Saturday, 28 August 2021

या 'कोव्हिड ' मध्ये सर्वांत जास्त नुकसान कोणाचं झालं?

सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिनच्या विलास जोशी यांचा लेख

कोव्हिड-19 ही जागतिक महामारी आली आणि त्याचा परिणाम सर्व मानवजातीवर, सर्व क्षेत्रावर, जगातील प्रत्येक देशावर झाला. जेव्हा आपण याचा परिणामाची चर्चा करतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की, माझ्या व्यवसायावर.. माझ्या कुटुंबावर.. माझ्या जॉबवर.. माझ्या उत्पन्नावर जास्त परिणाम झाला आहे. दुकानदार म्हणतो , दुकान बंद होतं म्हणून तोटा, कंपनीवाले म्हणतात , सर्व स्टाफला कामावर बोलवता येत नाही म्हणून तोटा, शाळा संस्थाचालक म्हणतात, शाळा बंद म्हणून तोटा, पर्यटन बंद म्हणून टूर्स कंपनीवाले तोट्यात. प्रत्येक जण पैशाचं नुकसान सांगतोय. ते अगदी खरं आहे.. पण कोणी मानसिक नुकसानीबाबत चर्चा करत नाही. काही जण म्हणतील की कुटुंबामध्ये ताण तणाव वाढलेला दिसतोय.. एंग्जाइटीचं प्रमाण वाढलं, एकूणच सामाजिक स्वास्थ सुद्धा बिघडलं आहे.. पण तरीही सर्वात जास्त नुकसान मला हे वाटत नाही.
आर्थिक तोटा कसाही भरून काढता येतो, गेलेली नोकरी परत मिळू शकते, तोट्यामधील व्यवसाय पुढील पाच वर्षात फायद्यामध्ये आणता येऊ शकतात, सामाजिक स्वास्थ्याबाबतीत सुद्धा लोकांची वाढलेली एंग्जाइटी, ताण-तणाव याला समुपदेशनाने आणि योग्य ट्रीटमेंटने सुरळीत करता येऊ शकतं. "हॅपिनेस इंडेक्स" वाढवता येऊ शकतो.. पण एक क्षेत्र असं आहे , त्याचं नुकसान ना मोजता येतं ना आपण भरून काढू शकतो. या कोव्हिड-19 मुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर ते म्हणजे 0 ते 8 वर्षाखालील मुलांचं.
शून्य ते आठ हे वय बाल मेंदू जडणघडणीचं वय असतं. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया पहिल्या आठ वर्षातच घातला जातो. जशी बिल्डिंग उंच आणि भक्कम दिसते कारण तिचा पाया तेवढाच भक्कम आणि खोल असतो..तसाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया हा पहिल्या सहा ते सात वर्षातच घातला जातो. म्हणूनच जगातील सर्व मानसशास्त्रज्ञ सांगतात की या वयात मुलं जे काही ऐकतात, पाहतात, अनुभवतात त्यातून त्यांचं भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य ठरत असतं.

आता या दोन वर्षात या वयोगटातील मुलं घराच्या बाहेर पडली नाही. त्यांनी विविध अनुभव घेतले नाही. खेळ खेळले नाही.. त्यामुळे त्यांच्या बाल मेंदूच जडणघडणीवर कायमचा परिणाम झाला आहे. वर वर हे मूल आनंदी आणि स्वस्थ दिसत असलं तरी मेंदूच्या पातळीवर पेशींचा विकास कमी पडला आहे. खेळण्यातून, उड्या मारण्यातून, मित्रमैत्रिणींशी सोबत मैदानी खेळातून पेशींना जी चालना मिळते त्यातून सिनॅप्सची निर्मिती होत असते. मेंदूमध्ये जितके जास्त सिनॅप्स बनतील तेवढे भविष्यात ते मूल भावनिक, मानसिक आणि शारीरिक पातळींवर सुदृढ होतं.. सोप्या भाषेत हुशार होतं. 

छोटं उदाहरण देतो, आपल्या मेंदूचे तीन भाग असतात. लेफ्ट हेमिस्फिअर, राइट हेमिस्फिअर आणि मध्ये असतो कॉर्पस कॅलोसम. पहिल्या आठ वर्षात हा कॉर्पस कॅलोसम विकसित होतो. मुलं जेवढं मुक्त खेळतील, उड्या मारतील, पळतील, धावतील मैदानावर मनसोक्त खेळतील तेवढा हा कॉर्पस कॅलोसम ताकदवान बनतो, त्याचा विकास होतो. या कॉर्पस कॅलोसम काम तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण वयाची "साठी" गाठतो. म्हातारपणी चालताना तोल सांभाळायचं कार्य कॉर्पस कॅलोसम करतो. जो विकसित पहिल्या आठ वर्षाच्या आत होतो. याचा अर्थ या वयोगटातील मुलांवर किती दूरगामी परिणाम झाला आहे याचा हा नमुना. 

या वयात मुलं ग्रुपमध्ये खेळतात, विविध अनुभव घेतात.. त्यांच्यातून त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा पाया घातला जातो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता (E.Q) वाढलेली हवी. पण मुलं या सगळ्यांपासून वंचित आहेत. प्राथमिक शाळेतील मुलं म्हणजे इयत्ता तिसरी- चौथीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस होतोय, जो पुढे भरून काढता येऊ शकतो. त्यांच्या सामाजिक भावनिक बुद्धिमत्तेचं एवढं नुकसान नाही. पण शून्य ते आठ वर्षाच्या मुलांचा लर्निंग लॉस तर आहेच ,सोबत पायाच तकलादू बनतो आहे. मेंदूची जडणघडण याचा हा काळ निघून जात आहे. त्यामुळे या कोव्हिड-19 मुळे सर्वात जास्त नुकसान या वयोगटातील बालकांचं झालं. पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं झालं. या मुलांना ऑनलाइन शिक्षणसुद्धा आपण परिणामकारक नाही देऊ शकत. हे मर्यादित स्वरूपाचं द्यावं लागतं. अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे या वयातील मुलांची कल्पनाशक्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. 

मग प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो? आपल्या हातात हे नुकसान कमीत कमी कसं करता येईल हे पाहणं एवढंच आहे. त्यासाठी पालकांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. पालक म्हणजे आई आणि वडील दोघांनी मुलांना ठरवून किमान दोन तास क्वालिटी टाइम द्यावा. ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवून एक तास विविध गोष्टींचे अनुभव देणं. यामध्ये हाताने करायचे उपक्रम हे जास्तीत जास्त असतील आणि किमान एक तास मुलांना मनसोक्त खेळू देणं, उड्या मारण्यापासून ते धावणं लपाछपी खेळण्यापासून ते सायकल चालवणं असे अनेक शारीरिक खेळ मुलांसोबत खेळणं खूप महत्त्वाचं आहे. या बिकट काळातही पुढच्या पिढीचं भविष्य आपणच घडवायचं आहे, ती आपलीच जबाबदारी आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Saturday, 21 August 2021

सुचतं कसं?

प्रत्येकाने वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रातील लेख

'सुचणं' ही एक जन्मजात असणारी कला आहे का? की ती ठरवून विकसित करता येते? 

आजचं शास्त्र छातीठोकपणे सांगतं की सुचणं ही कला आहे जी विकसित केली जाते. 

मग प्रश्न निर्माण होतो ती केव्हा विकसित करता येते?

तर, ती वयाच्या कुठल्याही टप्प्यावर विकसित करता येते पण जर लहानपणी पालकांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेकडे लक्ष पुरवलं असेल, त्यांना त्यासाठी वाव दिला असेल तर मोठेपणी सुचण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने होते. सर्वांत महत्त्वाचं त्या सुचण्यामध्ये नावीन्य असतं.

कोणतीही समस्या विविध पद्धतींनी सोडवण्यासाठी विविध उत्तरं शोधण्याचं सामर्थ्य या नावीन्यामुळे मिळतं. 

त्यासाठी लहानपणापासूनच शोधक वृत्ती निर्माण करायला आणि व्हायला हवी. तर सुचण्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी करता येऊ शकतो. 

सुचणं म्हणजे जगताना विविध समस्या सोडवण्यासाठी लागणाऱ्या कल्पना..आयडिया.. सृजनात्मक विचार आणि बरंच काही.. 

आता एखादा विचार जेव्हा सुचतो तो तुमच्या बुद्धीची किंवा मेंदूची जडणघडण कशी झाली त्यानुसार. त्या जडणघडणीमधून तुमच्या विचारांची व्याप्ती..खोली कळते. तुम्ही लहानपणापासून किती अनुभव घेता.. त्या अनुभवात किती समृद्धी आहे.. तुम्ही किती पुस्तकं वाचता.. कोणत्या प्रकारची वाचता.. तुम्ही किती मनमोकळं व्यक्त होता.. चर्चा करता.. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमचा जीवनाकडे, लोकांकडे, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे..त्यानुसार तुम्हाला 'सुचतं'. 

सुचतं सगळ्यांनाच. पण त्या सुचण्यामध्ये विचारांची खोली किती.. समस्या सोडवण्याची ताकद किती.. आणि वास्तवाला धरून किती.. याची मोजपट्टी महत्त्वाची असते.

जे पालक लहानपणी त्यांच्या पाल्यावर जाणीवपूर्वक मेहनत घेतात, त्यांच्या विचारांवर काम करतात.. त्यासाठी त्याला/तिला विविध गोष्टी वाचून सांगतात, अभिव्यक्ती होण्यासाठी चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देतात, भावना व्यक्त होतील असं घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवतात, पाच इंद्रियांचे विविध अनुभव देतात, त्यासाठी निसर्गाशी नातं जुळवतात, घरात वाचनसंस्कृती रुजवतात अशा घरातील मुलं अधिक समृद्ध पद्धतीने वाढतात. मोठेपणी ही समृद्धी 'सुचण्या'तून व्यक्त होते. 

या सुचण्याचा शत्रू जर कोणी असेल तर अतिरिक्त स्क्रीन टाईम. 

या स्क्रीन टाईममधून येणारी जास्तीची बिनकामाची माहिती आणि जगण्यातला ताणतणाव. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला लवकर सुचत नाही. 

कम्प्युटरच्या भाषेत बोलायचं झालं तर आपला मेंदू हँग होतो. 

जसे मोबाईलवर खूप सारे अँपलिकेशन बँकेण्डला चालू राहिले की मोबाईल स्लो होतो.. तसं आपल्या मेंदूवर सातत्याने माहिती आदळत राहिली, मग ती फिल्म असो, युट्यूब व्हिडिओ असो, फेसबुक.. व्हाट्सअँप.. व्हिडिओ गेम..नेटफ्लिक्सपासून तर सातत्याने झूम वेबिनार असो..या सर्व माहितीमधून आपल्या उपयोगाची माहिती कोणती आणि बिनकामाची कोणती हे मेंदूला ठरवावं लागतं. या सर्व क्रियांमध्ये मेंदू थकतो. थकल्यावर त्याला झोपेची आवश्यकता असते. 

पण झोपेची सवत जर कोणी असेल ती म्हणजे स्क्रीन.

म्हणजे एकीकडे आपली, मुलांची सर्वांचीच झोप कमी होते. त्यात अतिरिक्त माहितीच्या जाळ्यांमध्ये आपला मेंदू अडकतो म्हणून तो हँग होतो. याचे दूरगामी परिणाम म्हणजे नैराश्य, उत्साहाची कमी, चिडचिडेपणा, मुलांबाबत एडीएचडी.. असं सर्वकाही चालू होतं. 

असं व्हायला नको असेल तर मुलांचा, आपला, सगळ्यांचाच स्क्रीन टाईम कमी व्हायला हवा. मुलांचा शाळेपुरता स्क्रीन टाईम ठेवावा. त्यानंतरचा अतिरिक्त स्क्रीन टाईम कमी करावा. मोठ्यांनी सोशल मीडियावर केव्हा जायचं.. त्याचा वेळ.. त्याचं टाईमटेबल करावे. अतिरिक्त स्क्रीन टाईम होत नाही ना याचं भान पालकांनी स्वतः बाळगणं अत्यंत गरजेचं आहे कारण याचा संबंध प्रत्यक्ष आपल्या विचारप्रक्रियेशी आहे.. सुचण्याशी आहे.. सुचणं अधिक जलद आणि नावीन्यपूर्ण असण्याशी आहे. 

ही क्रिया अधिक उत्तम व्हावी असं तुमच्याबाबत आणि आपल्या पाल्याबाबत वाटत असेल तर मुलांना विविध अनुभव द्या, निसर्गाशी नातं जुळवा, विविध कला सोबतीला द्या, विविध पुस्तकं वाचायला द्या, गोष्टी स्वतः वाचा, त्यांना वाचायला द्या. त्याकरता स्वतःसाठी आणि मुलांसाठी वेळ काढा. या सगळ्यातून मुलांची विचारप्रक्रिया अधिक चांगली होईल आणि भविष्यात त्यांना जलद, नावीन्यपूर्ण आणि सृजनात्मक सुचेल.

टीप: कोविडमुळे तुम्ही मुलांना भरपूर वेळ दिला आहे पण स्वतःला प्रश्न विचारा या वेळेमध्ये 'क्वालिटी टाईम' किती होता? आणि त्यात आपण स्क्रीनच्या किती आहारी गेलो? 

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



Friday, 30 July 2021

विद्यार्थ्यांचा "लर्निंग आऊटकम" केव्हा आणि कसा वाढेल?

र्व पालकांनी शिक्षकांनी वाचावा असा सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.


कोव्हिड येण्याआधी भारताने शिक्षणात एक चांगली कामगिरी केली ती म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी संख्या खूपच कमी केली. कोव्हिड आधी भारतात जवळजवळ 95 ते 97 टक्के विद्यार्थी शाळेत दाखल होते. वय वर्ष  6 ते 14 मधील  enrollment ratio खूप छान होता. आता पुन्हा शाळा चालू झाल्यावर तो किती कमी झाला हा संशोधनाचा आणि माझ्या दुसऱ्या लेखाचा विषय आहे. 

