल्याचे शुद्ध उच्चारा साठी काही महत्त्वाच्या टिप्स.. 
१) मुलांशी बोलतांना लाडात बोलू नये, बोबडे बोलू नये. मुलं आपल्याकडून शिकत असतात. बोबडे शब्द त्यांच्या मेंदूमध्ये स्टोअर होतात आणि त्याच पद्धतीने उच्चार होत असतात.
२) मुलांना लहानपणी भरपूर संस्कृत भाषा, संस्कृत श्लोक ऐकवा. यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तसेच बाजारातून विविध सीडी उपलब्ध आहेत. संस्कृत भाषेने उच्चार स्पष्ट होतात.
३) जाणीपूर्वक मुलांकडून काही श्लोक पाठ करून घ्या जसे शिव तांडव स्तोत्र.
४) मुलांना रोज एक अवघड शब्दाची ओळख करून द्या. हे सगळे तुम्ही स्वतः बोला आणि ते ऐकतील मग ते तुमच्या मागे पुन्हा बोलतील. उदाहरणार्थ पद्मावती, सहस्त्रनाम.. हे शब्द कुठल्याही भाषेमधले आपण निवडू शकता.
५) मुलांना ओमकार शिकवा. तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर ओमकार करा. सोबत रोज एक मिनिट तरी श्वासोश्वास तंत्र (ब्रीदिंग टेक्निक) मुलांना शिकवा.
६) तुम्हाला मुलं काही ही सांगत असतील तर तुम्ही मन लावून ऐका. तुम्ही कामात गडबडीत असाल तर किमान तुम्ही ऐकत आहे असे भासवा. ते बोलताना मध्ये मध्ये अडवू नका. बोलताना त्यांना प्रोत्साहित करा अन्यथा ते बोलणं सोडून देतात.
७) सर्वात महत्वाचं ते बोलत असताना मध्ये तुम्ही त्यांचे वाक्य करेक्ट करू नका. त्यांचं वाक्य पूर्ण झालं.. त्यांचं म्हणणं झालं की मग सांगा "योग्य" काय आहे. नाहीतर मुलं बोलण्याचा आत्मविश्वास हरवून बसतील. काही पालकांना मुलांना प्रत्येक शब्दात करेक्ट करण्याची सवय असते. तसे करू नका.
८) मुलांचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी "टंग ट्विस्टर" वाचायला द्या. जसे आपण लहानपणी "कच्चा पापड पक्का पापड" किंवा काकाने काकू चे कामाचे कागद कापले इत्यादी.. इंग्रजी हिंदी अशा विविध भाषांमधले हे टंग ट्विस्टर मुलांना म्हणायला सांगावे.
९) ळ ल ज झ ज्ञ अशा अक्षरांच्या शब्दांच्या कविता किंवा वाक्य बनवून त्यांना म्हणायला सांगणे.
१०) लहानपणी भरपूर बडबड गीते, नर्सरी राईम्स मुलांना म्हणायला सांगणे. याच्यातून लक्षात ठेवण्याची एक कला विकसित होते.
मी काही भाषा तज्ञ नाहीये पण विविध मुलांना निरीक्षण करताना काही गोष्टी जाणवल्या त्या या लेखातून आपल्या समोर मांडलेल्या आहेत.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
(पोस्ट शेअर करू शकता)

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...