आज मला विद्यार्थ्यांच्या Learning Loss वर तुमचे लक्ष केंद्रित करायचे आहे. ही गोष्ट चांगली आहे की 95 टक्के विद्यार्थी शाळेत दाखल होते.. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की त्यातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही. इयत्ता पाचवी मधील 50% विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचे वाचन आणि गणित येत नाही. याचाच अर्थ enrollment वाढले पण त्या मानाने Learning outcome नाही वाढले. आता काही शिक्षक "असर" किंवा "प्रथम" संस्थेचा अहवाल मान्य करणार नाही. असे बरेच छोटे मोठे रिसर्च रिपोर्ट उपलब्ध आहे ज्यामध्ये Learning outcome हा खूप कमी आहे हे सिद्ध झाले आहे. खास करून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा अध्ययन निष्पत्ती ही कमी आहे. अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्र मधील नोबेल पारितोषिक मिळाले त्यांचे संशोधन हे अधोरेखित करते की विद्यार्थी शाळेत जाताय पण शिकत नाही. 

प्रश्न हा आहे की Learning outcomes मागे असण्याचे कारणे काय?
अध्ययन निष्पत्ती कमी असल्याचे कारणे बरेच आहे पण मुख्य कारण हे आहे की आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही ही पॉलिसी. त्यांना पुढील वर्गात पाठवायचे. आधीच्या इयत्ते मधील ज्ञान कौशल्य त्याने किंवा तिने आत्मसात जरी केले नसले तरी त्यांना पुढील वर्गात ढकलले जाते. आता RTE Act मधील या प्रोव्हीजन चा उद्देश हा शाळाबाह्य विद्यार्थी संख्या वाढू नये. विद्यार्थी मध्येच शाळा सोडू नये हा होता. आता हा उदात्त हेतू जरी असला तरी त्याचा दुष्परिणाम हा झाला की विद्यार्थी जेव्हा इयत्ता आठवी मध्ये येतो तेव्हा त्यातील काही विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचे तर काही विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीचे तर काहींना इयत्ता पाचवी- सहावी लेव्हल चे ज्ञान कौशल्य असते. फार थोडे हे इयत्ता आठवी मध्ये शिकण्याच्या स्तरावर असतात. आता जगातील कुठल्याही शिक्षकाला हे अशक्य आहे की वर्गातील एवढ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्रित शिकवणे कारण प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी आहे. (इथे शिकण्याची पातळी म्हणतो आहे.. ना की शिकण्याची पद्धत.) 

खरं तर जेव्हा हे विद्यार्थी दुसरी, तिसरी, चौथी इयत्ते पासून अभ्यासात मागे पडत असतात तेव्हा त्यांना तिथे शैक्षणिक मदत अपेक्षित असते. ती मदत झाली झाली नाही तर ते वर्गात फक्त बसतात, खेळतात, डबा खातात पण शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत नाही. शिक्षक प्रामाणिकपणे मेहनतीने त्या त्या वर्गांमधील अभ्यासक्रम शिकवत असतो पण काही विद्यार्थ्यांना आधीच्या इयत्ता मधील ज्ञान कौशल्याच्या संकल्पना स्पष्ट झाल्या नसतात. म्हणून जेव्हा ते इयत्ता पाचवीमध्ये येतात तेव्हा त्यातील 50 टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरी मधील गणित जमत नाही आणि हेच विद्यार्थी जेव्हा इयत्ता आठवी ला येतात तेव्हा हे मागे पडलेले प्रमाण प्रचंड वाढलेले असते. आठवी मधील बरेच विद्यार्थी त्यांच्या इयत्तेच्या खालील इयत्तेच्या लेव्हल वर असतात. 

प्रश्न हा आहे की ते ज्या लेव्हल वर आहे त्या लेव्हलच्या पुढे का जात नाही? ते पुढे जायला लागली की विद्यार्थी हे "शिकती" होतील. मागे राहण्याचे प्रमाण एवढे मोठे आहे म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात फक्त पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान वर लक्ष केंद्रित करायला लावले आहे. foundation literacy and numeracy  म्हणजे शिकण्यासाठी वाचता येणे. नवीन संकल्पना शिकवण्यासाठी तुम्हाला आधीच्या संकल्पना येणे यालाच पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान (foundation literacy and numeracy ) म्हणतात.
आता कोरोनामुळे आधीच Learning loss प्रचंड वाढला आहे. त्यात आधीपासून भारतातील 50% विद्यार्थी त्यांचा इयत्ते पेक्षा मागील काही इयत्ते च्या दर्जाचे आहे. 

मग खर्‍या अर्थाने Learning outcome  सुधारण्यासाठी काय करावे लागेल?
पहिले तर पालकांना शिक्षकांना जेव्हा लक्षात येते की याला गणिताची किंवा एखाद्या विषयाची ही संकल्पना जमतं नाही मग त्याच्या पेक्षा सोपी संकल्पना त्याला विचारणे. ती पण जमत नसेल तर त्याला लेव्हल पेक्षा खाली उतरून त्याला किंवा तिला विचारणे. Simplify version द्यायचे. असे इयत्ता चौथी, पाचवी पर्यंत खाली घेऊन जायचे. त्याला कुठल्या लेव्हल चे गणित सोडवता आले ती त्याची शिकण्याची ग्रेड आहे हे समजावे. मग तिथून वाचन किंवा गणित कौशल्य शिकवायला सुरुवात करायचे. त्यासाठी टेक्नॉलॉजी ची मदत घेणे. कोरोनामुळे टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणात वाढला आहे पण ही टेक्नॉलॉजी जोपर्यंत तळागाळापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत ती उपयोगाची नसते. नुसते संगणक देऊन विद्यार्थी शिकत नाही. याबाबत सुद्धा बरेच संशोधन उपलब्ध आहे. जोपर्यंत कम्प्यूटर मध्ये pedagogy येत नाही.. अध्यापन शास्त्राच्या पद्धती संगणकामध्ये येत नाही तोपर्यंत टेक्नॉलॉजी काही उपयोगाचे नाही. आजकाल बरेच अँप, सॉफ्टवेअर उपलब्ध झाले आहे की विद्यार्थ्यांना मागील इयत्तेच्या संकल्पना स्वअध्यायाने ते शिकू शकतील आणि काही महिन्यात ते त्यांच्या इयत्ते मागील इयत्तेच्या संकल्पना ज्ञान कौशल्य समजायला तयार होती. 

जरी टेक्नॉलॉजी ची मदत नाही घेतली किंवा शक्य नसेल तर शिक्षकांनी शाळा संपल्यावर अधिक वेळ अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन शिकवले तरी मदत होऊ शकते. त्यासाठी शिक्षकांना शाळाबाह्य कामापासून मुक्ती मिळणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना न रागवता त्यांच्या मागील इयत्तेचा अभ्यास करून घेतला तरी हे विद्यार्थी पुढे येऊ शकतात. त्यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्याला समजून घेणे आवश्यक आहे. नुसतेच टीका करून किंवा दुसऱ्या विद्यार्थीशी तुलना करून हा प्रश्न सुटणार नाही. पण अशिक्षित पालकां बाबत ही समस्या मोठी आहे. अशा वेळेस विविध एनजीओ ने पुढे येऊन विद्यार्थ्यांना मागील इयत्तेचे ज्ञान शिकवले तर नवीन शैक्षणिक धोरण मधील foundation literacy and numeracy चे उद्दिष्ट लवकरच पूर्ण केले जाईल. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अध्ययन अक्षमता (Learning disabilities) बाबत वेगळी मेहनत घ्यावी लागेल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या वेगळ्या असतात.  यांचे प्रमाण 10% आहे बाकी सर्व विद्यार्थ्यां वर पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान वर भर दिली तर Learning outcomes चांगले येतील. ते चांगले यायला लागले की विद्यार्थी "शिकती' होतील.. "शिकती" झाले की "टीकती" होतील आणि कॉलेज पर्यंत शिक्षण पूर्ण करतील. त्यांचात समस्या सोडविण्याचे तंत्र लवकर विकसित होतील.

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक



Thursday, 29 July 2021

ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी घडतात?

जेव्हा समस्या येतात तेव्हा समस्येला संधी समजायची का अडचण हे दोन पर्याय उपलब्ध असतात. शहरी भागातील विद्यार्थी आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण घेत आहे त्याच्या आधारावर असे नक्की म्हणता येईल की चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षकांनी उद्याचा भारत आज घडवायला सुरुवात केली आहे. 


कोरोना मुळे शाळा बंद झाल्या पण शिक्षण नाही. ऑनलाइन शिक्षण ला दोष देणारे आणि ऑनलाइन शिक्षणाला आत्मसात करणारे असे दोन वर्ग आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा जरी असल्या तरी कोरोना काळातील शिक्षणाचा हा उत्तम पर्याय आहे. साधारण तिसरी च्या पुढे, खासकरून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हे "अभ्यासक्रमातील माहिती पुरवण्याचे" उत्तम माध्यम आहे. शिक्षण म्हणजे विविध अनुभव आणि माहीती यांची सांगड असते. फक्त माहितीचा साठा म्हणजे शिक्षण नव्हे. पण ऑनलाइन शिक्षणातून आपण माहिती उत्तम पद्धतीने पोचवू शकतो हे त्याचे बलस्थान. अनुभव आणि भावनिक बुद्धिमत्ता ऑनलाइन शिक्षणातून तेवढी प्रभावी विकसित करू शकत नाही ही याची मर्यादा. याचाच अर्थ अभ्यासक्रमामधील माहिती योग्य पोहोचवता येते पण विद्यार्थी भावनिक व मानसिक दृष्ट्या पुढील वर्गात जाण्यास काही प्रमाणात तयार नाही. भावनिक बुद्धिमत्तेचा हवा तेवढा विकास झाला नाही. याचे मुख्य कारण कोरोना ची भीती, घरांमध्येच बसून रहाणे, खेळ कमी, मित्र मैत्रिणीचा प्रत्यक्ष भेटी नाही. खरंतर प्रेम, काळजी, प्रेमाचा स्पर्श या भावना शिक्षक ऑनलाइन मधून पोहोचू शकत नाही आणि विद्यार्थी डाऊनलोड करू शकत नाही. 

पण काही प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेची कमतरता पालकांनी भरून काढली. कोरोना पूर्वीचे भारतीय पालकत्व आणि कोरोना नंतरच पालकत्व यामध्ये पालकांमध्ये विधायक बदल दिसून येतो. पालकांनी नियमितपणे किंवा जमेल तसा मुलांचा अभ्यास घेतला. पालकांनी मुलांचे वाचन-लेखन कौशल्यावर भर दिला.  काही पालकांनी घरातील कामे आणि प्रकल्प माध्यमातून अनुभवाधरीत शिक्षण दिले. कृतिशील पालकत्वाचा प्रयत्न केला गेला. 

बरेच पालक मुलांसोबत नेहमी ऑनलाईन स्कूल अटेंड करायचे. आता याचा त्रास शिक्षकांना सुरुवातीला झाला पण हळूहळू शिक्षकांना न दिसणारी आईची सवय झाली. पण याचा फायदा सुद्धा झाला, पालक ऐकता आहेत या विचाराने शिक्षक शिकवतांना चुका कमी करायचे आणि त्यातूनच शिक्षकांची शिकवण्याची कॉलिटी सुधारली. खरं तर जे शिक्षक ऑनलाइन शिक्षण देत आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. टेक्नोसॅव्ही शिक्षक होण्यासाठी झूम, गुगल मीट याचे प्लॅटफॉर्म समजून घेणे, शिकवता शिकवता Mute Unmute, पीपीटी प्रेझेन्टेशन करता येणे, व्हिडिओ समोर स्पष्ट दिसण्यासाठी खिडकी समोरचा लाईट चेहऱ्यावर घेणे, तिथे नेटवर्क आणण्यासाठी प्रयत्न करणे, घरात सासू-सासरे पती मुलं यांच्या समोर न लाजता कॅमेरासमोर शिकवणे.. हे सर्व करायला व स्वतःमध्ये बदल करायला हिम्मत लागते. जी बऱ्याच शिक्षकांनी दाखवली म्हणून तर मी म्हटलं उद्याचा भारत आज घडतोय. 

पुढील दहा वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता.. हायब्रीड एज्युकेशन सिस्टीम, मशीन लर्निंग या संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करीअर घडवा तुम्हाला टेक्नोसॅवी असणे ही काळाची आवश्यकता असणार आहे. त्याचा पाया ऑनलाइन शिक्षण आहे. जर कोरोना नसता तर या नव्या पद्धतीने शिकणे शिकवण्याचा प्रकार भारतीय शिक्षणात रुजायला खूप वेळ लागला असता. गरज ही शोधाची जननी आहे. ही पद्धत कोरोना नंतरच्या काळात नेहमीच्या पद्धतीला सपोर्ट होईल पण ती मुख्य पद्धत होऊ शकत नाही पण ही शिक्षणाची तंत्रस्नेही पद्धत सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक होती. 
बऱ्याच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये सहजपणे स्वतःला सामावून घेतले. हे खरे आहे जे व्हिडीओ कॉलिंग आपण वयाच्या पन्नाशीला पडत धडपडत शिकतो ते हे सात ते आठ वर्षाची मुलं अतिशय सहज स्वतःहून शिकतात व आपल्यालाही शिकवतात. 

आता या ऑनलाईन क्लास ला शालेय विद्यार्थी पूर्णवेळ बसायचे का? तर नाही.. कारण मुलं घरात असायचे. शाळेसारखी शिस्त घरात नसते. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी प्रामाणिकपणे स्क्रीन समोर शिक्षक जे सांगतील तसे वागायचे. काही मुलं कधी कधी स्क्रीन समोर असायचे. आता इथे एक भीती नेहमी असते की जे विद्यार्थी कधीकधी स्क्रीन समोर यायचे ते पालकांचे लक्ष नसताना मोबाईल गेम खेळायचे..ज्या गोष्टी बघायच्या नाही त्या गोष्टी च्या वेबसाईटवर जायचे.. असे प्रकार वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाले असण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून प्रत्यक्ष स्कूल सुरू झाल्यानंतर शाळा शाळांमध्ये शिक्षकांच्या आणि समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे काउन्सेलिंग होणे ही काळाची गरज असेल. तसेच स्क्रीन टाईम सोबत युट्यूब व्हिडिओ, मोबाईल गेम, टीव्ही यांचा स्क्रीन टाईम जोडला तर तो वेळ खूप होतो. काही विद्यार्थ्यांचा तो सात ते आठ तासाचा गेला. हे अतिरिक्त स्क्रीन टाईम मुळे अतिचंचलता (ADHD) सारखे समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच मुलांना एका ठिकाणी फार वेळ न बसण्याची सवय लागली आहे. आता यातील सर्व जणांना ADHD झाला असे मुळीच नाही पण यातील 15 ते 20 टक्के प्रमाण नक्कीच असू शकेल. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना किमान तीन महिने ग्राउंड वर भरपूर खेळू देणे हा महत्वाचा उपाय यावर आहे. अकॅडमिक विषयाचे तास कमी करून ग्राऊंडवरील तास वाढवणे गरजेचे असेल. 

अतिरिक्त स्क्रीन टाईम च्या समस्या जरी असल्या तरी एकंदरीत ऑनलाइन शिक्षण यशस्वी होण्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यशस्वी झाले आहेत म्हणूनच मी म्हटले की उद्याचा भारत आज घडतोय. या घडण्यामध्ये ते शिक्षक अग्रेसर होते ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला. टेक्नोसॅवी स्किल शिकणे हे व्यक्तिपरत्वे जरी असले तरी आजूबाजूचे वातावरण, प्रोत्साहन, संस्थाचालकांचा..मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे. 

शिक्षणाची नवी व्याख्या भारत लिहायला घेत आहे. हे तंत्रज्ञान जेवढे गरिबांन पर्यंत पोहोचेल तेवढे इंडिया आणि भारत यामधील दरी दूर होईल. नाहीतर श्रीमंतांची मुलं IIT मध्ये आणि गरिबांची मुलं ITI मध्ये हे चित्र दिसत राहील. हे चित्र बदलण्यासाठी तंत्रज्ञान तथा ऑनलाइन शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचणे ही सरकार, शाळा, संस्था आणि समाज म्हणून "आपण" सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनामुळे याची सुरुवात झाली हेच खरे. 

त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी घडतात का? तर काही प्रमाणात नक्कीच घडतात..विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात.. शिक्षकांच्या संपर्कात राहतात.. आणि हायब्रीड एज्युकेशनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. आता गरज आहे सरकारने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम राबवण्याची कारण तंत्रज्ञान हे कोणालाही थांबू शकत नाही. 

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक

आईची सृजनशीलता

मला बरेच जण विचारतात की सर तुम्ही एवढे क्रिएटिव्ह कसे आहात? एवढे सुचते कसे? मुख्य म्हणजे वेगळं सुचते कसे? थोडक्यात त्यांना विचारायचे असते तुमच्यात सृजनशीलता आली कुठून? 


हाच प्रश्न माझी आई मला विचारायची. माझी आई उषा जोशी मागील आठवड्यात ७ जुलै २०२१ ला अल्प आजाराने वारली. मी नवीन कुठलाही उपक्रम केला की कौतुकाने ती म्हणायची, "सच्चू, तुला सुचतं कसं?" खरं तर तिच्या या प्रश्नाचे उत्तर तिने लहानपणी माझ्यावर केलेल्या संस्कारांमध्ये होते. मी गंमती मध्ये तिला म्हणायचो, "तुझ्याचमुळे ग" तिला ते समजायचे नाही. 

खरंच सृजनशीलता हे त्या व्यक्तीला लहानपणी कशी प्रेरणा मिळाली यावर असते. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. मिहाली यांनी यावर संशोधन केले आहे. त्यांचा संशोधनपर ग्रंथात मूलभूत प्रश्न हा उपस्थित केला होता की, सृजनशील व्यक्ती ही लहानपणापासूनच सृजनशील असते का?  तिला जन्मतः हे सर्व गुण मिळाले असतात का? याचे उत्तर त्यांनी असे दिले की बालकाच्या वातावरणात योग्य ते बदल घडवून आणले तर ते बालक मोठ्यापणी अधिक सृजनशील बनते. कुठलाही व्यक्ती जेव्हा सृजनशील तसेच निर्मितीक्षम बनते तेव्हा ती घटना एकाएकी होत नसते किंवा हा बदल एका रात्रीत होत नसतो. तर त्यामागे प्रचंड मेहनत व सातत्याने परिश्रम घेतले असतात. यामध्ये जिज्ञासा, कुतूहल आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये रस वाटणे या मानस पातळीवर होणाऱ्या प्रक्रिया घडणे गरजेचे असते. 

आता ही मानस पातळीवर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या पालकांची मोठी भूमिका असते. माझ्या वडिलांची दर तीन वर्षांनी होणारी बदली आणि मी शेंडेफळ असल्याने नेहमी आई वडील सोबत राहण्याची संधी असायची. आईचं पूर्ण शिक्षण गुजराती माध्यमातून झाले असल्याने माझा मराठी माध्यमाचा अभ्यास घ्यायची जबाबदारी तिची नसायची पण अभ्यासाचे वातावरण निर्मिती उत्तम ती करायची. मी अभ्यासात तसा अप्रगत असल्याने माझा जास्त रस चित्र काढण्यात असायचा. आई चित्र काढायला प्रेरणा नेहमी द्यायची. आता श्री. मिहाली म्हणतात, लहानपणी कुठल्यातरी कलेचे अनुभव, विविध रंगांचे अनुभव मिळणे.. सोबत त्या अनुभवाला कौतुकाची थाप मिळणे याने मेंदूमधील सृजनशीलता निर्माण होणाऱ्या पेशींना चालना मिळते. मेंदूतील इतर पेशीं सोबत त्यांची घट्ट जुळणी झाली तर व्यक्ती मोठ्यापणी सृजनशील आणि निर्मितीक्षम होतो. 
माझ्या आईने प्रोत्साहनातुन कौतुक अन कौतुकासाठी विविध संधी उपलब्ध करून माझे संगोपन केले. 

आपण मुलांना चित्रकला काढायला प्रोत्साहन देतो ते डोळ्यासमोर कोणी महान चित्रकार बनावा म्हणून किंवा त्यात करिअर व्हावे म्हणून इथेच आपली पालकत्वची चूक होते. क्रीटीव्हीटी वाढवण्यात लहानपणी भरपूर चित्र, खूप सार्‍या गोष्टी ऐकणे, गोष्टी वाचणे आणि मनसोक्त हुंदडणे.. फिरणे येते. सोबत पाच इंद्रिये यांचे विविध अनुभव देणे. माझ्या आईने हे लहानपणी मला भरपूर करू दिले. "अभ्यासच कर" यावर कधीही तिने हट्ट केला नाही. जे जमते ते कर.. सोबतीला व्वा.. छान.. मस्त.. अजून नवीन चित्र काढ.. असे प्रोत्साहन असायचे.

आपले पालकत्व असे हवे ज्‍यामध्‍ये पाल्य लहान वयात विविध गोष्टी करून बघण्याची त्याला संधी मिळेल कारण निर्माणक्षमतेचा हा पाया आहे. अभ्यासात जरी पाल्य मागे असला तरी पालकांची वागणूक अशी हवी की ज्यामध्ये पाल्य आत्मविश्वास हरवून न जाता तो किंवा ती काहीतरी नक्की करेल.. हा विश्वास निर्माण करता येणारी हवी. माझ्या आईने हे भरपूर केले. म्हणून जो प्रश्न मला सर्व विचारतात की, "तुला एवढं सुचतं कसं?' "तू एवढा क्रिएटिव्ह कसा?" तर या प्रश्नाचे उत्तर, माझ्या आईने सृजनशीलतेचा पाया घातला त्यामध्ये आहे. आता हे सगळं तिने कळत नकळत केले त्या कळत नकळत घडलेल्या संस्कारातून सृजनशीलतेचा जन्म झाला.
आई काय करू शकते तर आई सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व बनवू शकते. तेवढी ताकद तिच्या प्यारिंटींग मध्ये असायला पाहिजे. जी मला मिळाली ती उभरत्या सर्व आयांना मिळो..खास करून पहिल्या दहा वर्षातील पाल्यांच्या पालकांना.
आता माझी आई नाही पण माझ्या सृजनशीलते मध्ये तिचा सहवास नक्कीच असेल. 

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

शिक्षक हे गुरु होऊ शकतात का?

नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच गुरू समजून त्यांना शुभेच्छा दिल्या. खरंतर "शिक्षक" हा "गुरु" का फक्त शिक्षक आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्याहूनही पुढे शिक्षक हा गुरूच्या भूमिकेत येऊ शकतो का याचा विचार करण्याचा या लेखात प्रयत्न आहे.


गुरू कोणाला म्हणावे आणि गुरू काय सांगतो? तर गुरु आयुष्य कसं जगावं ते सांगतो..
जो हरवल्याना  रस्ता दाखवतो.
गुरु हा तत्वज्ञानी असतो.
प्रत्येक व्यक्ती स्वतःचे अध्यात्मे घेऊन जगत असतो. हे अध्यात्मिक ज्ञान येते गुरूकडून..
गुरु तुमच्या जीवनाची फिलॉसॉफी बनवतो. म्हणून आयुष्यात योग्य गुरु निवडणे आवश्यक असते. इथे निवड चुकली तर अडचण होऊ शकते.. गुरु कोणीही असू शकतो, मग तो आई-वडील, मित्र मैत्रीण, भाऊ, सहकारी, शिक्षक.. कोणीही.. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवतात व त्यांच्या विचार तुम्ही स्वतःचे मानतात आणि ते तुमचे जीवनसूत्र बनवतात. ते प्रत्यक्ष तुमच्या जीवनात हवे असे मुळीच नसते जसे ओशो पासून तर सध्याच्या तरुणांचा ताईत बनलेले संदीप माहेश्वरी.
मग शिक्षक हा गुरू शकतो का?
तर नक्कीच होऊ शकतो.
शिक्षक कोणाला म्हणावे? आणि त्याचं कार्य काय? तर शिक्षक हा शिकवण्याचे कार्य करतो.
भारतीय तत्त्वज्ञानात गुरु आणि शिक्षक हे वेगळे समजले जातात. गुरुपौर्णिमा म्हणजे शिक्षक दिन नाही. शिक्षक विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवतो तर गुरु ते कौशल्य आयुष्यात कसे वापरायचे ते शिकवतो.
शिक्षक हा म्हणजे शाळेतला शिक्षक असा संकुचित शब्द नसून पालक सुद्धा शिक्षक असतात किंबहुना ते लहान मुलांच्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात.
प्रश्न हा आहे टीचरला गुरू होता येते का?
तर नक्कीच हो!! जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकवता शिकवता एक ऊर्जा निर्माण करू शकतो तो गुरु होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो. ही ऊर्जा असते "तू करू शकतो" या मानस प्रक्रियेची..शिक्षक तेव्हा गुरू होतो जेव्हा तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही तर शिक्षणाची तहान निर्माण करतो. आपल्याकडे म्हण आहे, घोड्याला तलावा जवळ नेता येते पण तलावातील पाणी पी असं करता येत नाही. जर घोड्याला तहानच लागली नसेल तर तो का बरं पाणी पेईल? गुरु ती तहान निर्माण करतो.
आपल्या भारताला असे शिक्षण हवे आहे जे त्यांच्या त्यांच्या विषयात गुरु बनतील आणि विद्यार्थ्यांना जगण्याची प्रेरणा देतील.
विद्यार्थी आयुष्यात कधी नैराश्य अनुभवणार नाही आणि नैराश्य आलं तर त्यांना शिक्षकांचे ते शब्द आठवतील जे तुम्ही त्याला शाळेत शिकवता शिकवता सहज सांगितले होते. त्या क्षणी तुम्ही शिक्षक नाही.. गुरू झालात.
पण सध्या वास्तवात असे शिक्षक कमी आहे. खरं तर शिक्षकच निराशेच्या अंधारात ओढले जात आहे. "शाळा नाही म्हणून फी नाही" या पालकांच्या हट्टापायी covid-19 मध्ये बऱ्याच शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या. जे शिक्षक ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहे त्यांना आठ ते नऊ तासांचा स्क्रीन टाईम मुळे त्रास होतोय. काही महिन्यात लाखो टीचेर्स टेक्नोसॅवी होऊन, कमी जागेत, घरच्यांच्या समोर.. कॅमेरा फेस करून सातत्याने शिकवत आहे. मग शिकून झाल्यानंतर शाळेचे बाकीचे कामे करणे. जसे स्क्रीनवर पेपर तपासणी, उपस्थिती घेणे, व्हिडिओ बनवणे, बनवलेला व्हिडिओ एडिट करणे, चुकला तर पुन्हा व्हिडिओ बनवणे, PDF बनवणे, PPT बनवणे, असे असंख्य कामे करावी लागतात. त्यात हे सर्व कामे "वर्क फ्रॉम होम" या संकल्पने खाली येतात. पण भारतात पुरुष शिक्षक आणि महिला शिक्षक यामध्ये खूप फरक आहे. महिला शिक्षक वरील शाळेचे सर्व कामे करून घरातील सर्व कामे करावी लागतात. शिक्षक आई 24 तास घरात आहे म्हणून मुलं, सासू-सासरे तिला केव्हा पण घरातील कामे सांगतात. हे सर्व करून ती हसत-खेळत विद्यार्थ्यांसमोर गुगल मीटवर किंवा झूम वर येते. वात्रट मुलांना सांभाळत म्यूट आणि अनम्यूट करत शिकवते. अशा सर्व मेहनती शिक्षकांना प्रेरणा द्यायची गरज आहे. त्यांना टेक्नोसॅवी गुरु म्हणून सन्मानित करायची आवश्यकता आहे.. नाहीतर शिक्षक जो गुरु होऊ शकतो या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक लागेल. चला या covid-19 काळात प्रत्येक शिक्षकांसोबत सन्मान वाढवूया. तुम्ही पालक असाल तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेची फी भरा म्हणजे शिक्षक हा गुरू होण्यासाठी तयार होईल. तुमच्या पाल्यामध्ये "तु करु शकतो" ही भावना रुजू शकेल. त्यासाठी सर्व शिक्षकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. याची मला जाणीव आहे की सर्वच शिक्षक हे गुरु होण्याच्या मार्गावर जात नाही. पण जे जाऊ शकतात त्यांना खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे. जगातला प्रत्येक गुरु त्याच्या विद्यार्थ्यांना एकच मंत्र देत असतो तो म्हणजे, "तू करू शकतोस" आणि हा मंत्र खऱ्या अर्थाने शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना लहानपणी देत असतात. तो अधिक प्रभावीपणे देण्यासाठी शिक्षकांना सन्मान देणे गरजेचे आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Sunday, 18 July 2021

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत आपण सिरीयस आहोत का?

 शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमध्ये लेख

चायना ने जगाला कोरोना दिला हे जग जाहीर आहे. त्यात भर म्हणजे मागील वर्षी चायना भारत संबंध खराब झाले म्हणून भारतीयांनी चायनीज प्रॉडक्ट वापरू नका असे आव्हान सुद्धा झाले. ते योग्य आहे सुद्धा आहे. चायनीज प्रॉडक्ट वर बंदी आणली पाहिजे याचाच परिणाम म्हणून आज *आपण 70 हुन अधिक चायनीज ॲप वर बंदी आणली. पण फक्त बंदी करून प्रश्न सुटणार आहे का? मुद्दा हा आहे हे अँप आपण का बनू शकत नाही?* चायना प्रोडक्शन मध्ये टॉप ला आहे.. आपण का नाही? याचा आपण जरा खोलात विचार केला तर याचे कारण सापडते शिक्षणात. भारतात जेमतेम सातशे युनिव्हर्सिटी आहे.. चायना मध्ये तीन हजारहून अधिक युनिव्हर्सिटी आहे.. त्यातील पंधराशे या सरकारी आहे. जगातील टॉप वर्ल्ड बेस्ट 100 युनिव्हर्सिटीच्या यादीमध्ये भारताची एक सुद्धा युनिव्हर्सिटी नाही. आय.टी.आय किंवा वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इंडिया मध्ये अकरा हजार तर चायना मध्ये 26 लाख आहेत. चायना एज्युकेशन वर 520 बिलियन डॉलर खर्च करते तर भारत 14 बिलीयन डॉलर खर्च करते. एकूण जीडीपीच्या फक्त तीन टक्के ही तरतूद आहे. त्यात ही दीड टक्का खाजगी गुंतवणूक आहे. जगातील सर्वात अवघड परीक्षा ही चायनाची आहे त्याला ते गोकागो म्हणतात. जी चायनीज भाषा, इंग्रजी भाषा, maths आणि इनोव्हेशन वर असते. *भारतामध्ये परीक्षा पद्धत नसून फिल्टरेशन पद्धत आहे ज्यात इनोव्हेशन ला कुठेही वाव नाही.*

तुम्हाला माहिती आहे का *सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पहिल्या टॉप टेन मध्ये आपला भारत नाही. कारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ तुमच्या देशाचे हवे.* जसे अमेरिकेचे 2639, ब्रिटनचे 546, चीनचे 482 तर भारताचे फक्त 10 शास्त्रज्ञ आहे. 


*मुद्दा हा आहे की आपण का शास्त्रज्ञ निर्माण करू शकत नाही?* आपण इनोवेशन मध्ये का मागे आहोत? मागील वर्षी नारायणमूर्ती म्हणाले होते असा कुठला शोध भारताने लावला ज्याने हे जग बदलले? या सर्वांमागे आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. त्यामुळे खरं चायनाला उत्तर द्यायचे असेल आणि भारताला महासत्ता करायचे असेल तर *शिक्षणाकडे सिरीयस होऊन बघावे लागेल...* बदल घडवावा लागेल.. खूप झाले लॉर्ड मेकॉले ला दोषी ठरवणे. आपल्या सर्व नॅशनल एज्युकेशन पोलिसी मध्ये.. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये.. शिक्षणामध्ये क्रिटिविटी कशी आणायची, इनोव्हेशन कसेआणायचे.. हे सर्व सांगितलेल आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला ही नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात या गोष्टी अतिशय सखोल पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. प्रश्न हा आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा...एक भारतीय म्हणून माझी जबाबदारी ओळखण्याचा.. शिक्षणामध्ये बदल घडवण्यासाठी मी पालक म्हणून माझे पालकत्व कसे सुधरवेल..  मी टीचर म्हणून माझी काय जबाबदारी आहे? 

माझी शिकवण्याच्या पद्धतीतून विद्यार्थ्यांचे कुतूहल कसे जागृत करेल. सरकार म्हणून शिक्षणातला भ्रष्टाचार कसा थांबेल.. लायसन राज पासून शिक्षण क्षेत्राला कशी मुक्ती मिळेल? शिक्षणाचा खर्च कसा वाढेल? मुख्य म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणा साठी आर्थिक भरगोज तरतुद  कशी करता येईल. अशा असंख्य गोष्टींवर जबाबदारी घ्यावी लागेल. 


या साठी खूप मोठ्या बदलाची गरज आहे. *काय बदल केले पाहिजे?*

1) घोका आणि ओका ही शिक्षण पद्धती बंद करावी.

2) मुलांच्या प्रतिभेवर भर द्या.

3) शाळेपासून इनोवेशन क्रिएटिविटी ला प्रोत्साहन द्या. त्यासाठी मुलांना चुका करू द्या.. चुका करण्याची संधी द्या.

4) शाळांमध्ये अनुभवातून शिक्षण आणा. मार्कांच्या रेस मधून बाहेर पडून स्किल बेस् एज्युकेशन द्या.

5) त्यासाठी टीचर्स ला ट्रेन करा. 

6) सर्वात महत्त्वाचे टीचर्स ला रिस्पेक्ट द्या. त्यांना आर्थिक स्थैर्य आणा. 


आज 60 टक्के भारतातील शिक्षक खाजगी शिक्षण संस्थेत नोकरी करत आहेत. कोरोनामुळे पालक फी भरत नाही त्यामुळे या क्षेत्रात टीचर म्हणून यायचे की नाही असा विचार नवी पिढी करत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. चांगल्या टीचेर्स ने शिक्षणक्षेत्र जर सोडले तर शिक्षणात जी काही थोडी गुणवत्ता राहिली आहेत तेसुद्धा जाईल. मग असे होईल की सगळीकडे अर्ज केले कुठेही नोकरी नाही मिळाली की टीचर जॉब चा अर्ज करतील आणि मग बीएड करतील.. हे असे का होईल कारण सन्मान नाही.. प्रतिष्ठा नाही.. चांगला पगार नाही.. *सरकारी शिक्षकांना पगार भरपूर आहे पण जबाबदारी नसल्याने गुणवत्ता हवी तशी नाही. सरकारी शाळेत गुणवत्ता जर असती तर आज भारतातील 60% पालक पैसे खर्च करून खाजगी शाळेत मुलांना शिकायला पाठवले नसते. त्यांनी सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना पाठवले असते पण तसे नाही. कारण खाजगी मध्ये शिक्षकांना पगार कमी आहे पण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली नाही तर खाजगी शिक्षकांना जाब विचारता येतो. त्यांची नोकरी जाऊ शकते. या एकमेव कारणाने खाजगी शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता टिकून आहे. करोना च्या काळामध्ये खाजगी संस्थेतील शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून तंत्रज्ञान आत्मसात केले. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रभावीपणे दिले. त्यामुळे आज कितीतरी खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस झाला नाही, जो सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात झाला. या बदल्यात आपण खाजगी संस्थेतील शिक्षकांना काय दिले तर वेळेवर फी पालकांनी भरली नाही आणि त्यामुळे त्यांचे पगार झाले नाही आणि सरकारी शिक्षकांचे सातवे वेतन कोरोना काळात ही चालू आहे.. कुठलेही ऑनलाइन शिक्षण न घेता. हे सर्व खाजगी शिक्षकांना वेदनादायक वाटतं. या प्रोफेशन मधून बाहेर पडून दुसरं काही नोकरी करायची का असा ते विचार करत आहेत. असे विचार येणे आणि वागणं हे खरंच भारतासाठी योग्य नाही. शिक्षकांना सन्मान आणि आर्थिक स्थैर्य अत्यंत आवश्यक आहे. जे प्रोफेशन जगातले सर्व प्रोफेशन घडवायला मदत करते त्या टीचींग प्रोफेशन ला मानसन्मान नाही.* आजकाल पालक टीचेर्स शी उद्धट  बोलतात.. हे सर्व ठरवून बदलावे लागेल. तुम्ही म्हणाल टीचर तसे नाही.. खरं आहे टी.ई.टी एक्झाम पाच ते सहा टक्के टीचर्स पास करतात. पाचवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या वर्गाचे गणित येत नाही या बाबत असे बरेच रिपोर्ट आहेत. पण टीचेर्स ला पण समजून घ्यावे लागेल.. त्यानां तसे प्रशिक्षित करावे लागेल. सरकारी शिक्षकांना नॉन अकॅडमिक कामांपासून मुक्त करावे लागेल. सर्वात महत्त्वाचा टीचेर्स चा रोल बदलावा लागेल. *पारंपरिक शिक्षणाच्या पद्धतीतून त्यांना बाहेर काढून एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आणण्यासाठी चे शिक्षण देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे लागेल.* विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सोलविंग स्किल आणायचे आहेत त्यासाठी संपूर्ण सिस्टिम ने टीचरला ट्रेन करायचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम स्लोविंग स्किल कसे आणता येईल त्यासाठी अध्यापनशास्त्र बदलावे लागेल. *नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे अध्यापन शास्त्रामध्ये बदल पुढील दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.*


शेवटचा बदल म्हणजे सरकारी शाळेची गुणवत्ता वाढवावी लागेल. आज 60% सरकारी शाळेत 40 टक्के विद्यार्थी शिकतात आणि 40% खाजगी शाळेत भारतातील 60 टक्के विद्यार्थी शिकत आहेत.

त्यामुळे सरकारी शाळेची गुणवत्ता वाढवावी लागेल. *जिल्हा परिषद शाळेमध्ये काही चांगले प्रयोग होत आहेत त्या प्रयोगांचं सार्वत्रिकीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.* त्याच बरोबर खाजगी शाळेला स्वायत्तता द्यावी लागेल. ते परमिट राजच्या खाली दबलेल्या आहेत. एकूणच प्राथमिक शिक्षणावर भर द्यावा लागेल. पाया महत्त्वाचा आहे कळस नाही. आपण जास्त खर्च कळसावर करतो आणि पाया तसाच ठेवतो म्हणूनच आपण इनोवेशन मध्ये मागे आहोत. त्यामुळे चायना चा प्रोडक्टवर बंदी घालण्याआधी आपली शिक्षण पद्धती सुधारावी लागेल. जेणेकरून आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ. चायना च्या प्रोडक्ट ची गरजच भासणार नाही असा भारत घडवू.


सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



Tuesday, 22 June 2021

ऑनलाइन शिक्षणात उद्याचा भारत आज घडतोय..

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा रत्नागिरी रोटरी क्लब आणि लर्निंग पॉईंट यांच्या संयुक्तपणे केलेल्या ऑनलाइन सर्वे च्या आधारावर लेख..


जेव्हा समस्या येतात तेव्हा समस्येला संधी समजायची का अडचण हे दोन पर्याय उपलब्ध असतात. नुकताच रत्नागिरी जिल्ह्या रोटरी क्लब आणि लर्निंग पॉईंट संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने एक सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हे च्या आधारावर असे नक्की म्हणता येईल की चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षकांनी उद्याचा भारत आज घडवायला सुरुवात केली आहे.

कोरोना मुळे शाळा बंद झाल्या पण शिक्षण नाही. ऑनलाइन शिक्षण ला दोष देणारे आणि ऑनलाइन शिक्षणाला आत्मसात करणारे असे दोन वर्ग आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा जरी असल्या तरी कोरोना काळातील शिक्षणाचा हा उत्तम पर्याय आहे. साधारण तिसरी च्या पुढे, खासकरून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हे "अभ्यासक्रमातील माहिती पुरवण्याचे" उत्तम माध्यम आहे. शिक्षण म्हणजे विविध अनुभव आणि माहीती यांची सांगड असते. फक्त माहितीचा साठा म्हणजे शिक्षण नव्हे. पण ऑनलाइन शिक्षणातून आपण माहिती उत्तम पद्धतीने पोचवू शकतो हे त्याचे बलस्थान. अनुभव आणि भावनिक बुद्धिमत्ता ऑनलाइन शिक्षणातून तेवढी प्रभावी विकसित करू शकत नाही ही याची मर्यादा. या सर्व्हेनुसार 75.2% विद्यार्थी पुढील वर्गात बसण्यासाठी शिक्षणाच्या दृष्टीने तयार झाले. याचाच अर्थ अभ्यासक्रमामधील माहिती योग्य पोहोचली पण सर्व्हेनुसार 51.9% विद्यार्थी भावनिक व मानसिक दृष्ट्या पुढील वर्गात जाण्यास काही प्रमाणात तयार आहे. "काही प्रमाणात" याचाच अर्थ भावनिक बुद्धिमत्तेचा हवा तेवढा विकास झाला नाही. याचे मुख्य कारण कोरोना ची भीती, घरांमध्येच बसून रहाणे, खेळ कमी, मित्र मैत्रिणीचा प्रत्यक्ष भेटी नाही. खरंतर प्रेम, काळजी, प्रेमाचा स्पर्श या भावना शिक्षक ऑनलाइन मधून पोहोचू शकत नाही आणि विद्यार्थी डाऊनलोड करू शकत नाही.

पण काही प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेची कमतरता पालकांनी भरून काढली. कोरोना पूर्वीचे भारतीय पालकत्व आणि कोरोना नंतरच पालकत्व यामध्ये पालकांमध्ये विधायक बदल दिसून येतो. 77.7% पालकांनी नियमितपणे किंवा जमेल तसा मुलांचा अभ्यास घेतला. 70 ते 75 टक्के पालकांनी मुलांचे वाचन-लेखन कौशल्यावर भर दिला. 49%  पालकांनी घरातील कामे आणि प्रकल्प माध्यमातून अनुभवाधरीत शिक्षण दिले. कृतिशील पालकत्वाचा प्रयत्न केला.

50% पालक मुलांसोबत नेहमी ऑनलाईन स्कूल अटेंड करायचे. आता याचा त्रास शिक्षकांना सुरुवातीला झाला पण हळूहळू शिक्षकांना न दिसणारी आईची सवय झाली. खरं तर जे शिक्षक ऑनलाइन शिक्षण देत आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. टेक्नोसॅव्ही शिक्षक होण्यासाठी झूम, गुगल मीट याचे प्लॅटफॉर्म समजून घेणे, शिकवता शिकवता Mute Unmute, पीपीटी प्रेझेन्टेशन करता येणे, व्हिडिओ समोर स्पष्ट दिसण्यासाठी खिडकी समोरचा लाईट चेहऱ्यावर घेणे, तिथे नेटवर्क आणण्यासाठी प्रयत्न करणे, घरात सासू-सासरे पती मुलं यांच्या समोर न लाजता कॅमेरासमोर शिकवणे.. हे सर्व करायला व स्वतःमध्ये बदल करायला हिम्मत लागते. जी बऱ्याच शिक्षकांनी दाखवली म्हणून तर मी म्हटलं उद्याचा भारत आज घडतोय.

पुढील दहा वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता.. हायब्रीड एज्युकेशन सिस्टीम, मशीन लर्निंग या संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करीअर घडवा तुम्हाला टेक्नोसॅवी असणे ही काळाची आवश्यकता असणार आहे. त्याचा पाया ऑनलाइन शिक्षण आहे. जर कोरोना नसता तर या नव्या पद्धतीने शिकणे शिकवण्याचा प्रकार भारतीय शिक्षणात रुजायला खूप वेळ लागला असता. गरज ही शोधाची जननी आहे. ही पद्धत कोरोना नंतरच्या काळात नेहमीच्या पद्धतीला सपोर्ट होईल पण ती मुख्य पद्धत होऊ शकत नाही पण ही शिक्षणाची तंत्रस्नेही पद्धत सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक होती.
या सर्व्हेनुसार 62% विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये सहजपणे स्वतःला सामावून घेतले. हे खरे आहे जे व्हिडीओ कॉलिंग आपण वा-याच्या पन्नाशीला पडत धडपडत शिकतो ते हे सात ते आठ वर्षाची मुलं अतिशय सहज स्वतःहून शिकतात व आपल्यालाही शिकवतात.

आता या ऑनलाईन क्लास ला शालेय विद्यार्थी पूर्णवेळ बसायचे का? तर नाही.. कारण मुलं घरात असायचे. शाळेसारखी शिस्त घरात नसते. तरी 59.5% विद्यार्थी प्रामाणिकपणे स्क्रीन समोर शिक्षक जे सांगतील तसे वागायचे. 30.2% मुलं कधी कधी स्क्रीन समोर असायचे. तर 8.3% विद्यार्थी स्क्रीन समोर आलेच नाही. आता इथे एक भीती नेहमी असते की जे विद्यार्थी कधीकधी स्क्रीन समोर यायचे ते पालकांचे लक्ष नसताना मोबाईल गेम खेळायचे..ज्या गोष्टी बघायच्या नाही त्या गोष्टी च्या वेबसाईटवर जायचे.. असे प्रकार वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाले असण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून प्रत्यक्ष स्कूल सुरू झाल्यानंतर शाळा शाळांमध्ये शिक्षकांच्या आणि समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे काउन्सेलिंग होणे ही काळाची गरज असेल. तसेच स्क्रीन टाईम सोबत युट्यूब व्हिडिओ, मोबाईल गेम, टीव्ही यांचा स्क्रीन टाईम जोडला तर तो वेळ खूप होतो. काही विद्यार्थ्यांचा तो सात ते आठ तासाचा गेला. हे अतिरिक्त स्क्रीन टाईम मुळे अतिचंचलता (ADHD) सारखे समस्या उद्भवू शकतात. सर्व्हेनुसार 50% मुलांना एका ठिकाणी फार वेळ न बसण्याची सवय लागली आहे. आता यातील सर्व जणांना ADHD झाला असे मुळीच नाही पण यातील 15 ते 20 टक्के प्रमाण नक्कीच असू शकेल. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना किमान तीन महिने ग्राउंड वर भरपूर खेळू देणे हा महत्वाचा उपाय यावर आहे. अकॅडमिक विषयाचे तास कमी करून ग्राऊंडवरील तास वाढवणे गरजेचे असेल.

अतिरिक्त स्क्रीन टाईम च्या समस्या जरी असल्या तरी एकंदरीत ऑनलाइन शिक्षण यशस्वी होण्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यशस्वी झाले आहेत म्हणूनच मी म्हटले की उद्याचा भारत आज घडतोय. या घडण्यामध्ये ते शिक्षक अग्रेसर होते ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला. टेक्नोसॅवी स्किल शिकणे हे व्यक्तिपरत्वे जरी असले तरी आजूबाजूचे वातावरण, प्रोत्साहन, संस्थाचालकांचा..मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे. लर्निंग पॉईंट संस्थेचे सचिन सारोळकर यांनी जो हा सर्व्हे घेतला यामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना जास्त सामावून घेतले. खाजगी सरकारी शाळा, मराठी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी या सर्व्हे मध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

शिक्षणाची नवी व्याख्या भारत लिहायला घेत आहे. हे तंत्रज्ञान जेवढे गरिबांन पर्यंत पोहोचेल तेवढे इंडिया आणि भारत यामधील दरी दूर होईल. नाहीतर श्रीमंतांची मुलं IIT मध्ये आणि गरिबांची मुलं ITI मध्ये हे चित्र दिसत राहील. हे चित्र बदलण्यासाठी तंत्रज्ञान तथा ऑनलाइन शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचणे ही सरकार, शाळा, संस्था आणि समाज म्हणून "आपण" सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनामुळे याची सुरुवात झाली हेच खरे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



Tuesday, 12 January 2021

शाळा प्रवेशाच्या वयाचा घोळ

संपूर्ण महाराष्ट्रात सकाळ वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेला शिक्षण अभ्यास सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.

मुलांना किती वयाचे झाले की शाळेत प्रवेश दिला पाहिजे याबाबत शिक्षण विभागाचे कधीही एकमत झालेले दिसत नाही. काही वर्षापूर्वी अडीच वर्षाच्या मुलांना नर्सरीमध्ये किंवा छोट्या गटात प्रवेश दिला जायचा. याचा अर्थ इयत्ता पहिली चे प्रवेश वय हे पाच वर्ष सहा महिने होते.

मग बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आला त्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश वय वर्ष सहा पूर्ण झाले पाहिजे असे नमूद केले. याचा परिणाम असा झाला की नर्सरीमध्ये प्रवेश घ्यायचे वय तीन वर्षाचे झाले. मग जे ज्युनिअर के.जी किंवा सिनियर के.जी किंवा मोठा गट मधील विद्यार्थी होते त्यांच्यासाठी या नियमातुन सूट मिळावी म्हणून शिक्षण विभागाने एक शासन निर्णय काढला की या वर्षाच्या बॅचला हा वयाचा नियम लागू होणार नाही आणि त्यांचा प्रवेश मानवी दिनांक 31 डिसेंबर असाच धरावा. 

मग गेल्या दोन वर्षापासून नर्सरीसाठी तीन वर्षाचे प्रवेश वय असले पाहिजे हा नियम काटेकोर पाळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे परिपत्रक/ शासन निर्णय 25 जून 2017 साली आले. यामध्ये 30 सप्टेंबर हे मानवी दिनांक प्रवेशासाठी गृहीत धरावा असे सांगितले. याचा अर्थ इयत्ता पहिली ला सहा वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. हा शासन निर्णय योग्य होता.

आता पुन्हा 25 नोव्हेंबर 2020 ला शासन निर्णय आला ज्यामध्ये म्हटले आहे ये कि इयत्ता पहिली ला सहा वर्ष पूर्ण हवे पण नर्सरी ला प्रवेश किंवा छोट्या गटात प्रवेश ला मानवी दिनांक 31 डिसेंबर ची तारीख धरावी असे नमूद केले. याचाच अर्थ नर्सरीला प्रवेश वय वर्ष अडीच पूर्ण झालेले घेतील आणि हे नर्सरी चे विद्यार्थी तीन वर्षांनी पूर्वप्राथमिक पूर्ण करतील आणि इयत्ता पहिला प्रवेश घेतील तेव्हा त्यांचे वय साडे पाच वर्षाचे असतील म्हणजे सहा वर्ष पूर्ण नसेल. शिक्षण कायदा म्हणतो सहा वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी हे इयत्ता पहिली ला प्रवेश घेतील म्हणजे सरळ सरळ या नवीन शासन निर्णयामुळे कायदाच बदलला जातो. कुठलेही शासन निर्णय हा कायद्याचे मुख्य कलम बदलू शकत नाही. पण इथे होत आहे. याला युक्तिवाद त्याचा असा आहे की इयत्ता पहिलीच्या पूर्ण शैक्षणिक वर्षात त्या विद्यार्थ्यांचे सहा वर्ष पूर्ण हवे. पण शिक्षण हक्क कायद्याला असा अर्थ काढणे मान्य नाही. त्यामध्ये वय हे सहा वर्ष प्रवेशाच्या वेळेस पूर्ण हवे असे सांगितले आहे . 

या नवीन शासन निर्णत असेही सांगितले की ज्या शाळांना प्रवेश मानवी दिनांक 30 सप्टेंबर धरायचा असेल त्यांनी धरावा आणि ज्यांना 31 डिसेंबर धरायचा असेल त्यांनी तो धरावा. पालकांच्या इच्छेनुसार प्रवेश द्यावा. आता प्रश्न हा आहे की एवढा लवकर शाळेत टाकायला पालकांचा अट्टाहास का?

आज सर्व शिक्षणतज्ञ, सर्व बाल मानसोपचारतज्ञ सांगतात की प्राथमिक शिक्षणाचे वय हे सहा किंवा सात हवे. सर्व विकसित देशात जिथे शिक्षणाबाबत गांभीर्याने पाहिले जाते आणि ज्यांची शिक्षण व्यवस्था ही जगातील उत्तम व्यवस्था म्हणून नावाजली गेलेली आहे असे फिनलंड देशात सगळीकडे इयत्ता पहिली चे वय हे सात वर्षाचे आहे. मग भारतातील पालकांना किंवा सरकारला साडेपाच वर्षाचा मुलांना इयत्ता पहिलीत टाकण्याचा अट्टहास का?

जेव्हा अडिच वर्षाच्या मुलांना पूर्व प्राथमिक मध्ये प्रवेश देतात याचा अर्थ साडे पाच वर्षाच्या विद्यार्थी इयत्ता पहिली मध्ये येतो तेव्हा त्याचे चे फाइन मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल्स हे हवे तेवढे विकसित झाले नसते. विद्यार्थ्यांच्या लिखाण समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असतात. त्यातल्या त्यात बर्‍याच पूर्व प्राथमिक शाळेतील टीचर खास करून इंग्रजी माध्यमातील टीचरला ABCD शिकवायची एवढी घाई झाली असते की बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा अभ्यासाचा अभाव असल्याने ते अडीच वर्षाच्या मुलांना एबीसीडी लिहायला देतात. याने त्यांच्या बोटांचे स्नायूंचे कायमस्वरूपी नुकसान होते आणि याचा परिणाम मुलं पुढे लिहिण्याचा प्रचंड कंटाळा करतात. शास्त्राने सिद्ध केले आहे की की पाच वर्षापर्यंत मुलांना लिखाण काम देऊ नये पण तरी बहुसंख्य शाळा डायरेक्ट लिहायला देतात. त्यात सहा महिने शाळेत लवकर प्रवेश दिला गेला तर अजून त्यांचा लिखाण कौशल्याचे नुकसान होते.

प्रश्न हा आहे की शिक्षण विभाग किंवा पालक किंवा खाजगी बोर्ड च्या शाळा हे शिक्षण हक्क कायदा चे नियम पाळत का नाही? त्याचे कारण भारतात विविध बोर्ड आहे. स्टेट बोर्ड म्हणजे एसएससी आणि केंद्रीय बोर्ड सी बी एस सी तसेच आय.सी.एस.सी हे इयत्ता पहिली ला सहा वर्ष झालेल्या बालकांना प्रवेश द्यावे असे म्हणतात. (खरंतर ते तसे म्हणत नाही, या बोर्डाच्या शाळा आर टी चे नियम पालन करतात) पण केंब्रिज बोर्ड आणि आय.बी बोर्ड च्या शाळा साडे पाच वर्षाच्या बालकाला इयत्ता पहिली ला प्रवेश द्यायला तयार होतात. यामुळे एकाच शहरातील काही इंग्रजी शाळा साडे पाच वर्षाच्या मुलांना प्रवेश तर काही इंग्रजी शाळा 6 वर्षाला प्रवेश देतात. त्यामुळे पालकांचा गोंधळ होतो म्हणून काही खाजगी बोर्डचा दबावामुळे राज्य सरकारने अशास्त्रीय शाळा प्रवेशाचा निर्णय घेतला का असा प्रश्न मनात येतो. 

महाराष्ट्रात खाजगी बोर्ड संलग्न असलेल्या शाळा मुंबईमध्ये जास्त आहे. केंब्रिज बोर्ड आणि आय.बी बोर्डच्या शाळांना अडीच वर्षाचे विद्यार्थ्यांना नर्सरी ला प्रवेश द्यायची ची सवय झाली आहे. म्हणून 25 नोव्हेंबर 2020 चा शासन निर्णय जो आहे तो मुंबई शिक्षणाधिकारी यांचे नावे काढला. या सर्वांमुळे पालक आणि शाळा यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण झाले. व्हाट्सएपच्या जमानात असे असे शासन निर्णय मुख्याध्यापकांच्या हाती येण्याआधी पालकांच्या हातात येतात. मग पालक प्रवेशाच्या वेळेस वाद घालतात की अमुक अमुक शाळेच्या प्रवेशासाठी साडे पाच वर्षाचा विद्यार्थी घेतला जातो मग तुम्ही का घेत नाही? 

फक्त खाजगी आंतरराष्ट्रीय बोर्डच्या हट्टासाठी मराठी माध्यम पासून केंद्रीय विद्यालयाच्या सर्व शाळांना इयत्ता पहिलीची ला प्रवेश साडेपाच वर्षाला द्यावा लागतो आहे, जो की हा निर्णय पूर्ण अशास्त्रीय आहे.

शिक्षणतज्ञ रमेश पानसे म्हणतात, आजकाल स्पर्धेच्या युगात पालकांना असा (गै)समज झाला आहे की जेवढ्या लवकर मुलांना शाळेत टाकू तेवढ्या लवकर ते पुढे जातील. पुढे जाण्यासाठी लवकर शिकले पाहिजे. लवकर शिकण्यासाठी लवकर शाळेत प्रवेश घेतला पाहिजे असे त्यांना वाटते. असा गैरसमज मध्यम आणि उच्चभ्रू पालकांमध्ये जास्त आढळतो. 

एका उच्चभ्रू आयएएस ऑफिसर पालकांला वाटले की स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त संधी मिळाव्यात म्हणून लवकर शाळेत टाका म्हणजे त्याला परीक्षेच्या संधी जास्त उपलब्ध होतील. बिहारसारख्या राज्यात शिक्षण हक्क कायदा खुंटीला लावला आहे. तिथे पाच वर्षापासून इयत्ता पहिली मध्ये प्रवेश दिला जातो. म्हणून पुढे भविष्यात त्याला युपीएससी स्पर्धा परीक्षा ला जास्त संधी मिळतात. आता अशा युक्तिवादाला काय उत्तर देणार? हे सर्व बालमानसशास्त्र च्या विरोधात आहे एवढेच सत्य.

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे म्हणतात, "बाल्यावस्था ही माणसाच्या आयुष्यातील अगदी छोटासा पण खूप मोठा विकासाचा काळ असतो. येथील सहा महिने म्हणजे प्रौढ आयुष्यातील सहा वर्षांपेक्षा मोठा काळ असतो. या काळातील क्षमतांच्या विकासासाठी हा काळ पुरेसा प्राप्त झाला नाही तर त्याचे अनिष्ट परिणाम आयुष्यभर सोसावे लागतात." याचाच अर्थ लवकर शाळेत टाकले तर मूल लवकर शिकतील असे नाही तर उलट शिक्षणात मागे पडतील. लेखन-वाचन कौशल्यांमध्ये त्यांना समस्या येऊ शकतात. यासंदर्भात बरेच संशोधन उपलब्ध आहे.

हे वय बाल मेंदू जडणघडण यांचे वय असते. या वयात विविध अनुभवातून त्यांच्या स्नायू विकास होणे अपेक्षित आहे. हातांच्या स्नायूंची वाढ न होता, त्यांचे कौशल्य विकसित न होता लवकर प्राथमिक शिक्षणाचे आव्हान टाकणे म्हणजे आठवीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा पेपर सोडवायला देण्यासारखे आहे. आता यात काही विद्यार्थी हे आव्हाने पेलतात सुद्धा पण असंख्य विद्यार्थी हे पेलू शकत नाही. मग त्या विद्यार्थ्यांना आपण अप्रगत नावाचा शिक्का मारतो पण मुख्य घोळ कुठे झाला याचा आपण कधी विचार करत नाही. 

या लेखाद्वारे मी शिक्षण विभागाला कळकळीची विनंती करतो की त्यांनी या शासन निर्णयावर पुन्हा विचार करावा आणि प्रवेशासाठी 31 डिसेंबर मानवी दिनांक रद्द करून 30 मे करावा. 30 मे केला की एक जूनला शाळेत प्रवेश च्या वेळेस तीन वर्ष किंवा सहा वर्ष पूर्ण होतील. जर 30 मे शक्य नसेल तर किमान पूर्वीसारखा 30 सप्टेंबर हा मानवी दिनांक करावा कारण प्रश्न भारताच्या भावी पिढीच्या मेंदू विकासाचा आहे. त्यांचा पाया भक्कम करण्याचा आहे.

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



Sunday, 15 November 2020

नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते!!!

 वाचकहो,

काही चुकल्यासारखे वाटते? इतके वर्ष पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून माहीत आहे. मग अचानक नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते का? हे मी विचारतोय.. तर नक्कीच होऊ शकते.
कोविड १९ मुळे शिक्षण संस्थांचे स्वरूप बदलले आहे. शिक्षण हे एका इमारतीमध्ये जाऊनच घ्यावे लागते असे नसून ऑनलाईन ने सुद्धा घेता येते. हे खरे आहे की विद्यार्थ्याचे पूर्ण समाधान ऑनलाइन शिक्षण मधून होऊ शकत नाही पण अजून ऑनलाईन शिक्षण व्यवस्था ही बाल्यावस्थेत आहे. येत्या पाच वर्षांत त्याची वाढ चांगली होईल पण त्यासाठी नाशिक शहर खऱ्याअर्थाने स्मार्ट होणे गरजेचे आहे. हाय स्पीड इंटरनेट आणि विविध तज्ञ व्यक्ती, विविध संशोधन करणाऱ्या संस्था, कॉलेज यांच्या मदतीने ऑनलाईन शिक्षणाचे विविध कोर्सेस सुरू झाले तर नाशिक हे एज्युकेशन हब होऊ शकते.

शिक्षण क्षेत्रामध्ये मी विविध प्रयोग करत असतो, त्या संदर्भात वाचन संशोधनही चालू असते. . हे करत असताना एक लक्षात आले की शहराचा विकास त्याची प्रगती त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या मानव निर्देशांकाची वाढ वर अवलंबून असते आणि मानव निर्देशांकाची वाढ ही त्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणात असते. विद्यार्थ्यांनी म्हणजेच नागरिकांना कसे शिक्षण मिळाले कुठले शिक्षण घेतले त्याच्यावर अवलंबून असते. ऑनलाइनच्या माध्यमातून जगातील उत्तम कोर्सेस नाशिक मध्ये आणून नाशिकच्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात.

या सर्वांचा विचार करता नाशिक भविष्यात हे एज्युकेशनल हब होऊ शकते का? याचा विचार व्हायला पाहिजे

नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकता का हे समजून घेण्या आधी संपूर्ण भारतात शिक्षण क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक होत आहे आणि शिक्षण क्षेत्रात काय आमूलाग्र बदल होत आहेत हे समजून घेतले पाहिजे.

प्राइस वॉटर हाऊस या संस्थेचा सर्वे नुसार भारतात सर्वात जास्त गुंतवणूक जर कुठल्या क्षेत्रामध्ये होणार असेल तर ती म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये. कारण भारत हा तरुणांचा देश आहे.. जवळजवळ 70 टक्केहून अधिक नागरिक हे 30 वर्षाच्या आतील आहे. सर्वेनुसार उच्च शिक्षणाला जाण्याचा प्रमाण भारतात साधारण 13 टक्के आहे जे 2025 पर्यंत तीस टक्क्यापर्यंत जाणार आहे.

भारतात अजून 800 युनिव्हर्सिटी ची गरज आहे. सध्या भारतात 372 युनिव्हर्सिटी आहे. जर आपण चायना चा विचार केला तर एकट्याचा यामध्ये 900 युनिव्हर्सिटी आहे. तर जपानमध्ये 9000 युनिव्हर्सिटी आहे.

सरकारी आकडा सांगतो भारताला अजून 35 हजार कॉलेजची गरज आहे. पन्नास हजार शाळा ची गरज आहे. म्हणूनच सरकार प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ला मान्यता देते तर प्रायव्हेट स्कूल कॉलेज यांच्यासाठी स्वतंत्र कायदे बनवलेले आहेत. कारण अजूनही भारतात शिक्षणावर जीडीपीच्या 3% एवढा खर्च होतो. या तीन टाक्यांमध्ये सरकारी गुंतवणूक आणि खासगी गुंतवणूक दोन्ही आले.

आता प्रश्न हा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणामध्ये गुंतवणूक हवी आहे आणि त्यासाठी नाशिक शहर हे सज्ज होऊ शकते का? या संधीचा फायदा नाशिक शहरासाठी उघडता येऊ शकतो का? तर मला वाटतं नाशिक हे एज्युकेशनल हब होण्यासाठी अत्यंत उत्तम शहर आहे.

सध्या नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स चे 85 कॉलेजेस आहेत. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 34, B.ed कॉलेजेस 28, इंजिनिअरिंग आर्किटेक्चर कॉलेजेस 15, B.farm 13 तर लॉ कॉलेजेस 4, रिसर्च सेंटर 21, एग्रीकल्चर कॉलेज 1 आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 17 आयटीआय आणि दोन सरकारी विद्यापीठ आणि एक खासगी विद्यापीठ आहे.

सध्या मुंबई पुणे येथे जमिनीच्या किमती खूप जास्त आहे आणि नाशिकला आजूबाजूला भरपूर जागा उपलब्ध आहेत. समजा जास्तीत जास्त जागा या एज्युकेशन झोन बनवल्या तर बाहेरील विविध शहरातील विद्यार्थी नाशिकमध्ये शिक्षण घ्यायला येऊ शकतील. त्यासाठी नाशिक शहरांमध्ये नवीन दर्जेदार अधिक शिक्षण संस्था उभ्या केल्या पाहिजे. नुकतेच अक्षय कुमार या अभिनेत्याने त्याच्या टायकोंडो इन्स्टिट्यूट साठी नाशिक मध्ये जागा बघितली असे सोशल माध्यमातून समजले.

नाशिक मधील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम, कोर्सेस नाशिक शहरातच उपलब्ध करून देता यायला पाहिजे. त्यासाठी त्याला बाहेर शिकायला जायला गरज पडता कामा नये. त्यासाठी उपलब्ध शिक्षण संस्थांनी त्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा. त्यासाठी त्यांच्याकडे चांगली संधी चालून आलेली आहे ती म्हणजे कोरोनामुळे जी गोष्ट दहा वर्षात होणार होती ती सहा महिन्यात झाली आणि ती म्हणजे ऑनलाइन शिक्षण घेण्याची मानसिकता. ही निर्माण झाली आता पुढचं पाऊल असलं पाहिजे ते म्हणजे विविध ऑनलाइन कोर्सेस नाशिक शहरातून निर्माण व्हायला पाहिजे. पुढील शिक्षणाच्या प्रवास हा हायब्रीड एज्युकेशन या मार्गावर असणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात जितके ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध होतील त्याचा बेस बाकीच्या शहरातील विद्यार्थी किंबहुना आंतरराष्ट्रीय विद्यार्थीना नाशिक मध्ये आणण्यासाठी होईल.

सध्या पुणेचा शैक्षणिक वातावरण खराब होत चाललेले आहे. पालक मुलांना पुण्याला शिकवण्याला पाठवायला खूप मनापासून तयार नसतात. नाशिकमध्ये अजूनही पब संस्कृती नाही आहे. एक छोटं आणि धार्मिक शहर असल्याने दुसऱ्या शहरातील पालकांचा नाशिक कडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला असतो.

नाशिकला यंत्रांची भूमी बोलले जाते, इंडस्ट्री चांगले आहेत त्यामुळे फिनिशिंग स्कूल, कम्युनिटी कॉलेज यांची वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिकमध्ये पुणे युनिव्हर्सिटी चे स्पेशल कॅम्पस म्हणून नाशिकची निवड केली. त्याचं काम जर लवकर पूर्ण झालं तर अधिक कॉलेजेस याची निर्मिती होऊ शकते.

नाशिकच्या शिक्षणात बदल हवा आहे का? तर हो पण तो दिशादर्शक बदल हवाय, नुकताच बदल नको आहे. कॉलेज हवेत का? तर हो.. स्कूल हवेत का? तर हो.. पण नुकतेच बिल्डींग नको आहे, एज्युकेशन बरोबर दर्जेदारपणा आणि वेगळेपणा हवा आहे. तोच तोच अभ्यासक्रम आता मुलांना द्यायचा नसून तर अभ्यासक्रमांमध्ये विविधता आणणे आवश्यक आहे.
जर नाशिकच्या शिक्षण आणि औद्योगिक संस्थेने एकविसाव्या शतकात लागणाऱ्या कौशल ला चे ट्रेनिंग जर दिले तर नाशिक इंडस्ट्रीचा विकास अधिक जलद गतीने होईल.

हल्ली एमबीए झालेले विद्यार्थी, इंजिनिअर झालेले विद्यार्थी खूप मिळतात पण इंटरनॅशनल स्टॅंडर्ड चे प्लंबर, कारपेंटर मिळत नाही. म्हणून आपल्याला कमुनिटी कॉलेजेस, फिनिशिंग स्कूल हे नाशिक मध्ये जास्तीत जास्त आणले पाहिजे.
नाशिकच्या वैद्यकीय विद्यापीठांमध्ये कॉलेज सुरू होत आहे एक आनंदाची बाब आहे पण त्याहून महत्त्वाचं यामध्ये फिजियोथेरेपी कॉलेज सुद्धा आहे जी सध्या काळाची गरज आहे.

नाशिक मध्ये आयटीआय फारच कमी आहे. जर भारतातील सर्व आयटीआय चा विचार केला तर 11000 वोकेशनल ट्रेनिंग संस्था आहेत. हेच जर आपण चायना बरोबर जर तुलना केली तर एकट्या चायना मध्ये पाच लाख वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. नाशिकमध्ये वोकेशनल कॉसेस वाढवले पाहिजे. इंडस्ट्री 4.0 म्हणजेच चौथी औद्योगिक क्रांती आता येत आहे. त्याला लागणारे महत्त्वाचे नऊ क्षेत्रांमधील वोकेशनाल कोर्सेस येण गरजेचे आहे.

नाशिकला एक कृषी विद्यापीठ यायला हवे. भरपूर फिनिशिंग स्कूल यायला पाहिजे, प्रयोगशील शाळांची संख्या वाढली पाहिजे, अनुदानित शाळांनी त्यांचा दर्जा सुधारायला हवा, सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद च्या शाळेने शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. इंटरनॅशनल स्कूल, रेसिडेन्सी स्कूल ची संख्या वाढली पाहिजे.

सर्व भारतातून, परदेशातून विद्यार्थी नाशिकमध्ये शिकायला येण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हायला पाहिजे.. कारण पाचगणीला सध्या जागा उपलब्ध नाही आहेत आणि शिक्षणाचा दर्जा आता फार ढासळलेला आहे.

खाजगी शाळांची संख्या वाढली पाहिजे फक्त त्याचं खूप कमर्शियलायझेशन होता कामा नये.

नवीन कलाकार घडवणाऱ्या इन्स्टिट्यूट सुद्धा नाशिकला हव्या आहेत. एन एस डी, एफ टी आय सारख्या अॅक्टींग स्कूल नाशिक मध्ये आपण आणू शकतो कारण दादासाहेब फाळके नावाचे मोठा ब्रँडिंग आपल्याला कडे आहे . सध्याचे खासदार फिल्म इन्स्टिट्यूट साठी शंभर एकर जागेचा प्रस्तावचा पाठपुरावा ते करत आहे. उद्योजक घडवणाऱ्या संस्था गुजरात मध्ये खूप आहेत, त्या धर्तीवर नाशिक मधल्या तशा संस्था काढायला हव्यात. वायनरी कॉलेजेसची सुद्धा कोर्सेस आपल्या कडे मोठ्या प्रमाणात काढता येऊ शकतात.

नाशिकचा हवा पाणी छान आहे, आजूबाजूला निसर्ग चांगला आहे मुंबई पुणे आणि नाशिक असा गोल्डन ट्रँगल सुद्धा चांगला आहे आणि आता विमान सेवा सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिक येथे पुढच्या दहा ते वीस वर्षांमध्ये भारतातलं उत्तम एज्युकेशनल हब होऊ शकते असं मला वाटतं.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
संचालक इस्पॅलियर स्कूल. 


Thursday, 8 October 2020

नवीन शैक्षणिक धोरण नुसार 360 डिग्री प्रोग्रेस कार्ड म्हणजे काय?

 #विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ठरवेल कुत्रीम बुद्धिमत्ता


नवीन शैक्षणिक धोरण मध्ये शिक्षक व्यवस्थेबद्दल बरेच चांगले बदल आले आहे. त्यामधील महत्त्वाचा बदल म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक. अजूनही प्रगतीपुस्तक म्हटले की बर्‍याच जणांच्या छातीची धडधड वाढते. मग स्वतःला जाणीव करून द्यावी लागते की आपण दहावी-बारावी, ग्रॅजुएट होऊन पंधरा वीस वर्ष झाले आणि त्या स्वप्नातून आपण जागे होतो. तरीही प्रगतीपुस्तक या शब्दाने धडधड वाढते.. ती वाढते...

आता आपले मूल जेव्हा शाळेतून प्रोग्रेस कार्ड आणतात तेव्हा त्याचा पॅटर्न बदललेला दिसतो. तो पॅटर्न असतो सातत्यपूर्ण सर्वेकष मूल्यमापन, म्हणजेच कंटीन्यूअस अँड कम्प्रेहेंसिव इव्हॅल्युएशन (CCE).

आपल्या काळात फक्त विषयात पास का नापास एवढेच प्रगतीपुस्तकावर असायचे. 35 पेक्षा कमी मार्क म्हणजे नापास. एकदा का विद्यार्थ्याला नापास शिक्का लागला की त्याचे वर्षे वाया जायचे असे नाही तर तो ती आयुष्यात काही चांगले करू शकेल अशी अशाच ही व्यवस्था मारून टाकायचे. अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. ढ चा शिक्का त्याच्या माथी लागायचा. "घोका आणि ओका" अशी आपली परीक्षा पद्धत होती. जो पाठांतरा मध्ये चांगला त्याला चांगले मार्क. म्हणजे स्मृती आधारित शिक्षण पद्धती होती.

सध्या विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्याची जी पद्धत चालू आहे तिला म्हणतात सातत्यपूर्ण सर्वेकष मूल्यमापन. ज्याला सी.सी.ई म्हणतात. आता यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचे अभ्यासातील मार्क बघितले जात नाही तर त्याचे शाळेमधील वर्तणूक सुद्धा बघितली जाते. मुख्य म्हणजे फक्त वार्षिक परीक्षेवर त्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करता सातत्याने वर्षभर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करायचे असते. यामध्ये फॉर्मटिव्ह असेसमेंट आणि समेटीव्ह असेसमेंट म्हणतात. आता समेटीव्ह मध्ये जे काही अभ्यासक्रम शिकवला जातो तो त्याला / तिला किती येतो याची लिहून परीक्षा घ्यायची असते तर फॉर्मटिव्ह मध्ये शिक्षक त्या विद्यार्थ्याला वाचता येते का? तो शाळेतील चर्चेमध्ये भाग घेतो का? त्याची कल्पनाशक्ती कशी आहे? प्रात्यक्षिक कसे करतो? गृहपाठ करतो का? ड्रामा आर्टमध्ये भाग घेतो का? असे पाहतात. या फॉर्मटिव्ह मध्ये शिक्षक-विद्यार्थी यांच्या संवादावर त्याला ग्रेड दिली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.

प्रश्न हा आहे की सीसीई ही परीक्षा पद्धत पास झाली का नापास? कारण या पद्धतीला मार्क्सवादी पालकांनी खूप विरोध केला. मार्क्सवादी पालक म्हणजे ज्यांना फक्त मुलांचे मार्कच दिसतात. त्यांच्या मध्ये कुठले कला गुण दडलेले आहेत त्यांना दिसतच नाही किंवा दिसत असले तरी त्यांना बघण्याची इच्छा नसते. शिक्षकाकडून सुद्धा सीसीई ला काही प्रमाणात विरोध राहिला आहे. काही शिक्षकांना अजूनही समजलेले नाही CCE मध्ये काय सांगितले आहे. सातत्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे म्हणजे काय तर त्यासाठी वेगवेगळ्या मूल्यमापनाच्या पद्धती वापरायच्या.. जसे एखादा प्रोजेक्ट बनवायचा, एखादा धड्यावर नाटक बसवायचे, विविध ऍक्टिव्हिटी घ्यायच्या, जीवन कौशल्य विकसित व्हावे म्हणून त्या संदर्भात विशेष उपक्रमाचे नियोजन करायचे.. असे बरेच काही.. मग या सर्वांच्या आधारे त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचे फॉर्मटिव्ह असेसमेंट करायचे. सोबतच पेपर-पेन परीक्षा घ्यायची होती. मेहनती आणि उपक्रमशील शिक्षक होते ते सर्व पद्धत वापरायचे पण बऱ्याच शाळेत फॉर्मटिव्ह असेसमेंट चे फक्त रकाने भरले जायचे. बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व्हायचे तो विद्यार्थी कसा दिसतो हे सुद्धा शिक्षकांना माहीत नसायचे. आता त्यांची चूक आहे असं मी म्हणणार नाही कारण वर्गामध्ये 50 ते 70 विद्यार्थी असले की असे होणारच. त्यामुळे सी.सी. इ च्या पद्धतीला जेवढे स्वीकारायला हवे तेवढे स्वीकारले गेले नाही. कागदपत्री पूर्ण स्वीकार झाला पण खरे मूल्यमापन झाले असे दाव्याने सांगणे धाडसाचे होईल.

याचे कारण म्हणजे अजूनही आपण लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये अडकलोय. मानसिकदृष्ट्या अजूनही "शिक्षण म्हणजे माहितीचा साठा करणे" असेच गृहीत धरतोय. ब्रिटिश सिस्टीम लावण्यात माहिर होते. ब्रिटिशांना जाऊन 75 वर्ष होतील.. स्वतःची ज्ञान रचनावादी शिक्षणपद्धती सुद्धा आणली पण ती व्यवस्था म्हणून अंमलबजावणीत आपण अपयशी होत आहोत. कारण मेकॉलेची घोका आणि ओका पद्धत पकड घेऊन आहे. याला म्हणतात सिस्टीम बसवणे. आपल्याला ही मॅकोलो सिस्टीम तोडावी लागेल. पालकांची शिक्षकांची आणि संपूर्ण समाजाची मानसिकता दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत "शोध घेते ते शिक्षण" ही नवी व्याख्या आपण जनमानसात रुजू शकत नाही.

आजकालच्या शिक्षणात आपण मुलांना नुसतं भूतकाळातल ज्ञानच त्यांच्या हाती सोपवतोय, भविष्यकाळाचा नागरी सुद्धा बनवायचे आहे ते आपण विसरतोय. भविष्यकाळाचा नागरिक कसा असेल? त्यामध्ये कसले कौशल्य लागतील? तर त्याच्याकडे चार महत्त्वाचे कौशल्य आवश्यक आहे. एक) क्रिटिकल थिंकिंग, दोन) क्रीएटीव्हीटी, तीन) कॉलाबोरेशन आणि चार) कमुनिकेशन स्किल. यालाच 4C असे म्हणतात.
पालकांनो हे कौशल्य कोणी ऐरे गैरे संस्थेने सांगितले नसून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याने रिपोर्टमध्ये जाहीर केले की पुढील दहा वर्षात हे चार कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या जास्त असणार आहे. या रिपोर्ट मध्ये हे ही म्हणाले की जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यातील 65 टक्के विद्यार्थी असे करियर निवडतील जे आज अस्तित्वातच नाही. पण त्या करियर ला लागणारे कौशल्य हे समजले आहे. ते आहे सर्जनशीलता, एकत्र पद्धतीने काम करणे, समोरच्या च्या भावना समजून उत्तम संवाद कौशल्य करणे, समस्या सोडवण्याचे कौशल्य या पद्धतीचे माईड सेट लागणार आहेत. यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता ला सर्वात जास्त महत्त्व असेल.

आता ही कौशल्याचा आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये आणायचे असेल तर तसा अभ्यासक्रम आणि जीवन कौशल्य शाळेत शिकवले गेले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये याचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्या पद्धतीच्या गोष्टी सुचवल्या आहेत. तसा अभ्यासक्रम बनायला लागला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा कशी निर्माण होईल? तो किंवा ती जास्तीत जास्त कसे प्रश्न विचारतील? अशी इकोसिस्टीम निर्माण करण्याचे काम चालू आहे. कृतीतून शिक्षण, अनुभवातून शिक्षण, विद्यार्थी आपण होऊन शिकतील याचे प्रयोग आता सार्वत्रिक करणे गरजेचे आहे. तसे नवीन शैक्षणिक धोरणात सांगितले सुद्धा आहे.

आता मुख्य मुद्दा हा आहे की या एकविसाव्या शतकातील कौशल्याचे मूल्यमापन कसे करायचे? विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य विकसित झाले आहे की नाही हे कसे तपासायचे? यासाठी नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये 360 डिग्री बहुआयामी रिपोर्ट कार्डचा उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांचे प्रोग्रेस कार्ड हे 360 डिग्री मल्टिडाईमेनशीयल होईल. या नवीन रिपोर्ट चा पाया हा एकविसाव्या शतकातील कौशल्य आधारित असणार आहे. ज्या सीसीई मूल्यमापनाच्या पद्धती होत्या त्या असणारच आहे पण त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन स्वरूप यात असेल.

प्रोग्रेस कार्ड मध्ये कोग्नेटिव्ह डोमिन मध्ये कुठल्याही विषयाचे आकलन किती झाले या संदर्भात माहिती असेल. तसेच इफेक्टिव डोमिन मध्ये हे मुद्दे असतील जसे त्या विद्यार्थ्याचा स्वतःकडे बघण्याचा.. दुसऱ्या कडे बघण्याचा आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? त्याची भावनिक बुद्धिमत्ता चा किती विकास झाला आहे? सृजनशीलता इनोव्हेटिव्ह आयडियाज संदर्भात, समस्या सोडवण्यासाठी घेणारा पुढाकार, संवेदनशीलता, संवाद कौशल्य या पद्धतीचे बर्‍याच गोष्टींचे मूल्यमापन यात होतील. तर सायकॉमोटर डोमिन मध्ये त्याचे शारीरिक हालचाली आणि फिजिकल फिटनेस संदर्भातील मुद्दे असतील. हे सर्व मूल्यमापन करण्यासाठी पहिल्यासारखेच प्रोजेक्ट बेस्, ॲक्टिविटी बेस, इंक्वायरी बेस् लर्निंग चे टूल वापरावे लागणार आहे.

पण मुख्य बदल हा आहे की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन फक्त शिक्षकच करणार नाही तर त्याचे वर्गातील मित्रसुद्धा करतील. तो शाळेत कसा वागतो? डबा शेअर करतोय का? त्याच्यामध्ये सहकार्याची भावना आहे की नाही? तो/ती मित्रांशी कसा बोलतो? सगळ्यांना आदर करतो का? याचे उत्तर त्या विद्यार्थ्यांच्या मित्र मैत्रीणींना विचारले जातील. त्या विद्यार्थ्यांचे मित्र मूल्यमापन करून मार्क देतील.

आधीच्या सी सी इ मध्ये त्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वर्तणुकीच्या नोंदी असायच्या. आता घरातील वर्तणुकीच्या नोंदी असणार आहे. त्यासाठी या 360 डिग्री रिपोर्ट कार्ड मधिल काही भाग हा पालकांना भरायचा आहे. तर या रिपोर्ट कार्ड मधील काही भाग हा सेल्फ असेसमेंट चा आहे. म्हणजे विद्यार्थ्याने स्वतःला प्रश्न विचारून त्यांनी स्वतःला मार्क द्यायचे आहे. त्याने स्वतःचे मूल्यमापन करायचे आहे ज्यामधून त्याला स्वतःच्या स्ट्रेंथ / ताकद आणि विकनेस समजतील.

आता तुम्हाला वाटेल की सी सी इ मध्ये जसे टीचर्स रकाने भरून मोकळे व्हायचे, टिक मार करायचे ,खोलात जाऊन तपासायचे नाही तसेच इथेही होईल. 360 डिग्री रिपोर्ट कार्ड चे वैशिष्ट्य हे आहे की हा पूर्ण रिपोर्ट कार्ड जो बनेल तो मूल्यमापनाचा जो फॉर्म असणार आहे त्याच्या आधारावर. हा पूर्ण फॉर्म एक तर्फी नसून तो इंटरॅक्टिव्ह असणार आहे. संवाद रुपी तो फॉर्म असणार आहे. हा फॉर्म आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करून बनविण्यात येणार आहे असं खुद्द नवीन शैक्षणिक धोरणाच्या ड्राफ्ट मध्येच लिहिलेल आहे.

हा असा रिपोर्ट कार्ड असेल जो शिक्षक, विद्यार्थी, पालक एकत्रित भरतील पण त्याचं मूल्यमापन करेल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर. त्या विद्यार्थ्याला किती ग्रेड द्यायचे.. तो पास झाला की नापास झाला.. हे मूल्यमापनाचा फॉर्म कसा भरला आहे त्यावरून ठरेल आणि निर्णय सॉफ्टवेअर घेईल. मुख्य म्हणजे विद्यार्थी जसा जसा पुढे जाईल तसतसा हा रिपोर्ट अधिक अचूक बनत जाईल. समजा पहिली इयत्ते पासून त्याचे या 360 डिग्री ने मूल्यमापन चालू झाले आणि आता तो आठवी इयत्ते मध्ये आला तर शाळेच्या सिस्टिम मध्ये आठ वर्षाचा रिपोर्ट कार्ड ची संपूर्ण माहिती असल्याने आठवीला मला पाहता येईल की या विद्यार्थ्यांची कुठली बुद्धिमत्ता जास्त ताकदवान आहे. हार्वर्ड गार्डनच्या बहुविध बुद्धिमत्ता चा विचार केला तर प्रत्येक जण कसल्या ना कसल्या बुद्धिमत्तेचे मध्ये पुढे असतो. बुद्धिमत्ता ही एक नसून ती अनेक असते. फक्त काही विद्यार्थ्यांमध्ये एखादी बुद्धिमत्ता जास्त असते तर दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या कुठल्यातरी बुद्धिमत्तेला त्रिव्यतेने प्राप्त झालेल्या असतात. हावर्ड गार्डनर म्हणतात आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहे. जसे भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता, सांकेतिक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, शारीरिक स्नायू विषयक बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता, सृष्ट पदार्थ बुद्धिमत्ता.

आता याचे कॉम्बिनेशन करून तुमचा मुलगा मुलगी कशात करियर करेल तर अधिक यशस्वी होऊ शकेल हे या 360 डिग्री रिपोर्ट कार्ड ने सांगता येऊ शकेल. यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांची सर्व माहिती मूल्यमापन शिक्षकांनी, त्या विद्यार्थ्याने आणि त्याच्या पालकांनी प्रामाणिक पणे केले तर हा जो आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून सॉफ्टवेअर बनवले जात आहे तो योग्य निर्णय घेईल. लक्षात ठेवा निर्णय शिक्षक किंवा पालकांना घ्यायचा नाही की माझा मुलगा कशात हुशार आहे हे शोधण्याचा.. शिक्षकांना पालकांना खरे मूल्यमापन करून तो 360 डिग्री फॉर्म योग्य पद्धतीने भरायचा आहे. आता मूल्यमापन फॉर्म तेव्हाच भरता येईल जर त्या फॉर्म मधील प्रश्न हे वर्गातील विद्यार्थ्यांनी अनुभवलेले असतील मग ते प्रोजेक्ट करून असतील, नाटक बसून असतील, रोल प्ले असतील, विद्यार्थ्यांची जागृती निर्माण करून असतील, अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टीत असतील. याचा अर्थ तुमचा मुलगा तुमची मुलगी पास की नापास शिक्षक करणार नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून हे सॉफ्टवेअर ठरवतील आणि हेच न्यू एज्युकेशन पोलिसी ला अपेक्षित आहे.

आता प्रश्न हा आहे की हे कितपत प्रॅक्टिकल शक्य आहे? असं सॉफ्टवेअर केव्हा बनेल? त्याचे प्रशिक्षण व्यवस्थित होईल का? ग्रामीण भागात वापरता येईल का? सरकारी शाळेमध्ये सर्वच शिक्षक स्वीकारतील का? त्या 360 डिग्री रिपोर्ट कार्ड नुसार वर्ष भर शिकवले असेल का? तसे उपक्रम प्रत्यक्ष झाले असतील का? शिक्षक प्रामाणिक भरतील का सी सी इ सारखे रकाने आणि टिक मार्क भरून पुठे जातील? पालक आंधळे प्रेमा खातर आदर्श उत्तरावर टिक तर करणार नाही ना?
असे अनेक प्रश्न निर्माण होते पण जसजसा त्याचा वापर वाढेल तसं याच्या मर्यादाही निघतील अशी आशा आहे.
थोडक्यात काय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून विद्यार्थ्यांची विविध बुद्धिमत्ता तपासली जाईल.


Monday, 7 September 2020

नवीन शैक्षणिक धोरण आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन

दिव्य मराठी मधुरीमा मध्ये प्रसिद्ध झालेला शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.

आपल्याला कोड्याक फिल्म आठवत असेल.. पूर्वी आपण फोटो काढायला कॅमेरा मध्ये कोड्याकचा रोल विकत घेऊन टाकायचो. तेव्हा नुकतेच डिजिटल कॅमेरा यायला सुरूवात झाली तेव्हा त्या कंपनीने स्वतःमध्ये बदल घडवले नाही. त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि डिजिटलायझेशनला खूळ समजले. आता कोड्याक कंपनी ला दिवाळखोरी जाहीर झाली. आपल्या शिक्षण पद्धतीचे सुद्धा असेच होईल जर आपण बदललो नाही.. डिजिटलायझेशन ला गांभीर्याने घेतले नाही तर..

शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मोठ्या प्रमाणात येत आहे. आपण त्याला विरोध करत राहिलो तर शिक्षण प्रगती दर अजून लांब जाईल कारण तुमची इच्छा असो किंवा नसो बदल हा होणारच आहे आणि त्याची सुरुवात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे दिसते. ३४ वर्षानंतर आलेल्या शिक्षण धोरणामध्ये याचा खोलात विचार केला आहे. पूर्ण धोरणांमध्ये डिजिटलायझेशन किंवा त्या संदर्भातील मुद्द्यांचा किमान शंभर वेळा तरी उल्लेख सापडेल. डॉक्टर कस्तुरीरंगन यांनी एकविसाव्या शतकात कुठल्या प्रकारची मनुष्यबळ लागणार आहे याचा विचार करून त्यांना कुठले कौशल्य येणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे शिक्षण अभ्यासक्रमात कसा बदल करावा लागेल याची उत्तम मांडणी केली आहे. हे धोरण ठरवतांना त्यांनी ग्रामीण विद्यार्थी आणि शहरी विद्यार्थी दोघांचा विचार करून हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर भर दिला आहे.

त्यांनी शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या नातेसंबंध प्रत्येक स्तरावर करायला सांगितले आहे. याचा अर्थ पूर्व प्राथमिक पासून ते कॉलेज पर्यंत सर्व स्तरावर तंत्रज्ञानाचा वापर करायला सुचवले. शिक्षकांसाठी डिजिटल अध्यापनशास्त्र, शिक्षण संस्थेला डिजिटल लायब्ररी, वर्च्युअल लॅब उभारायला सांगितली. तर इयत्ता सहावी पासून कोडींग प्रोग्रामिंग विषय समाविष्ट करायला सांगितले. विद्यार्थी ज्या भाषेत शिक्षण घेत असेल त्या भाषेमध्ये डिजिटल कन्टेन्ट विकसित करायला सांगितले आहे.

आता तुमच्या मनात प्रश्न येईल एवढे डिजिटलायझेशन शिक्षणात होणार आहे त्यासाठी भारत तयार आहे का? ग्रामीण भागात इंटरनेट आहे का? १३० कोटी जनतेमध्ये स्मार्टफोनची संख्या ६० कोटी आहे.. हे गरिबांना परवडेल का? हा बदल केव्हा होणार? तर हा बदल लगेच होणार नाही पण बदलाचा वेग जलत नक्की असेल. जर कोरोना आला नसता तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बदलाचा वेग हा मध्यम धीमी गतीचा असता. पण कोरोना काळात दोन क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाला ते क्षेत्र म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि शिक्षण. ऑनलाइन शिक्षण जरी सध्या बाल्यावस्थेत असले तरी पुढील पाच वर्षात त्याचा विकास नक्की होणार आहे. न्यू एज्युकेशन पोलिसी मध्ये ब्लेंडेड एज्युकेशन सिस्टीम सुचवली आहे. याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांना वर्गात जे शिकवले जाईल त्याचा अभ्यास त्यांनी स्वयंअध्ययनाने करून घ्यावा. त्यासाठी त्यांनी टीचर्स किंवा प्रोफेसर चे त्या विषयासंदर्भातील प्री रेकॉर्डिंग व्हिडिओ बघायचे आणि त्या नंतर वर्गांमध्ये त्या टॉपिक बद्दल चर्चा करायची.. प्रॉब्लेम सोडवायचे.. जास्त वेळ चर्चेला द्यायचा विद्यार्थ्यांच्या शंका निस्तरायला द्यायचा. शिकव्हायला जो वेळ जातो त्याला तंत्रज्ञानाची साथ द्यायची. यामुळे शिक्षकांची भूमिका ही बदलून ती मार्गदर्शक कडे जाईल. या पद्धतीचे शिक्षण जगातील कितीतरी देशात सध्या चालू आहे. आज जगातील सर्व प्रकारची माहिती गुगल देते. छत्रपती शिवाजी महाराज केव्हा जन्मले? हे सांगायला गुगल तंत्रज्ञान आहे. ते शिक्षकांनी सांगणे अपेक्षित नाही तर शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण विद्यार्थ्यांमध्ये कसे येतील यासाठी मेंटरिंग करणे अपेक्षित आहे.

नवीन शिक्षण धोरणात स्पष्ट सांगितले आहे की तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे दोन्ही आवश्यक आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे न्यू एज्युकेशन पोलिसी ला अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची हजेरी, सरकारला पाठवायला लागणारी माहिती, नेहमीच लागणारी माहिती, स्टॉक रजिस्टर पासून तर जनरल रजिस्टर पर्यंत.. प्रगती पुस्तका पासून तर शाळेचा दाखला पर्यंत सर्व कामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होईल. शिक्षकांचा अतिरिक्त वेळ वाचेल. कामात पारदर्शकता येईल. जसे वर्गातील हजेरी ही एका फोटोवर घेता आली तर उपस्थित विद्यार्थ्यांचीच खिचडी बनेल. खिचडी मधील भ्रष्टाचार थांबेल. नुकतेच सी.बी.एस.ई बोर्डाने माझ्या शाळेचे एफिलेशन इन्स्पेक्शन वर्च्युअल आणि ऑनलाइन घेतले. त्यामुळे कामात पारदर्शकता आली, वेळ आणि पैसा वाचला आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचार थांबला.

कोविड १९ मुळे कितीतरी शाळा ऑनलाइन पद्धतीने शिकवायला सुरुवात झाल्या. तुम्ही म्हणाल हे फक्त खाजगी शाळेत मधले चित्र होते पण केरळ मधली मल्लांपुर मधील सरकारी शाळेत शिक्षिका ऑगल्मेट रियालिटी सारखे तंत्र वापरून वर्गांमध्ये हत्ती, गाई आणून शिकवत आहे. नुकतेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेले नारायण मंगलारम यांनी महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या विद्यार्थ्यांसाठी मायक्रोसॉफ्टच्या शैक्षणिक ॲपचा वापर करून अमेरिकेचे व्हॉइस पॉड बक्षीस मिळाले, त्यांनी स्काइपवर 25 पेक्षा अधिक देशातील 200 शाळांमधील त्यांच्या विद्यार्थ्यांची संवाद साधून दिला, गॉलक्टिक एक्सप्लोरर या ॲपचा वापर करून शाळेत ग्रहमाला आणली. दोन वर्षांपूर्वी अमरावती मधील नगरपालिकेच्या शाळेत अलॅक्सा रोबट शिक्षक म्हणून वापरायला सुरुवात झाली. त्यामुळे तंत्रज्ञान असो किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर असो तो तळागाळात वापरायला सुरुवात झाली आहे. खरं तर तंत्रज्ञान हे सर्वांना समान पातळीवर आणायला मदत करते. गरीब-श्रीमंत ही दरी कमी करते. जर गावागावांमध्ये इंटरनेट पोचवले, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभारले तर ग्रामीण विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील.

तंत्रज्ञान वापरण्याची जी भीती असते ती भीती ही अडचण नाही आहे. कोरोनाने ती भीती केव्हाच काढून टाकली आहे. आज गल्लीतील रस्त्यावर बसलेला चांभार सुद्धा पैसे गुगल पे ने घेतो. जेव्हा गुगल मॅप आला तेव्हा भारतातील रस्त्यांवर चालणारच नाही अशी टीका झाली होती परंतु आज खेड्यातील व्यक्ती गुगल मॅप वापरतो. प्रश्न तंत्रज्ञान शिकण्याचा नाही आहे तर प्रश्न तंत्रज्ञानच्या पायाभूत सोयीसुविधांचा आहे. सरकारने त्यावर अधिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

आता कॉलेजला प्रवेश घेताना प्रमुख विषय सोबत दुय्यम विषयाचे कोर्सेस करता येणार आहे. म्हणजे गावाकडचा एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगची पदवी घेता घेता शेती चा एखादा कोर्स करू शकतील. या पद्धतीची मेजर आणि मायनर विषय घेऊन पदवी घेण्याची सोय परदेशी देशात अनेक विद्यापीठात आहे. ती आता भारतात सुरू झाली आहे. मग तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयात पदवी घेता घेता त्याला लागणारे विविध कौशल्य हे छोट्या छोट्या ऑनलाईन कोर्स माध्यमातून घेता येतील. त्यासाठी विविध प्लॅटफॉर्म बनवणे सुरू झाले आहे. जसे स्वयम् दीक्षा यावर विविध कोर्सेस आले आहे. खाजगी प्लॅटफॉर्मवर असं स्किल बेस् कोर्सेस उपलब्ध आहे. जे कोर्सेस हे माहितीच्या आधारावर असतात त्याला तर ऑनलाइन एज्युकेशन हे खूप उपयोगाची आहे.

थोडक्यात काय तर शिक्षणामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चे स्वागत करायला आपण तयार व्हायला हवे. हे अगदी खरं आहे की शिक्षण पूर्ण वर्चुअल करणे शक्य नाही. प्राथमिक शिक्षण तर मुळीच नाही. पण ही पॉलिसी तसा आग्रहही धरत नाही. ती एवढच म्हणते की तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सोपं करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, शिक्षकांचे कामे कमी करण्यासाठी, शिक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी करायचे आहे. शिक्षकांनी तंत्रस्नेही होऊन नव्या भारताची सुरुवात करायची आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
तथा संचालक इस्पॅलियर स्कूल, नाशिक.


ओपन-बुक परीक्षा

ओपन-बुक परीक्षा: कालसुसंगत पाऊल महाराष्ट्र टाईम्स मधील प्रकाशित झालेला ओपन बुक परीक्षा म्हणजे नक्की काय? यावर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास ...